बालकवितांची ‘आनंदबाग’

विनिता ऐनापुरे
शुक्रवार, 15 जून 2018

​पुस्तक परिचय
एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता ः स्वरूप आणि शोध
 लेखक : सदानंद पुंडपाळ.
 प्रकाशक : पाणिनी प्रकाशन, ठाणे. 
 किंमत : २००/- रु. 
 पाने : १८२
 

एकनाथ आव्हाड यांना बालसाहित्यकार म्हणून अवघा महाराष्ट्र ओळखतो. ते स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक आहेत. मुलांच्या सतत सहवासाचा परिणाम असा झाला, की ते कविता लिहू लागले तेच बालकवितांच्या रूपात!  वेगवेगळ्या प्रयोग करणाऱ्या कविता, मुलांवर केले जाणारे संस्कार, सोप्या भाषेत तरीही मुलांना समजतील अशा काव्यमय भाषेत एकनाथ आव्हाडांनी सहज बालकविता/बालकथा लिहिल्या. हसत खेळत आनंद देण्यात आव्हाड किंचितही मागे सरकत नाहीत. आजवर त्यांचे १० बालकवितासंग्रह, ६ बालकथासंग्रह, बालकोश खंड १ ते ५ असे विविधांगी लेखन लहान मुलांकरिता त्यांनी केले. हे लेखन करताना साने गुरुजींच्या विचारांचा, ध्येयाचा, संस्कारांचा प्रभाव आव्हाडांवर आहे.

आव्हाडांच्या समग्र बालकवितांचा अभ्यास सदानंद पुंडपाळ यांनी आस्वादक आणि चिकित्सक पद्धतीने केला. ‘एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता ः स्वरूप आणि शोध’ या ग्रंथातून समीक्षारुपाने मांडलेला आहे. अतिशय बारकाईने, डोळसपणे त्यांनी अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला आहे. एकनाथ आव्हाडांच्या बालकवितांविषयक कामगिरीचे संपूर्ण वाचन, आकलन आणि रसग्रहण पुंडपाळ यांनी केले आहे. आव्हाडही शिक्षक आणि पुंडपाळही शिक्षक दोघेही उत्साही, विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे आणि विद्यार्थ्यांना सतत आपल्याकडचं काहीतरी द्यायचं आहे या भावनेने झपाटलेले. त्यामुळे समसमा संयोग की जाहला असेच म्हणावेसे वाटते.

‘एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता ः स्वरूप आणि शोध’ या ग्रंथाचे तीन भाग होतात. पहिला भाग प्रस्तावना, दुसरा भाग समीक्षा आणि तिसरा भाग आव्हाडांना वेळोवेळी आलेली पत्रे.

ग्रंथाचा पहिला भाग प्रस्तावना म्हणण्याचे कारण या ग्रंथाला लाभलेली डॉ. किशोर सानप यांची १६ पानांची अतिशय अभ्यासपूर्ण प्रस्तावना. बालसाहित्याच्या उगमापासून जे आजच्या बालसाहित्यापर्यंत ते अतिशय सहज भाषेत वर्णन करतात. काळानुसार पुढे झालेल्या बालसाहित्यांची वैशिष्ट्ये सांगतात. बालसाहित्य लिहिणे हे येऱ्या गबाळ्याचे काम नोहे तर ‘तेथे पाहिजे जातीचे’असे म्हणत त्यांनी एकनाथ आव्हाडांच्या बालकवितेचे वेगळेपण सांगितले आहे. अश्रूंना लिहिणारे लेखक साने गुरुजी यांचा वारसा आव्हाडांनी पुढे चालवला आहे. तो कसा? हे सांगताना डॉ. सानप यांनी बालसाहित्याचे मूल्य, वैशिष्ट्ये आणि उगमस्रोत यांचीही चर्चा केली आहे. डॉ. सानपांची ही प्रस्तावना म्हणजे समीक्षेचा आदर्शच आपल्या पुढे उभा राहतो. 

