या सम हाच...

उदय हर्डीकर
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पुस्तक परिचय
 

जातील तिथं आनंद, प्रसन्नता निर्माण करणारी काही माणसं असतात. केवळ एवढंच करून ही माणसं थांबत नाहीत. संगीत, लेखन, रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन असा वेगवेगळ्या क्षेत्रांतही ती माणसं आपला अमिट ठसा उमटवतात, ती जातात तिथं त्यांचा ‘मिडास टच’ जाणवतो. ते नसले, तरी आपल्यातच असल्याचा भास होतो... ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व’ म्हणून प्रख्यात असलेले पु. ल. देशपांडे ऊर्फ भाई हे रसायन असं शब्दांच्या पलीकडलं... कोणत्याही चौकटीत न बसणारं... चौकटीपेक्षा भव्य असणारं... भाई गेले तेथे ‘मास्टर’च ठरले. संगीत असो, रंगभूमी असो वा लेखन; पुलंचा ठसा उमटला नाही असं क्षेत्र नाही. ऐन काहिलीत अंगावरून थंड हवेची झुळूक जाऊन उल्हास वाटावा असं सहजसुंदर लेखन करणारे भाई, ‘गुळाचा गणपती’मधील अभिनेते भाई, ‘मित्र हो’ म्हणून साद घालणारे भाई, ‘एक शून्य मी’मधले भाई, आणीबाणीच्या कालखंडात दडपशाहीविरुद्ध आवाज उठवणारे भाई, गुरुदेव रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनात जाऊन बंगाली मुळाक्षरे गिरवणारे भाई, ‘आकाशवाणी’वरून दुर्मिळ कार्यक्रम करणारे भाई, ‘दूरदर्शन’ची ओळख करून देणारे भाई, ‘बटाट्याची चाळ’ या एकपात्री प्रयोगात रंगून जाणारे भाई, समाजातील विधायक कामांना न बोलता भक्कम आर्थिक आधार देणारे दानशूर भाई... किती रूपं आठवायची त्यांची? भाई जाऊन आज किती वर्षं लोटली; पण त्यांचं ते निर्मळ हास्य आजही आठवतं, त्यांचे दिलखुलास विनोद आठवतात आणि ‘या सम हाच’ असं वाटतं.

‘पु. ल. देशपांडे’ या नावानं महाराष्ट्रावर, मराठी माणसांवर गारूड केलंच; पण अमराठी माणसांनाही त्यांनी सहज आपलंसं केलं. अशा या अफाट व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्याचंच आव्हान. लेखिका मंगला गोडबोले यांनी मात्र ‘पु.ल. चांदणे स्मरणाचे’ या पुस्तकात हे आव्हान पेलल्याचं जाणवतं. ओघवती भाषा आणि त्याला सुरेख रेखाचित्रांच्या जोडीमुळं ‘राजहंस’चं हे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखं झालं आहे.

पुलंसारख्या अफाट व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणं, त्यांच्यावर लेखन करणं हे सोपं काम निश्‍चितच नाही. पुलंनी आयुष्यात 
(रंगमंच/चित्रपटांतही) अनेक भूमिका केल्या. सगळ्यांतच ते ‘मास्टर’ ठरले. पुलंचं सांस्कृतिक संचित फार मोठं होतं. वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे त्यांचे आजोबा. ते स्वतः भाषाकोविद होते. अनेक भाषा त्यांना येत होत्या. या आजोबांचं अतिशय सुंदर शब्दचित्र ‘ऋग्वेदी’ या नावानं पुलंनी रेखाटलं. पुलंच्या आजीही हजरजबाबी होत्या. त्यांच्याकडून बहुदा पुलंना ‘इन्स्टंट विनोदा’चा वारसा लाभला असावा. वडीलही दिलदार होते. त्यांनी मुलांच्या छंदांना प्रोत्साहनच दिलं. कमी पगाराच्या नोकरीतही त्यांनी पुलंना उत्तम हार्मोनियम घेऊन दिला. मातुःश्रीही तशाच. त्यांनीही मुलांना प्रोत्साहनच दिलं. अशा सुंदर वातावरणात वाढलेल्या भाईंच्या जडणघडणीत ‘पार्ले टिळक’नं पुढं मोलाचा वाटा उचलला. ‘पार्ले टिळक’ म्हणजे पार्ले टिळक विद्यालय. ‘ऋग्वेदी’ आणि त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांनी एकत्र येऊन स्थापलेल्या या शाळेत पुलंची जडणघडण झाली. या शाळेचा, तेथील संस्कारांचा प्रभाव पुलंवर कायम राहिला.

