कवितांशी सलगी करणारे गद्य

विजय तरवडे
सोमवार, 16 डिसेंबर 2019

पुस्तक परिचय
 

‘शारदीय मोरपिसे’ हे थोड्या वेगळ्या प्रकारचे आस्वादक लेखन आहे. दीपाली दातार आणि गीतांजलि जोशी या लेखिकाद्वयीने आपल्याला आवडलेल्या विविध कवींच्या कवितांची रसग्रहणपर चिकित्सा केली आहे. काही कवींवर दीपाली दातार आणि काही कवींवर गीतांजलि जोशी यांनी लिहिले आहे. 

शाळकरी जीवनात भाबडेपणाने किंवा कळत्या वयात पदार्पण केल्यावर समजदारीनिशी वाचलेल्या आणि त्यातल्या आवडलेल्या कवितांच्या जन्मकथांविषयी सामान्य वाचकाच्या मनात कुतूहल असते. ही कविता कवीला कशी सुचली असेल, आपल्याला आवडणारी कविता लिहिणारा कवी ‘दिसतो कसा आननी’ हे जाणून घेण्याचीही त्याला जिज्ञासा असते. पण कवितेच्या छापील आवृत्तीपलीकडे, कवीपर्यंत जाण्याचा रस्ता प्रत्येक वाचकाला ठाऊक किंवा उपलब्ध असतोच असे नाही. वाचक जास्तीत जास्त काय करू शकतो, तर कवितेचे पुस्तक विकत घेऊन स्वतःच्या संग्रहात ठेवू शकतो, क्वचितप्रसंगी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात कवी प्रत्यक्ष भेटला तर त्याची स्वाक्षरी घेऊ शकतो... आणि इथे त्याची त्या कवितेशी, कवीशी सलगी थांबते. एखादा दिवंगत कवी काही काळजाला भिडणारे लिहून गेला असेल तर इतकीही सलगी शक्य नसते. 

दीपाली आणि गीतांजलि यांच्या मनात कवितांच्या जन्मकथांचा शोध घेण्याची आणि त्यावर आस्वादक लेखन करण्याची कल्पना आली. यापूर्वी त्यांनी काही कवितांचे आणि कवींचे किस्से वाचले असतील. इंदिरा संत आणि शांता शेळके यांनी या प्रकारचे लेखन पूर्वी केले आहे, त्यांच्या कवितांवरदेखील इतरांनी भरभरून लिहिले आहे. कविता जन्माला कशी येते? वाचकांपर्यंत कशी आणि कोणत्या चेहऱ्याने पोचते यावर दोघींनी लिहायचे ठरवले. काही कविता निवडल्या. कवितांच्या निमित्ताने त्या त्या कवींबद्दलही लिहून वाचकांचे कुतूहल शमवण्याचा प्रयत्न केला. एकूण सत्तेचाळीस कवींवर त्यांनी लेखन केले. त्यातील निवडक तीस लेखांचा ‘शारदीय मोरपिसे’मध्ये समावेश आहे. दोघींनी निवडलेल्या त्यांच्या पसंतीच्या कविता म्हणजेच ही मोरपिसे. कवितांच्या निवडीसाठीचे व्यक्तिनिष्ठ निकष म्हणजे या दोघींना स्वतःला आवडलेल्या कविता. तरीही ही निवड एकारलेली वाटत नाही. 

