'बातमीदारी'चे तंत्र व मंत्र

योगेश बोराटे 
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पुस्तक परिचय

बातमीदारी. पत्रकारिता करणाऱ्यांसाठी, पत्रकारिता करणाऱ्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्यांसाठी, पत्रकारिता क्षेत्राची आवड असणाऱ्यांसाठी आणि या क्षेत्राकडे वळू पाहणाऱ्यांसाठी हा तसा चर्चेचाच विषय. पत्रकारितेचा आणि या क्षेत्रामध्ये कार्यरत माध्यमसंस्थांचा थेट समाजासमोर अवतरणारा चेहरा असलेल्या ‘बातमीदार’ !. या एका महत्त्वाच्या घटकाशी थेट संबंधित असलेली ही क्रिया पत्रकारितेच्या एकूण विस्तारामध्ये सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावते. वेगवेगळ्या बातम्यांच्या निमित्ताने चर्चेला येणारे बातमीदार, त्यांची लेखनशैली, बातमी लेखनाच्या विषयांचे वेगळेपण आदी मुद्द्यांविषयी केवळ या क्षेत्रातील अभ्यासकच नव्हे, तर अगदी सर्वसामान्य वाचक आणि नागरिकही आपले भाष्य नोंदवितात. त्या अर्थाने पत्रकारिता क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात असूनही हा विषय सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरतो. मात्र हा विषय केवळ चर्चेपुरताच मर्यादित न राहता सैद्धांतिक आणि शास्त्रीयदृष्ट्याही त्याचे आकलन होण्यासाठी ‘बातमीदारी’ या पुस्तकाची चौथी आणि त्रिखंडात्मक आवृत्ती अभ्यासक- वाचकांसाठी उपयुक्त ठरू शकते. बातमीदारी या विषयाशी संबंधित सखोल आणि शास्त्रशुद्ध माहिती शुद्ध मराठीमधून उपलब्ध करून देण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी यांनी ‘बातमीदारी’ याच नावाने पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाचे संदर्भमूल्य, उपयुक्तता आणि त्याला मिळालेला प्रतिसाद विचारात घेतला, तर या पुस्तकाच्या पहिल्या तीन आवृत्त्या सहजच कशा संपल्या, हे सुजाण वाचकांना समजू शकते. त्याच आवृत्त्यांच्या साखळीतील पुस्तकाची पुढची आवृत्ती राजहंस प्रकाशनाने नुकतीच बाजारामध्ये आणली आहे. पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीपासूनच या पुस्तकाने ‘शुद्ध मराठीमधून उपलब्ध असलेला बातमीदारीविषयीचा विशेष आणि विश्वसनीय संदर्भग्रंथ’ असा मान मिळविलेला आहे. नव्या अभ्यासकांच्या जोडीने नवपत्रकारांनाही बातमीदारीचे अंतरंग जाणून घेण्यासाठीच्या गरजा नेमकेपणाने पूर्ण करण्यामध्येही हे पुस्तक यशस्वी ठरले आहे. या पुस्तकाची चौथी आवृत्ती हा लौकिक वाढविणारी ठरली आहे. पुस्तकाच्या आकारामधील कालसुसंगत बदलांप्रमाणेच, बातमीदारीच्या क्षेत्रातील बदलांचा आढावा घेण्यासाठीही लेखकाने या आवृत्तीच्या माध्यमातून केलेली मेहनत तीन पुस्तकांचा हा संच आपल्यासमोर मांडत आहे. 