या ग्रंथाच्या दुसऱ्या भागात श्री. एकनाथ आव्हाड यांच्या बालकवितांची सदानंद पुंडपाळ यांनी केलेली समीक्षा आहे. यात आव्हाड यांच्या बालकवितेचे स्वरूप, गुणधर्म, वैशिष्ट्ये, उमग, गेयता, आधुनिकता, बोलकी भाषा अशी नऊ प्रकरणे असून पुंडपाळ यांना स्वतःला आवडलेल्या भावकविता असे दहावे प्रकरण घेतले आहे. या सर्व प्रकरणातून पुंडपाळ आव्हाडांच्या बालकवितांचा अभ्यास केवळ चिकित्सक पद्धतीने नव्हे तर रोचक पद्धतीने मांडलेला आहे. प्रचंड मेहनत घेऊन अभ्यासपूर्ण अशी ही चिकित्सा आहे. तरीही ती कुठेही क्‍लिष्ट नाही. वर सांगितलेल्या दहा प्रकरणातून पुंडपाळ यांनी आव्हाडांच्या बालकवितेला यथार्थ न्याय दिलेला आहे. आव्हाडांना एक आघाडीचा उमदा बालसाहित्यकार, बालकवी अशी कौतुकाची विशेषणे देऊन त्यांना गौरविले आहे. आव्हाड हे केवळ बालसाहित्यकार नाहीत तर ते हाडाचे शिक्षकही आहेत. मुलांची नस त्यांनी ओळखली आहे, हे पुंडपाळ यांनी अतिशय मर्मग्राही शब्दात स्पष्ट केले आहे. 

सोपे लिहिणे हे अतिशय अवघड आहे. ते लहान मुलांकरिता आहे, याची सतत जाणीव ठेवून या कवितांना चाल लावून मुलांना तालासुरात म्हणता यावे अशी आव्हाड यांची बालकविता आहे. म्हणून पुंडपाळ यांनी एक सत्य अगदी सहज भाषेत सांगितले आहे, की बालकविता वाचनासाठी नसून मुख्यत्वे गाण्यासाठीच असते. 

आव्हाडांच्या बालकवितांचे समीक्षात्मक रसग्रहण पुंडपाळांनी केले आहेच. पण त्या निमित्ताने त्यांनी बालसाहित्याच्या जगात आव्हाड यांचे स्थान किती उंचावर आणि वेगळे आहे हे ही स्पष्ट केले आहे. त्यांच्या कवितांना पुंडपाळ आनंदबाग हा यथार्थ शब्द वापरतात. या आनंदासोबत निसर्ग, झाडे, पाने, फुले, पशुपक्षी, पाऊस, माणसांची नातीगोती, आपला देश, शास्त्रज्ञ अशा अनेकविध विषयांची झाडे, फुले डोलताना दिसतात आणि त्यामुळेच कवितेला अनुरूप अशी सुंदर चित्रेही या कवितांना फुलवताना दिसतात. 

एकूणच आव्हाडांच्या निमित्ताने पुंडपाळ यांनी बालकवितेचा प्रकल्प लिहून बालसाहित्यावर समीक्षा लिहिण्यात फार मोठी उंची गाठली आहे. केवळ बालांचा आनंद नाही तर मोठ्यांना, अभ्यासकांना, रसिकांनाही बालसाहित्याची ही महत्त्वपूर्ण समीक्षा. समीक्षेची एक नवीन वाट दाखवले याच संशय नाही.

पुस्तकाचा तिसरा भाग म्हणजे आव्हाडांना रसिकांची, साहित्यिकांची, समीक्षकांची कवितेच्या संदर्भात आलेली पत्रे. प्रत्येकाने आपापल्या परीने आव्हाडांच्या बालकवितोच वेगळे सौंदर्य सांगितले आहे.

या पत्र अभिप्रायानंतर सर्वांत शेवटी एकनाथ आव्हाडांचा परिचय दिला आहे. त्यातून त्यांनी लिहिलेल्या बालकवितांची, बालकथांची पुस्तके, बालकोश खंड १ ते ५, त्यांचे कथाकथन, संपादन, त्यांना मिळालेले पुरस्कार, अध्यक्षपदे त्यांच्या कवितांची ब्रेल लिपीत झालेली रूपांतरे वगैरे वाचतानाच या तरुण बालसाहित्यकांचे भवितव्य किती उज्वल आहे, याची फक्त चुणूकच दिसते. 

संबंधित बातम्या