दृष्टीआडचा महाराष्ट्र

स्वाती कर्वे
सोमवार, 5 जुलै 2021

पुस्तक परिचय

प्रवासाचा किडा चावलेली माणसे किती विविध प्रकारे जगण्याचा आनंद घेत असतात! ती स्वतः फिरतात; त्यासाठी वेगवेगळी ठिकाणे, नित्य नवी कारणे शोधतात. छायाचित्रण करतात, प्रदर्शने भरवतात, लेख लिहितात आणि त्यांचे पुस्तक करतात; पण कधीकधी नुसत्या फोटोंचे पुस्तकही करतात!

अनेक चांगल्या लेखकांची पर्यटनविषयक पुस्तके आपण पाहिली-वाचली आहेत, पण तरीही लिहिण्यासारखे शिल्लक राहिलेले शोधून अगदी साधी, सोपी लेखणी आणि छायाचित्रे यांची सुरेख मांडणी असणारे ‘Maharashtra ः Rustic , Mystic Yet Charming’ हे आगळेवेगळे पुस्तक सादर केले आहे भांडुपच्या डॉ. विराग गोखले यांनी!

लेखकाने आपल्या वैद्यकीय व्यवसायामुळे, तसेच कुटुंबीय, मित्रांबरोबर परदेशातच नव्हे तर महाराष्ट्रातही भरपूर भटकंती केली. त्यासाठी नित्यनवी ठिकाणे शोधून काढली. रात्रीचा दिवस करून, नवीन साधने- तंत्रज्ञानाचा उपयोग करून भटकंती केली. छायाचित्रणाची हौसही दांडगी! सराव आणि प्रयत्नांनी ते  पारंगत झाले. काढलेली छायाचित्रे जतन करून त्याखाली नोंदी करून सुरेख संग्रह करण्याचा छंदही त्यांनी जोपासला. या सगळ्याचा परिपाक म्हणून आज एक आकर्षक पुस्तक त्यातून आकाराला आले आहे, ‘Maharashtra ः Rustic , Mystic Yet Charming’. इंग्रजीतून पुस्तक काढण्याचे कारण विचाराल तर ‘मराठीत कितीतरी मोठ्या व्यक्तींनी लिहून ठेवलं आहे,’ असे ते सांगतात. 

आडवळणाची, आडगावची, गूढतेचे वलय असणारी आणि त्यामुळेच चटकन भुरळ पाडणारी अशी महाराष्ट्रातील आणि विशेषतः कोकणातील, अगदी मुंबईतील काही ठिकाणेही यामध्ये आढळतात. तशीच पूर्वापार गूढरम्य राहिलेली - ऐकिवात असून दूरस्थ वाटणारी लोणार सरोवर, रांजणखळग्यांसारखी ठिकाणे किंवा दीर्घकाळ अपरिचित राहिलेली कातळशिल्पे यांचाही यामध्ये अंतर्भाव आहे. अमराठी वाचक आणि वीकएंड पिकनिक’ची संस्कृतीत वाढणाऱ्या तरुण मंडळींसाठी हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. 

कोकण हे त्यांचे जन्मस्थान. तिथे देवळे अधिक; तशी ती गोव्यातही आढळतात. देवळांच्या बांधणीची वैशिष्ट्ये, दगडांचा वापर, दीपमाळांमधील तसेच सभामंडपाच्या भव्य खांबांमधील, कळसांमधील वैविध्य डॉ. गोखले आपल्या निदर्शनास आणून देतात. जुने दगडी पूल आणि मुंबईमधलेच आगळेवेगळे किल्ले, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील नजरेतून सुटलेल्या गोष्टी जसे ते दर्शवतात, तसेच दिशादर्शक पाट्यांमधील विनोदही नजरेस आणतात!

शैलचित्रे, विविध प्रकारची भुईछत्रे किंवा मशरूम, अनेक पुरातन वृक्ष, त्यांची चित्रविचित्र खोडे-मुळे, मोठमोठ्या मूर्ती किंवा वैशिष्ट्यपूर्ण जागांचे त्यांच्या मोजक्या माहितीसह असलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या, तसेच काही मूर्तींच्या भव्यतेचा अंदाज यावा यासाठी एखादी मनुष्याकृतीही अवश्य आढळते. यामध्ये लेखकाची दूरदृष्टीही दिसते.

