अस्वस्थ करणारे वास्तव

विजय तरवडे
सोमवार, 8 एप्रिल 2019

पुस्तक परिचय
 

‘नागकेशर’ ही विश्वास पाटील यांची नवी कादंबरी पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकारी चळवळीच्या पार्श्वभूमीवर गावगाड्यातल्या राजकारणाचे चित्रण करते. हे चित्रण राजकारणाचा क्रूर आणि उग्र चेहरा दाखवते. 

सन १९६४ मध्ये आलेल्या शंकर पाटील यांच्या ‘टारफुला’ कादंबरीत तत्कालीन गावगाडा आणि स्थानिक सत्ताकारण रेखाटले होते. 

‘नागकेशर’ ही कादंबरी ‘टारफुला’च्या खूपच पुढचे ‘व्हर्जन’ म्हणावे अशी. गजरा साखर कारखान्यातील कौटुंबिक सत्तासंघर्ष आणि राजकारण पुढे राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाला जाऊन भिडते. बापूनगर, गजरा सहकारी कारखाना, वैद्यकीय महाविद्यालय यांवर डोंगरे-देशमुख घराणे या एकाच कुटुंबातील सहकार महर्षी बापूराव आणि बबननाना या दोन भावांची पक्की मांड आहे. त्यापैकी बापूराव थोरले. त्यांचा मुलगा प्रिन्स संवेदनशील, कलासक्त वगैरे असल्याने त्याला सत्ताकारणात रस नसेल व पुढच्या पिढीत सगळी सत्ता आपल्या हाती येईल, असा धाकट्या नानांच्या मुलाचा (बाजीराव) कयास असतो. अचानक प्रिन्स सत्ताकारणात दाखल होतो. बापूराव पुतण्याऐवजी मुलाला आपला राजकीय वारस म्हणून जाहीर करतात आणि संघर्षाला सुरुवात होते. बाजीरावाची पत्नी नेत्रा हिची मुळात प्रिन्सशी लग्न करायची इच्छा, पण तिचे बाजीरावाशी लग्न झाले आहे. बाजीरावाच्या हातात सत्ता यावी म्हणून ती सासूच्या मदतीने अनेक कारस्थाने रचते. प्रिन्स एका कंत्राटदाराने छळ केलेल्या पत्नीला, शलाकाला घरी आश्रय देतो आणि स्वतःचे ठरलेले लग्न मोडून शलाकाशी विवाहबद्ध होतो. शलाका शिक्षित असल्याने साखर कारखाना, वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासनात जातीने लक्ष घालते. बघता बघता सर्वत्र लोकप्रियदेखील होते. नाना-चंचला, बाजीराव-नेत्रा ही चौकडी असंतुष्ट बॅंकर आणि इतरांच्या मदतीने प्रिन्स-शलाकाविरुद्ध कारस्थाने करीत राहतात. पण यश त्यांना हुलकावणी देत राहते. संघर्ष टाळण्यासाठी प्रिन्स-शलाका सहकारी साखर कारखान्याची सत्ता बाजीराव-नेत्राला देतात, पण त्यांना ती सांभाळता येत नाही. सत्ता पुन्हा प्रिन्स-शलाकाकडे येऊ बघते. एका प्रसंगी पंतप्रधानपदाचे उमेदवार शास्त्री शलाकाच्या हजरजबाबीपणाने आणि हुशारीने प्रभावित होतात. शलाकाला लोकसभेचे तिकीट मिळते. शलाका ते नाकारून प्रिन्सला खासदारकी मिळवून देते. दरम्यान बाजीराव-नेत्राचा गुंड मुलगा सुपरप्रिन्स गावभर उच्छाद मांडतो. शलाकाला आधीच्या पतीपासून झालेल्या अभिषेकचे कान भरून त्याला बाजीरावच्या घरात आश्रय दिला जातो. विधानसभा निवडणुकांच्या वेळी शलाका आणि बाजीराव एकमेकांविरुद्ध उभे राहतात. शलाकाचा पहिला पती रमेशदेखील शलाकाविरुद्ध उभा असतो. विखारी प्रचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जातात. निवडणुका रद्द व्हाव्यात अशा हेतूने सुपरप्रिन्स रमेशचा चारचौघात खून करतो. हे पाहून अभिषेकचे मन पालटते. शेवटी शलाकाचा कसाबसा अल्प मताधिक्‍याने विजय होतो. 