पुस्तकाचा हेतू आहे, तो पुलंची समग्र ओळख करून देण्याचा. मंगला गोडबोले यांनी त्या दृष्टीनं रचना केली आहे. संगीत आणि रंगभूमी हे पुलंचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय. बालगंधर्व, केशवराव दाते, हिराबाई बडोदेकरांसारख्या दिग्गजांविषयी त्यांना अत्मियता. सहाजिकच, पुस्तक किंवा गाणं यात निवड करण्याची वेळ आली, तर गायनाला प्राधान्य, असं ते म्हणत.

‘बटाट्याची चाळ’सारखा एकपात्री कार्यक्रम त्यांनी मराठी रंगभूमीवर प्रथम आणला. अत्यल्प सेट असलेला हा कार्यक्रम अफाट लोकप्रिय ठरला. नंतरच्या ‘वाऱ्यावरची वरात’ला तेच भाग्य लाभलं. खरं तर असा प्रयोग पूर्वी कधी झाला नव्हता. पण भाई हे ‘अफाट’ याच वर्गातले असल्यामुळं त्यांनी ही चाळ कमालीची रंगवली. एवढी पात्रं एकट्यानं सादर करणं ही साधी गोष्ट नाही; पण पुलंनी ते आव्हान एक नव्हे अनेक वर्षं पेललं आणि नंतर त्याचे प्रयोग बंदही केले. ‘वाऱ्यावरची वरात’ आणि ‘वटवट वटवट’बाबत तेच म्हणता येईल. पुलंच्या या सगळ्या धावपळीत त्यांना सुनीताबाईंची फार मोलाची साथ लाभली. रोजच्या आयुष्याच्या धडपडीतही पुलंनी त्यांच्यातील माणूस आणि कलावंत कोमेजू दिला नाही, हे मराठी माणसांवरचे अमूल्य उपकार मानावे लागतील. माणसं ‘टिपणं’ हा त्यांचा फार मोठा गुण. त्यातूनच अफाट व्यक्ती आणि अचाट वल्ली आल्या. बेळगावचे रावसाहेब, रत्नांग्रीचा अंतू बर्वा, प्रवासात भेटलेले हंड्रेड पर्सेंट पेस्तनजी, शाळेनंतर अचानक भेटलेला बबलू, वेगळ्याच जगातला नंदा प्रधान, मानवी मूल्यं आणि संस्कारांवर नितांत श्रद्धा असलेले चितळे मास्तर... नावं तरी किती घ्यावीत? भाईंच्या प्रत्येक व्यक्तीनं माणसाला हसवताना नकळत मूकही केलं... 

भाईंनी आपल्याला काय दिलं याचा विचार केला, तर खळखळून हसायला शिकवलं असं म्हणावं लागेल. त्यांचा विनोद कायम निर्विष होता. कधी कोणाला दुखावणारा विनोद त्यांनी केला नाही हे त्यांचं वैशिष्ट्य. ताणतणाव कोणाला नसतात? पण भाईंच्या साध्या स्मरणानंही मराठी माणसाच्या चेहऱ्यावर स्मित फुलतं! मराठी जनांवर पुलंच्या भाषेचेही फार उपकार आहेत. अनेक शब्द त्यांनी सहज प्रचारात आणले.

हे पुस्तक म्हणजे अर्थातच सबकुछ पुल आहे; पण त्याचबरोबर त्यांच्या सहवासात आलेल्यांची माहितीही आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा हा आलेख आहे. लेखिका मंगला गोडबोले यांनी अतिशय कसदार भाषेत या सगळ्याचा परिचय करून दिला आहे, हे या पुस्तकाचं मोलाचं यश. ‘पोरवय’, ‘मौजे पारलई’, ‘एक झुंज... आयुष्याशी!’, ‘आता मांडा सारीपाट!’, ‘झळाळती कोटी ज्योती या...’ आदी शीर्षकांतूनच पुढं काय असावं याचा अंदाज येतो. पुलंच्या काही जुन्या छायाचित्रांनी पुस्तकात मोलाचा वाटा उचलला आहे. ‘राजहंस’च्या परंपरेनुसार पुस्तकाची निर्मिती उत्तम आहे. पुलंना स्मरणाऱ्या, त्यांना मानणाऱ्या प्रत्येकाकडं हे पुस्तक हवंच.

संबंधित बातम्या