चक्रव्युहातल्या माणसांच्या कथा

वर्षा तोडमल
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

पुस्तक परिचय
खेळ
लेखक ः प्रा. मिलिंद जोशी
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे 
किंमत : १६० रुपये.
पाने : १३० 

‘तमाच्या तळाशी’ आणि ‘पानगळ’ या दोन कथासंग्रहानंतरचा ‘खेळ’ हा प्रा. मिलिंद जोशी यांचा तिसरा कथासंग्रह. नात्यांच्या चक्रव्युहात अडकलेल्या माणसांच्या कथा ‘खेळ’ या कथासंग्रहात वाचायला मिळतात. आठ लघुकथांचा समावेश असलेल्या या कथासंग्रहातील ‘खेळ’ ही कथा तीन भागात विभागलेली दिसते. 

स्वतःच्या एका प्रेरणेने उद्युक्त झालेली आणि फक्त आपल्या प्रेरणांनाच मानणारी या कथेची नायिका ही एक सहजमुक्त अशी आधुनिक स्त्री-व्यक्तिरेखा. आधुनिक स्त्री-जीवनातील ताण-तणावांचे व तिच्या मानसिकतेचे अतिशय धीटपणे केलेले चित्रण या कथेत दिसते. गुन्हा प्रत्यक्षात उघडकीस न आल्याने नायिकेला शिक्षा झालेली नाही; परंतु कालांतराने तिच्यात नेणिवेतील मनोगंडांनी घडवलेले कथानक फ्लॅशबॅक तंत्र आणि तृतीयपुरुषी निवेदन पद्धतीने लेखकाने उलगडले आहे. मानवी मन ही किती गुंतागुंतीची गोष्ट आहे. ‘खेळात प्रत्येक क्षणी जी उत्कंठावर्धक अनिश्‍चितता असते, तीच जीवनातही असते. खेळात सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत. तरीही तो खेळ खेळत राहायचं असतं! मैदानातल्या खेळांचे एक बरे असते, त्याला शेवट असतो. पण नात्यातल्या खेळाला शेवट नाही. 

माणूस गेला तरी त्याच्याबरोबरच्या नातेसंबंधांमुळे वाट्याला आलेल्या दुःखभोगाच्या कहाण्या दुसऱ्यांना त्यांच्या अंतापर्यंत छळत राहतात. याचा प्रत्यय अधांतरी, वाडा, झोपाळा, भोगिले जे दुःख त्याला, इत्यादी  कथांमधून येतो. नात्यातल्या नाट्याच्या अनेक तऱ्हा या कथांतून चित्रित होतात. वाडा आणि झोपाळा या प्रतिकांचा अर्थपूर्ण उपयोग केलेला आहे. कर्रऽऽ कर्रऽऽ आवाज करणारा झोपाळा आणि वैराण वाळवंटाची साक्ष देत उभा असलेला पडका वाडा अनंतालाच हेलावून टाकत नाही, तर वाचकालाही अंतर्मुख करतो. घटना प्रधान कथानकाकडून मनोविश्‍लेषणप्रधान मराठी कथेने जे वळण घेतले त्या पातळीवरील या दोन्ही कथा वाटतात.

बाह्य घटनांचे अंतर्मनातील चित्रण हे आधुनिक मराठी कथेचे वैशिष्ट्य ‘भोगिले जे दुःख त्याला’ या कथेतून चित्रीत होते. कथेचा प्रारंभच प्रतिभा आणि सदानंद या पती-पत्नींच्या मनोविश्‍वातील अंतराचे दर्शन घडविणारा आहे. मनाचे दरवाजे आपल्या निर्दयी पतीसाठी ठामपणे बंद करून, आयुष्याची परवड झाल्यानंतरही ठामपणे उभी राहणारी प्रतिभा ही नायिका तर दुसऱ्या बाजूला नव्या औद्योगिक संस्कृतीने जन्माला घातलेल्या भोगवादी संस्कृतीच्या आवर्तात खेचल्या गेलेल्या, आपले स्वत्व गमावून बसणाऱ्या, यशास्वितेची पुरुषी जगातील मूल्ये स्वीकारणाऱ्या अधांतरी कथेतील ‘ती’ अमृतमहोत्सवामधील प्रणिता किंवा खेळमधील उथळ व्यक्तिमत्त्वाची नायिका नम्रता दिसते. 

समाजजीवनातील बदलत्या प्रवाहांचे भान या कथातून व्यक्त होते. नैतिक पातळीवरील नात्यांमधील अवमूल्यन एकूण समाजजीवनालाच व्यापणारे ठरते. तरुणांचे भावविश्‍व लग्नकल्लोळमधील अनिकेत, दीपाली, इ. पात्रांतून व्यक्त होतो. नात्यामधून निर्माण होणारा मानसिक संघर्ष हा प्रा. मिलिंद जोशी यांच्या कथांचा कथाविषय झालेला दिसतो. नात्यातील नानाविध रुपांची दर्शने घडविणारी, नातेसंबंधातील अन्वय लावण्याची प्रा. मिलिंद जोशी यांची स्वतःची शैली कथांमधून दिसते. या कथा वाचून संपल्यावर वाचकांच्या मनात घर करतात. वाचक कथेत न दिलेल्या पुढच्या घटनाविषयी अंदाज बांधत राहतो.

आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची जपणूक करू पाहताना विवाहित कथानायिकांसमोर जे पेच पडतात, त्याचा गांभीर्याने घेतलेला वेध, आत्मप्रतिष्ठेचे भान असलेली आधुनिक सुशिक्षित स्त्रीपात्रे, स्वच्छंदपणे बागडणारे मोकळे मन आणि त्याला बंदिवान करणारे आकुंचित अंगण, त्यातून निर्माण होणाऱ्या तणावांचे मार्मिक चित्रण अर्थपूर्ण प्रतिकांचा वापर करून लेखकाने केलेले आहे. त्यामुळे प्रा. मिलिंद जोशी यांच्या कथांतील पात्रांच्या भावविश्‍वाला सामाजिक व मानसिक असे दुहेरी परिणाम लाभलेले दिसते. माणसातल्या विक्षिप्तपणालाही शोधण्याचा प्रयत्न प्रा. जोशी करताना दिसतात.

मराठी लघुकथेत अरविंद गोखले, आदी कथाकारांनी मनोविश्‍लेषशणात्मक लघुकथांचं स्कूल चालवलं पुढे, मानवी मनाचा शोध घेयाची परंपरा लघुकथेतून म्लान होत गेली. परंतु मिलिंद जोशी यांच्या कथा या परंपरेला आश्‍वासन देऊन पाहतात ही समाधानाची बाब आहे.

संबंधित बातम्या