राजापूरची गंगा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा मारुती, रॉक गार्डन, कणकवलीजवळचा उभादेव, गूढ गहन धोम, लोणी भापकर, आर्थरच्या पत्नीचे स्मारक, महाराष्ट्रातील काच-मंदिरे, तळ्यातली देवालये, गुहा, शिवाय मुंबईमधील हटके गणपती. अशा स्थानांवरील छोटेखानी लेख आहेत, भरपूर छायाचित्रेही आहे. दोन्हीचा तोलही छान साधला गेला आहे.

तसे म्हटले तर या नेहमीच पाहण्यात येणाऱ्या जागा. पण आपल्या दैनंदिनीच्या व्यग्रतेत सुटून गेलेले त्यांचे आर्किटेक्चर, त्यातली वैशिष्ट्ये, सौंदर्य ज्या चोखंदळपणे आणि सौंदर्यासक्तीने लेखकाने उलगडून दाखवली आहेत, त्याला तोड नाही. 

सर्वांना ज्याचा आनंद घेता येईल, अभ्यासालाही उपयुक्त ठरतील अशा ठिकाणांची निवडही त्यांनी यात केली आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर स्टॕलेक्टाइट केव्ह्ज (अधोमुखी लवणस्तंभ), वेताळ मंदिरे, नैसर्गिक पोखरबाव, लेक टेम्पल्स ऑफ महाबळेश्वर, मस्तानीशी संबंधित ठिकाणे, शिवलिंग, कातळशिल्प, जैन हिंदू मंदिरे, व्हॉट द गॉडस् गेट इन रिटर्न ... अशा विषयांवरचे माहितीपूर्ण छोटे छोटे लेख महत्त्वपूर्ण वाटतातच. त्याबरोबरच विविध संगमरवरी कोनशिला, मुंबईमधले सायन हिलॉक फोर्ट, धारावी काळा किल्ला, वरळी फोर्ट असे नावानेही अपरिचित वाटणारे किल्ले, देवळांमधले वैशिष्ट्यपूर्ण नंदी, कासवे, महादेवाच्या पिंडी, कोकणातले कीटक, नजरेतून सुटलेली फुले अशा काही गोष्टी पुस्तकातून भेटीला आल्याचा आनंद सतत आश्चर्याचे धक्के देतो! या ठिकाणी कसे जावे, कुठे राहावे हे इतरत्र सहज सापडणारे तपशील लेखकाने वगळले आहेत. मात्र वास्तूचे, जागेचे वेगळेपण, वैशिष्ट्ये दाखवणारी भरपूर रंगीत छायाचित्रे पुस्तकात समाविष्ट केली आहेत. त्यांनी स्वतः काढलेली अनेक छायाचित्रे आणि पर्यटन व वैद्यकीय विषयावरील लेख विविध मराठी-इंग्रजी वृत्तपत्रांतून आजवर प्रसिद्ध झाले आहेत.

पुस्तकामध्ये ज्या ठिकाणी जागेचे दिशादर्शन आवश्यक आहे, त्या ठिकाणी त्यांचे आटोपशीर नकाशे नेमके दर्शवले आहेत. ज्यांच्यामुळे प्रवास रंजक, सुखकर झाला, प्रेरणाही मिळाली, आवड जोपासता आली अशा प्रवासातील सहयोगी, चालक यांच्याबद्दलचा ऋणनिर्देश अवश्य केला आहे. तसेच ‘फोटो काढायला परवानगी नाही,’ अशा पाट्यांबद्दलचे उचित मतप्रदर्शनही त्यांनी केले आहे. या अर्थानेही पुस्तक परिपूर्ण झालेले दिसते.

इतकी सगळी अद्‍भुत, अतर्क्य भटकंती (आजच्या भाषेत व्हर्च्युअल) एका दमात केल्याने वाचक विस्मयचकित होतो. मात्र त्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देण्यासाठी सुयोग्य नियोजन हवे आणि ते नेटके करण्यासाठी हातात हे नवेकोरे पुस्तक 
हवे!

Maharashtra ः Rustic, Mystic, Yet Charming

  • Writer : Dr. Virag Gokhale
  • Publisher : Meghana Gokhale, Mumbai
  • Price : ₹  170
  • Pages : 104
     

संबंधित बातम्या