हिंदी गीतांचा कोलाज 

विजय तरवडे 
गुरुवार, 28 जून 2018

पुस्तक परिचय
 

हिंदी चित्रपटातल्या गाण्यांच्या विषयांचा आवाका इतका व्यापक आणि सर्वसमावेशक आहे, की कोणत्याही व्यक्तीची कोणत्याही वयातील आणि कोणत्याही अनुभवाची अभिव्यक्ती कुठल्या तरी गाण्यात हमखास सापडू शकते. या गाण्यांनी व्यक्त केलेला नाही असा कोणताच अनुभव नसणार. त्यामुळे आसेतुहिमाचल या देशातल्या विविध जातिधर्माच्या आणि भाषांच्या समूहाला गाण्यांनी घट्ट बांधून ठेवले आहे. 

भालचंद्र नेमाडे यांच्या एका कादंबरीतला सिनिक चांगदेवदेखील रात्रीच्या एकांतात रेडिओ सिलोनवरची कोणत्याही क्रमाने येणारी गाणी ऐकताना आणि त्यांचा उपहास करतानाच स्वतः नकळत समाधीवस्थेत जातो. त्यावेळी लेखकाने दिलेल्या गाण्यांच्या यादीचा एक छोटा परिच्छेद वाचकाला देखील हलवतो. 

प्रिया प्रभुदेसाई यांच्या "जुळल्या सगळ्या आठवणी, स्वर आले दुरूनी' या पुस्तकाने ही जादू एका विशाल पटावर मांडली आहे. सोशल मिडियावर नियमित वावरणाऱ्या साहित्यप्रेमी मित्रांना प्रिया हे नाव अपरिचित नाही. या पुस्तकापूर्वी त्यांनी या ना त्या निमित्ताने अनेक चित्रपट गीतांचा रसास्वाद फेसबुकवर पेश केला आहे. दैनिकांसाठी सामान्यतः लघुनिबंध किंवा ललित निबंध लिहिले जातात, तेव्हा पुस्तकांचा एक अज्ञात वाचक डोळ्यांसमोर असतो. हे लेखन अग्रलेखाच्या आसपास छापले जाते. वाचक हे सकाळच्या वेळी इतर मजकुरासह वाचणार असे गृहीत धरले जात असावे. फेसबुकसारख्या माध्यमावर होणाऱ्या लेखनाचा बाज थोडा निराळा असतो. दिवसभराची कामे आटोपून मंडळी इथे डोकावतात. रोजचे व्याप घडीभर बाजूला ढकलले, की कोणत्याही वयातील संवेदनशील मने मागे डोकावतात, तनहाई वातावरण आणि स्मरणरंजन यांचे घट्ट नाते त्यांच्याकडून हळवा मजकूर लिहून घेते. 

इथे शब्दमर्यादेचे बंधन आणि संपादकांची कात्री नसते. त्यामुळे लेखन ओबडधोबड आणि विस्कळित असले तरी उत्कट असते. मनात असलेला वाचक (फ्रेंडलिस्ट) ओळखीचा असतो. त्याला उद्देशून असते. एकाच वेळी हे खूप वैयक्तिक असते आणि त्यामुळेच सार्वत्रिक असते. प्रिया प्रभुदेसाई यांनी हिंदी गाण्यांवर लिहिताना असेच विस्कळित आणि उत्कट लिहिले आहे. त्यामुळे त्यात हे वैयक्तिकपण आणि सार्वत्रिकतेचे अद्‌भुत मिश्रण उतरले आहे. अंगाईपासून सुरवात करताना अंगाई गीते, स्वतःच्या आईच्या आठवणी, त्यातच विविध चित्रपटातल्या अंगाईगीतांची दृश्‍ये एकामागून एक समोर येतात. 

पूर्वी विविधभारती किंवा बिनाका गीतमाला ऐकताना कानांवर कोणत्याही क्रमाने कोणतेही गाणे येई. त्या मजेदार अनुभवाची इथे पुनरुक्ती होते. एका गाण्याबद्दल लिहिताना अचानक लेखिकेला स्वतःचा एखादा अनुभव किंवा आणखीन एखादे निराळेच गाणे आठवते. आणि वाचत असताना आपण जेव्हा ती गाण्याची ओळ वाचतो तेव्हा त्या गाण्याशी संबंधित आपलीदेखील वेगळीच आठवण मनातून वर येऊ शकते. ज्याने हिंदी गाण्यांचा आनंद घेतला आहे, ही गाणी एकदा तरी गुणगुणली आहे. त्याला हे पुस्तक या अर्थाने वेगळा आनंद देते. पुस्तकभर अशा शेकडो गाण्यांच्या ओळी उद्धृत केल्या आहेत. 

अंगाई गीताने सुरवात करताना नकळत लेखिका तिच्या तारुण्यापर्यंत पोचली आहे आणि आपल्यालादेखील जणू काय एखाद्या जवळच्या मैत्रिणीची सारी गुपिते उलगडत आहेत. अशी पुढेपुढे अनुभूती येत राहते. या गाण्यांना मुंबईच्या दादर आणि आसपासच्या उपनगरात गेलेल्या आयुष्याचे आणि आठवणींचे तुकडे चिकटलेले आहेत. त्या आठवणी एकाच वेळी मजेदार आणि हृद्य आहेत. तीनचार दशकांपूर्वीचा प्रदूषणमुक्त मुंबईतला हिवाळा कसा होता? ... तेव्हा नोव्हेंबरमध्येच हिवाळा दार ठोठवायचा. सहामाही परीक्षा नुकतीच आटोपलेली असायची आणि दिवाळी तोंडावर यायची... सुटीतील दुपारसुद्धा उबदार असायची. व्हरांड्यात बसून गाण्याच्या भेंड्या रंगायच्या आणि भूतांच्या गोष्टी ऐकण्यात लांब झालेली रात्र सरायची...तेव्हा मुंबईत ट्रेलर बस असायच्या. ही वळणावर थोडीशी तिरपी व्हायची. समोरच्या खिडकीजवळ बसलेल्या लोकांना खूप मज्जा यायची. या बसने बाबांबरोबर प्रवास करताना एकदा चुकून बाबा अलीकडच्या स्टॉपवर उतरले आणि दहा वर्षांची प्रिया नेहमीच्या स्टॉपवर उतरली. तेव्हा तिला दिसले बिचारे बाबा. धापा टाकीत धावत पळत येत होते. 

पुस्तकात अशा असंख्य आठवणी आणि गाणी आहेत. सगळ्यांचा उल्लेख करणे अशक्‍य. पण पुस्तक वाचून झाल्यावर दोन ओळी ओठांवर येतात...  
अभी ना जाओ छोडकर, 
    की दिल अभी भरा नहीं. 
 

संबंधित बातम्या