या पूर्वीच्या आवृत्त्यांप्रमाणेच या आवृत्तीमध्येही समाविष्ट असलेली ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची प्रस्तावना या पुस्तकाच्या महत्त्वाची जाणीव वाचकांना करून देते. बातमी, पत्रकारिता, बातमीचे वर्तमानातील महत्त्व आणि त्याच अनुषंगाने बातमीदाराचे कर्तृत्व अशा मुद्द्यांचा आढावा केतकर यांनी प्रस्तावनेतून घेतला आहे. त्या पाठोपाठ चौथ्या आवृत्तीच्या निमित्ताने लेखकाने लिहिलेले मनोगत हे या आवृत्तीचे यापूर्वीच्या तीन आवृत्त्यांपेक्षा असणारे वेगळेपण अधोरेखित करत आहे. पुस्तक लेखनाच्या प्रक्रियेमध्ये मोलाची मदत करणाऱ्या विशेषतज्ज्ञ बातमीदारांचा मनोगतामधील गौरवोल्लेख हा लेखकाची त्यांच्याविषयीची प्रामाणिक कृतज्ञता दर्शविणारा ठरतो. या आवृत्तीच्या तिन्ही भागांमधून सातत्याने समोर येणारे महत्त्वाचे मुद्दे म्हणून आपण काही बाबींचा निश्‍चितच विचार करू शकतो. एखादी घटना वा विषय बातमी ठरण्यापूर्वीचे नानाविध बदल, बातमीदारांच्या पातळीवर हे बदल बातमी म्हणून स्वीकारार्ह ठरण्यासाठीच्या विविध चाचण्या आणि त्या निमित्तानेच आवश्‍यक असणारे विचारमंथन, बातमी लेखनापूर्वीची आणि लेखन होत असतानाच्या प्रक्रिया, बातमी निर्मितीचे टप्पे, त्याचे परिणाम आदी बाबींचा या भागांमधून सचित्र आणि बातम्यांच्या उदाहरणांसह आढावा घेण्यात आला आहे. बातमीदारी जाणून घेण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येकालाच हे मुद्दे या पुस्तकाचा सातत्याने विचार करण्यास भाग पाडतात. चौथ्या आवृत्तीचे तीन भागांमधून केलेले विभाजनही अभ्यासकांसाठी सोयीचे असेच ठरते. ‘बातमीदारी भाग १’ या पुस्तकामध्ये बातमी आणि बातमीलेखनाच्या मूलभूत कौशल्यांची माहिती मांडण्यात आली आहे. त्यामध्ये बातमीच्या व्याख्या, बातमीलेखनाचे आराखडे आणि तत्त्वे, मुलाखती, प्रसिद्धिपत्रके, भाषणे व व्याख्याने, निधनवृत्त, शोधपत्रकारिता, विश्‍लेषणात्मक बातमीदारी अशा बातमीदारीच्या नानाविध पातळ्या, बातमीदारांसाठीचे मराठी, बातमीदार आणि कायदे या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला आहे. ‘बातमीदारी भाग २ ’ हे पुस्तक नानाविध क्षेत्रांच्या वार्तांकनाला वाहिलेले ठरते. त्यामध्ये विशिष्ट क्षेत्राचे वार्तांकन वा ‘बीट’ म्हणजे काय, या व्याख्येपासून ते वेगवेगळ्या बीटच्या बातमीदारीपर्यंत सर्व टप्पे समाविष्ट करण्यात आले आहेत. महापालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नागरी प्रश्न, गुन्हेगारी, न्यायालय, शिक्षण, आरोग्य, महसूल यंत्रणा, माहिती-तंत्रज्ञान आदी क्षेत्रांशी संबंधित बातमीदारी नेमकी चालते कशी, त्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा विचार केला जातो, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे या क्षेत्रांच्या बातमीदारीमध्ये नेमके काय बदल होत आहेत आदी मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे. 

‘बातमीदारी भाग ३’ या पुस्तकामध्ये लेखकाने बातमीदारीचे इतर विषय, विकास पत्रकारिता आणि पत्रकारितेतील नीतिमूल्ये या मुद्द्यांचा समावेश केला आहे. या भागामधून वाचकांना अर्थ- उद्योग आणि व्यापार, साहित्य- संस्कृती आणि कला, शेती-पाणी, पर्यावरण- हवामान आदी विषयांना वाहिलेल्या बातमीदारीच्या स्वरूपाचे आकलन होणे शक्‍य झाले आहे. त्याच जोडीने आबालवृद्धांसाठी या ना त्या कारणाने चर्चेचा विषय असलेल्या निवडणुकांच्या वार्तांकनाचे बारकावेही हा भाग आपल्यासमोर मांडत आहे. 

या तिन्ही भागांमधून लेखकाने बातमीदारी या विषयाचा सखोल आढावा घेण्यासोबतच आपल्याला या विषयाच्या तंत्र आणि मंत्राची बारकाव्यांसह ओळख करून दिली आहे. डिजिटल माध्यमांचे वाढलेले महत्त्व विचारात घेत बातमीदारीच्या स्वरूपामध्ये होत असलेल्या बदलांबाबतही या पुस्तकांमधून सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठीही ही पुस्तके उपयुक्त ठरण्याविषयीचा लेखकाचा आशावाद या पुढील काळात वास्तवात उतरेल, याविषयी कोणत्याही शंका वाटत नाहीत. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या