संवाद क्षेत्रातील बदलांचा आढावा

व्यंकटेश कल्याणकर
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

पृथ्वीतलावर मानवाचे अस्तित्व निर्माण झाल्यापासून तो सातत्याने नावीन्याचा, कल्पकतेचा, सहज-सुलभतेचा ध्यास आजतागायत घेत आहे. गरजेनुरूप आणि काळानुरूप मानवाने नवनिर्मितीतून विविध आविष्कार साध्य केले आहेत. चाकाच्या शोधापासून सुरू झालेला हा नवनिर्मितीचा प्रवास संशोधनातून विकसित होत आज उन्नत अवस्थेत पोहोचलेला आहे. संशोधनातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आजतागायत मानवाने घडविलेल्या क्रांतीयुगाचे आपण साक्षीदार झालेले आहोत. तंत्रज्ञानाने जगातील सर्वच्या सर्व क्षेत्रे व्यापली आहेत. तंत्रज्ञानाच्या स्पर्शाने प्रत्येक क्षेत्र समृद्ध झाले आहे, होत आहे.

पृथ्वीतलावर मानवाचे अस्तित्व निर्माण झाल्यापासून तो सातत्याने नावीन्याचा, कल्पकतेचा, सहज-सुलभतेचा ध्यास आजतागायत घेत आहे. गरजेनुरूप आणि काळानुरूप मानवाने नवनिर्मितीतून विविध आविष्कार साध्य केले आहेत. चाकाच्या शोधापासून सुरू झालेला हा नवनिर्मितीचा प्रवास संशोधनातून विकसित होत आज उन्नत अवस्थेत पोहोचलेला आहे. संशोधनातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आजतागायत मानवाने घडविलेल्या क्रांतीयुगाचे आपण साक्षीदार झालेले आहोत. तंत्रज्ञानाने जगातील सर्वच्या सर्व क्षेत्रे व्यापली आहेत. तंत्रज्ञानाच्या स्पर्शाने प्रत्येक क्षेत्र समृद्ध झाले आहे, होत आहे. संवादाच्या क्षेत्रामध्ये तर आमूलाग्र क्रांती झाली आहे. नेमका हाच धागा पकडून ‘संवादक्रांती’ या पुस्तकात मान्यवर विषय तज्ज्ञांचे लेखन स्वरूपातील विचार ‘सकाळ’चे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी संपादित केले आहेत. 

दैनिकाच्या वर्धापनदिनानिमित्त नियमित अंकासोबत प्रसिद्ध होणाऱ्या विशेष पुरवण्यांमध्ये अत्यंत वाचनीय साहित्य असते. अशा साहित्याला दीर्घकालीन वाचनमूल्य आणि संदर्भमूल्य असते. कोल्हापूर ‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या विशेष पुरवणीतील साहित्य ‘संवादक्रांती’ या पुस्तकात कायमस्वरूपी एकत्र करण्यात आलं आहे. या पुस्तकात एकूण २८ मान्यवर लेखक, विषयतज्ज्ञांनी विचार मांडले आहेत. पुस्तकात ‘संवादक्रांतीची जादू’, ‘संवादक्रांती आणि बदल’ आणि ‘संवाद-विसंवाद’ अशा तीन भागांचा समावेश आहे. 

‘संवादक्रांतीची जादू’ या पहिल्या भागात बदललेल्या आधुनिक स्वरूपाविषयी भाष्य केले आहे. या विभागात ज्येष्ठ संशोधक विजय भटकर यांनी त्यांच्या लेखात २०२०या वर्षापर्यंत भारत प्रगत राष्ट्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘निरोपाची उत्क्रांती’ या लेखात कहाते यांनी ख्रिस्तपूर्व काळापासून आज सोशल मिडियाच्या जमान्यापर्यंतच्या संदेशवहनाच्या स्वरूपाचा आढावा घेतला आहे. आयटी क्षेत्राचे अभ्यासक प्रीतम शहा यांनी संवादाशिवाय जगणे म्हणजे डॉल्फिन मासे पाण्याविना ठेवल्यासारखे असल्याचे सांगत संवादाचे महत्त्व अत्यंत साध्या-सोप्या भाषेत विषद केले आहे. इस्रोचे माजी समूह संचालक सुरेश नाईक यांनी उपग्रह तंत्रज्ञानाविषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे. याशिवाय सुधाकर काशीद, प्रफुल्ल सुतार यांनीही अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण लेखन केले आहे.

