वैज्ञानिक मनोरंजन
पुस्तक परिचय
विज्ञानाचा प्रसार करणे, विज्ञानाचे फायदे-तोटे सामान्य माणसाला ज्ञात करून देणे हे विज्ञानकथेचे हेतू असू शकतात. काहींच्या मते विज्ञानकथा हा साहित्याचा एक प्रकार आहे; ज्यात कथानक, भाषाशैली, नाट्यपूर्ण प्रसंग, अनपेक्षित शेवट... इ. असते. त्यामुळे विज्ञानकथा या वाचकाला आकर्षित करतात आणि विचारांना, शोधांना चालना देतात.
श्रीनिवास शारंगपाणी यांचा ‘पॉलिकिलर्स व इतर विज्ञानकथा’ हा दुसरा विज्ञानकथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला. यात १० कथा आहेत आणि त्या वाचताना त्यातील विषय-वैविध्य वाचकांची उत्कंठा वाढवते. विज्ञान संशोधनाचा उद्देश मानवी जीवन सुकर, सुलभ करणे हा आहे. परंतु काही वेळा या शोधांचा उपयोग स्वार्थी, दुष्टबुद्धीने केला जातो, ज्यामुळे मानवी जीवन धोक्यात येऊ शकते. तसेच प्रयोग करताना पुरेशी काळजी घेतली नाही, तर कसा अनर्थ होऊ शकतो इ. बाबी लेखकाने या कथांमधून मांडल्या आहेत.
‘पॉलिकिलर्स’ या पहिल्या कथेत प्लॅस्टिक कचऱ्याच्या प्रदूषणावर संशोधन करताना शास्त्रज्ञाला प्लॅस्टिक खाणाऱ्या कीटकाचा शोध लागतो. जगभर त्याचे स्वागत, कौतुक होते. परंतु उपयुक्त प्लॅस्टिकच्या वस्तू आणि उपकरणांचाही जेव्हा हे कीटक फडशा पाडू लागतात, तेव्हा त्यांचा नायनाट करण्याशिवाय या शास्त्रज्ञापुढे दुसरा पर्याय उरत नाही.
दुसऱ्याच्या मनातील विचार जाणून घेणाऱ्या यंत्राचा शोध लागला तर जग सुखी होईल, अशा परोपकारी हेतूने एक शास्त्रज्ञ असे यंत्र शोधून काढतो. त्याची चाचणी घेताना या सहृदय शास्त्रज्ञाला प्रेमळ चेहऱ्याआडचे मत्सरी, कपटी, ढोंगी चेहरे दिसतात आणि हा विश्वासघात सहन न होऊन तो आपले जीवन संपवतो, अशा आशयाची ‘मन झाले वैरी’ कथा वाचून आपणही सुन्न होतो.
या संग्रहातील काही कथा हटके आहेत. म्हणजे यातील प्रसंग आपण अनुभवलेले नाहीत. ‘गेम’ या कथेत नायकाला जीवघेण्या अपघातानंतर बेशुद्धावस्थेत भूत-भविष्यातील घटना दिसतात. त्यांचा उपयोग बुद्धिचातुर्याने करून तो स्वत:चा अपमृत्यू टाळण्यात यशस्वी होतो. शेवट सुखात असला, तरी वाईट शक्यतेच्या गुंत्यात वाचक गुरफटतो. ‘पैल’ कथेतही भविष्याचे बंद दरवाजे उघडून त्यातील रहस्य पाहणारा नायक आहे. जीवनाच्या पैलतीरावर जाऊन तो परततो आणि सर्व काही तसेच घडत असल्याचे अनुभवतो.
यातील बहुतेक कथा २०५० या वर्षाच्या आसपास घडताना दिसतात. ‘नव्या युगातील जन्म’ या कथेत भविष्यातील वैवाहिक, कौटुंबिक जीवन संपुष्टात आलेले असून अपत्य जन्म ही प्रक्रिया सोपी तरीही जटिल, पूर्ण व्यवहारी झाली आहे, असे दाखवले आहे. ‘स्मृतीरोपण’ ही कथाही छान जमली आहे. मेंदू-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करताना दात्याच्या स्मृती पेशंटच्या मेंदूत जागृत होतात. पण हे वेळीच लक्षात आल्यामुळे डॉक्टर काय उपचार करतात, हे वाचायलाच हवे. ‘आकाशीचा चंद्र नवा’ या अभिनव कथाकल्पनेत पृथ्वीला दुसरा चंद्र कसा मिळतो, हे वाचताना वाचकांची उत्सुकता वाढत जाते. या संग्रहातील इतर कथाही वाचनीय आणि औत्सुक्यपूर्ण आहेत.
या कथांमधून लेखक शारंगपाणी यांची संशोधन वृत्ती आणि कल्पनाशक्ती लक्षात येते. त्यांची लेखनशैली आकर्षक आणि प्रवाही आहे. कथेत शेवटी वाचकाला धक्का देण्यात ते यशस्वी झाले आहेत. तसेच वैज्ञानिक इंग्रजी शब्दांना समानार्थी मराठी शब्द ते योजतात. उदा. छायाक्षेपण - प्रेझेंटेशन, बहुवारिक - पॉलिमर, कालक्रमरेषा - टाइमलाइन, इ. एका कथेत लेखकाने ‘चिकन ऐश मासरी’ आणि ‘पुरण बरिटो’ हे २०५० मधील वैश्विक एकात्मतेचे खाद्यपदार्थ वर्णिले आहेत. तथापि, या कथांमध्ये प्रयोग करतानाचे प्रसंग, त्यातील गुंतागुंत, अडचणी, उपाय यांबद्दल तपशीलवार लिहायला हवे होते, असे वाटते. तसेच शास्त्रज्ञ आपले शोध वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध न करता पत्रकार परिषदेत जाहीर करतात, हे जरा खटकते.
अभियंते, संशोधक, प्रशिक्षक आणि उत्तम वक्ते असणारे शारंगपाणी यांचा हा दुसरा विज्ञान कथासंग्रह वाचकांना नक्कीच आवडेल आणि त्यांच्यातील संशोधकांना आणि लेखकांना प्रोत्साहित करेल, यात शंका नाही.