नागकेशरचे कथासूत्र असे सरळसोट, घटनाप्रधान आणि बांधेसूद आहे. गतिमान असल्याने वाचनीय झाले आहे. कंटाळा न येता एका बैठकीत सलगपणे कादंबरी वाचली जाते. बापूरावांच्या कुटुंबातले भारदस्त भाषेतले संवाद वगैरे वाचताना अनेकदा ऐतिहासिक कादंबरीचा भास होतो. सुरुवातीला बापूराव आणि प्रिन्सच्या स्वभावाचे चित्रण वाचले, की पुढे डॉन कॉर्लीओन आणि त्याचा मुलगा मायकेल कॉर्लीओन यांच्या कथानकासारखे काही मिळेल असा तर्क करणारा वाचक फसतो. कादंबरी खास मराठमोळीच आणि ओरिजनलच राहते. बापूरावांच्या पूर्वायुष्यातल्या दोन गोष्टी उपकथानकांसारख्या येतात. एका प्रसंगी ते मुलीच्या मैत्रिणीचा विनयभंग करतात आणि ती आत्महत्या करते. मुख्यमंत्री शेळके तरुण असताना बापूरावांनी त्यांच्या पत्नीला फूस लावून काही दिवस पळवून नेलेले आहे आणि त्याचा राग शेळके मनात धरून आहेत. विधानसभा निवडणुकांच्या वेळी शेळके हा जुना डूख स्मरून प्रिन्स-शलाकावर सूड उगवण्याचा असफल प्रयत्नदेखील करतात.   

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात समाजवादी किंवा कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वैयक्तिक पातळीवर काम करून उभारलेली छोटी छोटी बेटे आढळतात. सत्तेवर येण्याची त्यांच्यात ताकद नसते. पण ती नष्टदेखील होत नाहीत. ‘नागकेशर’मध्ये असे एक कॉम्रेड बजाप्पा गांगुर्डे आहेत. मोठा स्कॅम दिसत असला, तरी तो छापू न शकणारे अल्प ताकद असलेले स्थानिक पत्रकार आहेत. कंत्राटदार रमेशच्या बायकोला प्रिन्स आपल्या घरात आश्रय देतो आणि तिच्याशी लग्न करायचे ठरवतो. आपल्या बायकोला प्रिन्सने पळवल्याची तक्रार द्यायला रमेश पोलिसांकडे जातो, तेव्हा एफआयआर दाखल करायला घाबरणारे स्थानिक पोलिस अधिकारी आहेत. या सगळ्या कोलाजमधून विद्यमान समाजरचनेचे एक उग्र हिडीस रूप समोर उभे राहते आणि वाचकाला अस्वस्थ करते.   

‘नागकेशर’ ही कादंबरी आपल्याला सहकाराने समृद्ध झालेल्या (समृद्ध झाल्याचा दावा करणाऱ्या) ग्रामीण प्रदेशातील तळागाळातला मतदार, राजकारणी यांच्याबरोबर हात धरून मंत्रालयाच्या दारापर्यंत नेते. खेड्यातील काय किंवा शहरातील काय, सामान्य मतदाराचे लेखकाने केलेले एक उदाहरण वानगीदाखल पहा - 

शेवटच्या टप्प्यात मतासाठी रोख रकमेचे वाटप केले जाते... मतदारराजाही अशी लक्ष्मी स्वीकारायला ओशाळत नाही. तो एका वेळी एका मतासाठी अनेकांकडून अमाऊंट घेतो. त्यासाठी आपल्या लहान मुलाच्या मस्तकावर हात ठेवतो. बऱ्याचदा पैसे एकाचे आणि मत दुसऱ्याला. खोट्या शपथा घेतल्या म्हणून कोणाचीही मुले मरत नाहीत. उलट पाच वर्षांनी नव्या निवडणुका लागेपर्यंत ती मुले लोकशाहीच्या दृष्टीने अधिक सक्षम बनतात. फुकटची दारू प्यायला आणि सिगारेटी ओढायला शिकण्याइतके त्यांचे ‘सबलीकरण’ होते.

‘नागकेशर’ अशी वास्तवाला कोणताही गोंडस मुलामा न देता बोलत राहते, त्यामुळे वाचून झाल्यावर बराच वेळ आपण अस्वस्थ राहतो.   

कादंबरीच्या नावाविषयी थोडेसे - नागकेशराचा वेल हुमनी किड्यापेक्षा जालीम! रानात उगवला, तर बोल-बोल म्हणता अख्खा फड खाऊन फस्त करतो, असे कादंबरीच्या ब्लर्बमध्ये सांगितले आहे. आंतरजालावरील माहितीनुसार नागकेशर/नागकेसर ही औषधी वनस्पती असून अनेक आयुर्वेदिक उपचारात हिचा वापर केला जातो. 
 

संबंधित बातम्या