गीतांजलि जोशींच्या पहिल्या लेखात अनिलांचा व्यक्तिगत परिचय करून दिल्यावर त्यांच्या ‘दशपदी’वर निरूपण आणि ‘सारेच दीप कसे मंदावले आता’ या कवितेचा अटळ आणि उचित उल्लेख केला आहे. ‘ऋण मातीचे’ या लेखात इंद्रजित भालेराव यांच्या कविता आणि ललित गद्यावर लिहिले आहे. एकमेकांपासून भिन्न प्रकृती-शैली असलेल्या गदिमा आणि खानोलकर या दोघांवर त्यांनी सारख्याच उत्कटपणे लिहिले आहे. बहिणाबाई चौधरी, बालकवी, बी. रघुनाथ, भा. रा. तांबे या मागच्या पिढीतील कवींवर लिहिताना आणि लेखनाच्या ओघात हृदय आठवणी सांगताना त्या आपल्याला मागच्या काळात घेऊन जातात. त्याच पिढीतील मनमोहन (मूळ नाव - गोपाळ नरहर नातू) या कलंदर आणि मुख्य प्रवाहापासून किंचित फटकून राहिलेल्या कवीची ‘ती पहा, ती पहा बापूजींची प्राणज्योती’ ही पाठ्यपुस्तकात वाचलेली कविता कोण विसरेल? मनमोहन कलंदर कवी होते, तसेच कादंबरीकारदेखील होते. नव्या पिढीतील वाचकांना त्यांचा परिचय रोचक आणि हृद्य वाटेल. वसंत बापट हे किमान दोन पिढ्यांचे उंबरठे ओलांडून प्रत्येक पिढीत लोकप्रिय झालेले कवी. ‘श्यामची आई’साठी ‘घनदाट रानी वाहे झुळझुळ पाणी’, ‘छडी लागे छमछम’ आणि ‘उंबरठा’साठी ‘गगन सदन तेजोमय’ लिहिणारे टवटवीत कवी स्वातंत्र्य मिळाल्यावर ‘शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट’देखील लिहितात आणि ‘आम्ही जाणारच की कवातरी पटदिशी’ ही अखेरच्या विनवणीची कविता ऐकवून श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणतात. विंदा करंदीकर (अजबखाना, माझ्या मना बन दगड), वि. दा. सावरकर (‘माझी जन्मठेप’, ‘काळे पाणी’, शिवाजी महाराजांची आरती, सागरा प्राण तळमळला, ‘संन्यस्त खड्ग’मधली पदे) आणि ‘माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य’ अर्थात सुरेश भट यांच्या विविध रसांनी परिपूर्ण काव्यावर गीतांजलिंनी सफाईदारपणे आणि भरभरून लिहिले आहे. सुरेश भटांच्या ‘आज गोकुळात रंग’, ‘सुन्या सुन्या मैफलीत’, ‘मालवून टाक दीप’ या लोकप्रिय गीतांची आठवण करून दिली आहे. 

दीपाली दातार यांनी लेखनासाठी अंजली कुलकर्णी, अनिल कांबळे, आसावरी काकडे, अरुणा ढेरे, इंदिरा संत, कुसुमाग्रज, धामणस्कर, मर्ढेकर, बोरकर, रमेश गोविंद वैद्य, रॉय किणीकर, वा. रा. कांत, डॉ. चिंधडे, सुधीर मोघे, डॉ. संगीता बर्वे, संदीप बर्वे यांच्या कवितांची निवड केली आहे. इंदिरा संत यांची कविता – विशेषतः ‘शेला’ हळुवार भाषेमुळे मागच्या पिढीपासून आजच्या पिढीपर्यंत आवडीने वाचली आणि आस्वादली जाते. इंदिराबाईंवर वाचताना वाचक नकळत जुन्या बेळगावमध्ये फेरफटका मारून येतो. क्रांतीपासून प्रीतीपर्यंत जवळपास सर्व रसांचा प्रभावी आविष्कार ज्या कुसुमाग्रजांच्या कवितेत आढळतो त्यांच्या ‘गर्जा जयजयकार’ आणि गांधीजींच्या पुतळ्याचे मनोगत सांगणाऱ्या कवितांवर दीपाली यांनी भरभरून लिहिले आहे. धामणस्कर वयाने ज्येष्ठ असले तरी नव्या वाचकांमध्ये परिचित आणि लोकप्रिय आहेत ते त्यांच्या ‘प्राक्तनाचे संदर्भ’, ‘बरेच काही उगवून आलेले’ आणि ‘भरून आलेले आकाश’ या तीन संग्रहांमुळे. त्यांच्या कवितेतील रसरशीत निसर्गाचा आविष्कार आणि त्याचा उलगडा दीपालीने उत्कटपणे मांडला आहे. आनंदयात्री बोरकरांची गेय कविता, त्यांच्या कवितेतून डोकावणारा देखणा गोमंतक आजही नॉस्टॅल्जिक न करता आनंद देतो. वा. रा. कांत यांची ‘आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको’ किंवा ‘बगळ्यांची माळ झुले’ ही गीते लोकप्रिय आहेत खरी, पण स्वातंत्र्यपूर्व काळात उस्मानिया विद्यापीठात ‘वंदे मातरम’ला बंदी आली तेव्हा त्या बंदीविरुद्ध पेटून उठलेले मनही त्यांच्या क्रांतिगीतात प्रकटते. संदीप खरे हे नव्या शतकाचे लोकप्रिय गीतकार आणि कवी. ‘आयुष्यावर बोलू काही’ हा त्यांचा लोकप्रिय कार्यक्रम. त्यांच्या मला विशेष आवडलेल्या ‘आताशा मला हे असे काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते’ हा उल्लेख विशेष सुखावून गेला.

संबंधित बातम्या