‘संवादक्रांती आणि बदल’ या विभागात विविध क्षेत्रात संवादाच्या दृष्टिकोनातून झालेल्या बदलाचा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आढावा घेतला आहे. ३५ ते ७० वर्षांपूर्वी युरोपात बुद्धी असलेल्या मानवाची उत्पत्ती झाल्याचे मानले जात असल्याचे डॉ. ओमप्रकाश कलमे यांनी सांगितले आहे. माहिती ही माणसाच्या मनातील सर्व विकार नष्ट करून जीवनाला व समाजाला आकार देण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी लिहिले म्हटले आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल होत शिक्षणाचा मार्ग व्हर्च्युअल होत असल्याचे प्रा. डॉ. आर.एस. तिवारी यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे. तर भविष्यात वैद्यकीय शस्त्रक्रियेवेळी भावनांचा प्रक्षोभ होण्याचा धोका न राहता रोबोच्या हातूनच वैद्यकीय उपचार-ऑपरेशन करता येतील, असा दावा डॉ. अनिल मडके यांनी आपल्या लेखात केला आहे. डॉ. ए.एम. गुरव यांनी ‘संवाद = होळी + राखी + दिवाळी’ असे म्हणत संवादाचे स्वरूप आणि महत्त्व अत्यंत रंजक-बोधक पद्धतीने विशद केले आहे. एचआर कन्सल्टंट राहुल अंबपकर यांनी फेसबुक, ट्विटर आणि लिंक्‍ड-इनचे महत्त्व विशद करत ते वापरण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. अभियांत्रिकी पदविकाधारक प्रयोगशील शेतकरी सचिन खोत यांनी इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेऊन त्यातून प्रत्यक्ष शेतीमध्ये केलेल्या यशस्वी प्रयोगांबद्दल लिहिले आहे.  पशुसंवर्धन आयुक्तालयाचे सहायक संचालक डॉ. सुहास शिंदे यांनी ‘प्रशासनाचा संवादी चेहरा’ या लेखात प्रशासनात उत्तम संवादकौशल्याचा वापर अनिवार्य ठरत असल्याचे म्हणत प्रशासनातील संवादाचे महत्त्व पटवून दिले आहे. न्याय क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे झालेल्या बदलांचा ॲड. पृथ्वीराज नारायण कदम यांनी आढावा घेतला आहे.  सर्वोच्च न्यायालयाचे  १९५०पासून आजतागायतचे सर्व निकाल सविस्तर माहितीसह इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे. स्वतः:चे अनुभव सांगत लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी मनोरंजन क्षेत्रात झालेल्या बदलांविषयी माहिती दिली आहे. तर ‘जग धावणार मोबाईल व्हिडिओवर’ या लेखातून ह्युक्‍लिप या अमेरिकेतील कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल जकातदार यांनी व्हिडिओच्या वाढत्या महत्वावर भाष्य केले आहे.

पुस्तकाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या ‘संवाद-विसंवाद’ या भागात ‘संवादक्रांती’च्या दुसऱ्या बाजूवर बोट ठेवण्यात आले आहे. दहशतवादी कृत्यांसाठी सायबर स्पेसचा वापर होत असल्याचे सांगून त्यातील धोक्‍यांबाबत वैभव साळुंखे यांनी लिहिले आहे. डॉ. निशा मुंडे-पवार यांनी संवाद माध्यमातून ‘महिला विश्व’ यावर आता स्वतंत्रपणे विचार करण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे. ‘संवादातून माणूस गायब!’ या लेखात प्रा. गोपाळ गुरू यांनी ‘फेस टू फेस’ संवादाचे महत्त्व सांगितले आहे. अभिनय कुलकर्णी यांनी त्यांच्या ‘कै च्या कै जालीय भाषा’ या लेखात सोशल मिडियावरील मराठी भाषेचे स्वरूपावर भाष्य केले आहे. ‘मैत्र: रंग, तरंग आणि अंतरंग’ या लेखात ज्येष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांनी मैत्री आणि ई.-मैत्रीविषयी लेखन केले आहे. तर ‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीची जागा आता संगणक घेईल असे सांगत डॉ. दीपक शिकारपूर यांनी ‘भावना नसलेले यंत्रमानव खऱ्या हाडामांसाच्या मानवाशी संबंध जोपासू शकणार नाहीत. त्यासाठी हवे अस्सल विचारी मन जे फक्त मानवाकडे आहे’ अशा मानवी अस्तित्वाचे महत्त्व विशद केले आहे.  याशिवाय या विभागात राजा शिरगुप्पे, प्रकाश बाळ, जयदेव डोळे, विनय गुप्ते या मान्यवरांनी आपले विचार मांडले आहेत.

‘नव-तंत्रज्ञानावर स्वार होऊन नव्या जगात मुलूखगिरी करायला निघालेल्या पिढीला’ हे पुस्तक समर्पित करण्यात आले आहे. याच पिढीला समजून घेऊन वर्तमान युगाविषयी वाचकांना स्वतः:ची भूमिका तयार करण्यास हे पुस्तक दिशादर्शक, बोधप्रद आणि उपयुक्त ठरेल, यात शंकाच नाही.

संवादक्रांती
संपादक ः श्रीराम पवार
प्रकाशक ः सकाळ प्रकाशन, पुणे
किंमत ः १६५ रुपये 
पृष्ठे ः १६०
 

संबंधित बातम्या