काश्‍मिरी स्त्रियांचा शांत आवाज

विनया केसकर
सोमवार, 18 मार्च 2019

पुस्तक परिचय
 

विकास प्रकाशनचे ‘हे शांततेचे बोलणे - काश्‍मिरी स्त्रियांचा आवाज' या पुस्तकातील लेख वाचताना, काश्‍मिरी स्त्रियांच्या प्रदीर्घ हालअपेष्टा आणि लढ्यावर झगझगीत प्रकाश पडतो. बुरखा घालण्याच्या फतव्यांना विरोध करणाऱ्या विद्यार्थिनी, खोरं सोडून जायला ठाम नकार देणाऱ्या शीख मुली, काश्‍मीरमध्ये जिद्दीने ठाण मांडून बसलेल्या पंडित स्त्रिया अशा स्त्रिया या पुस्तकात भेटतात, वाचक म्हणून मनाला भावतात. चौदाव्या शतकात होऊन गेलेल्या ‘लाल देद’ या स्त्री संतांच्या शिकवणुकीचा प्रभाव आजही सगळे काश्‍मिरी (मुस्लीम आणि हिंदू) मान्य करतात. इतक्‍या टोकाच्या संघर्षातदेखील लाल देद यांची शिकवण टिकून राहत असेल, तर एक ना एक दिवस काश्‍मीर शांत होईल, अशी आशा संपादक उर्वशी बुटालीया यांनी त्यांच्या प्रस्तावनेत व्यक्त केली आहे. ३२२ पाने असलेल्या या पुस्तकाचा अनुवाद बिपीन कार्यकर्ते यांनी केला आहे, मालिका संपादन कविता महाजन यांनी केले आहे. 

‘हे असं घडलं काश्‍मीरमध्ये’ - कृष्णा मेहता, ‘काश्‍मिरी ऋषीपंथातील स्त्रियांचं स्थान’- योगिंदर सिकंद, ‘कैदेतील काश्‍मीर : एक अहवाल’, ‘काश्‍मीरमधील स्त्रियांचं अनुभवकथन’, ‘कारगिल जिल्ह्यातील अंतर्गत विस्थापित स्त्रियांचं आरोग्य’- पामेला भगत, ‘सशस्त्र नंदनवनात सात दिवस'- उमा चक्रवर्ती, ‘स्वातंत्र्याचा नक्की अर्थ काय?’- रितू दिवान, ‘काश्‍मीरमधील एका मुलीच्या कॉलेजची कहाणी’- नीरजा मट्टू, ‘काश्‍मिरी दृष्टिकोन’- हमीदा बानो, ‘घर सोडून जाताना’- शक्तिमान खन्ना, ‘पंडितांची कहाणी’- क्षमा कौल, ‘काश्‍मीर खोऱ्यातील स्त्रियांच्या प्रतिमा’- शिबा छाछी, ‘रक्तलांच्छित जमीन’- सोनिया जब्बार, ‘काश्‍मीरमधील आरोग्यविषयक काम’- सेहबा हुसेन, ‘काश्‍मीर सफर’- सुशोभा बर्वे, ‘एक निवांत आणि स्वाभिमानी आयुष्य’- फरीदा अब्दुल्ला, ‘मुलाखती’ - पामेला भगत या लेखांमधून या संघर्षादरम्यान तेथील महिलांना येत असलेल्या निरनिराळ्या अनुभवांचा मागोवा प्रस्तुत पुस्तकात घेतला आहे. संघर्षाचा त्यांच्यावर कसा व काय परिणाम होत आहे? न थांबणाऱ्या हिंसाचाराशी त्यांनी कसं जुळवून घेतलं आहे? आपल्या वाट्याला आलेलं दु:ख व्यक्त करण्याकरिता अथवा इतरांबरोबर वाटून घेण्याकरिता त्या निरनिराळे मार्ग कशा शोधून काढतात? महिलांच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर संघर्षाचे नक्की काय व कसे परिणाम होत आहेत? आपल्यासाठी सहज असणाऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी अप्राप्य कशा होत आहेत? कुटुंबव्यवस्था, कुटुंबांतर्गत सत्ता-समीकरणे व एकूणच परस्पर संबंधांवर कसे परिणाम होत आहेत? मुलांवर काय परिणाम होत आहेत? काश्‍मिरी स्त्रियांच्या मुलाखती, वैयक्तिक, अनुभवकथन, विविध अहवाल आणि पुस्तकांतून घेतलेले लेखन, कोणाचेच फारसे लक्ष नसलेल्या संघर्षाच्या पैलूकडे लक्ष वेधण्याकडे यशस्वी ठरते. या कुटुंबांवर आलेली वादळे, त्यामध्ये झालेली ससेहोलपट वाचून अंगावर काटा उभा राहतो. १९व्या प्रकरणात, काश्‍मिरी स्त्रियांच्या मनोगतातील वाक्‍ये अवतरण चिन्हांत मांडून वस्तुस्थिती समजून घ्यायला अधिक मदत होते. या एका उदाहरणावरून काश्‍मिरी स्त्रियांच्या मनातील उदासीनता, विषण्णता आणि निराशा लगेच लक्षात येते, प्रत्येक आईला, बहिणीला, पत्नीला हाच अनुभव आला आहे. पण आता आम्ही दगड बनलो आहोत. सवय झाली आहे आम्हाला. जणू काही आयुष्य जगण्याची हीच खरी रीत आहे. सकाळी घरून निघताना संध्याकाळी जिवंत परत येऊ की नाही याची शाश्वती नसते. 

गेल्या काही वर्षात भारतातील राजकीय घडामोडींच्या पटलावर काश्‍मीर हा एक प्रमुख व कळीचा मुद्दा होऊन बसला आहे. दशकभराहून अधिक काळ चाललेल्या या संघर्षाचा तेथील जनजीवनावर अतिशय खोल असा परिणाम झाला आहे. उदरनिर्वाहाची साधने, घरदार, आरोग्य, खाण्यापिण्याच्या सवयी, कार्यालये, शिक्षण अशा अनेक सामाजिक अंगांच्या अनुषंगाने हा प्रभाव बघता येतो. त्यातही, महिलांवर झालेला परिणाम अजूनच ठळकपणे जाणवतो आणि तरीही काश्‍मीर संदर्भातील चर्चांमध्ये त्यांची दखल फारशी घेतली नाही. 

एका अत्यंत जटिल राजकीय समस्येचे मानवी स्वरूप समोर आणणारे हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचलेच पाहिजे. काश्‍मीर राज्यातील सर्व प्रमुख जनसमुहाचे मनोगत या पुस्तकातून अगदी व्यवस्थित मांडले आहे. या भागातील स्त्रियांच्या मनात चाललेल्या खळबळीचा, बेचैनीचा आणि वेदनेचा घेतलेला शोध म्हणजे हे पुस्तक. खोऱ्यातील हिंदू पंडितांचे आवाज इतकंच नव्हे, तर दुर्गम लडाखमधील अगदीच क्षीण आवाजांनादेखील या पुस्तकात स्थान मिळाले आहे. ‘हे शांततेचे बोलणे’ या शीर्षकाला न्याय देणारे असे हे पुस्तक एक वेगळी अनुभूती देणारे आहे.  
 

संबंधित बातम्या