सिंपल फ्रूट केक्स

वैशाली खाडिलकर, मुंबई
सोमवार, 23 डिसेंबर 2019

केक स्पेशल
ख्रिसमसनिमित्त लहान मुलांसाठी त्यांच्या आवडीचे केक मागवले जातात. पण हेच केक बाहेरून न मागवता मुलांच्याच मदतीने घरी करता आले, तर मुलांचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल... मुलांच्या मदतीने करता येतील अशा फ्रूट केक्सच्या सिंपल रेसिपीज... 

क्रॅनबेरी केक (प्रेशर कुकर पद्धत) 
साहित्य : एक कप गव्हाचे पीठ, २ टेबलस्पून सातू पीठ, १ कप लोणी किंवा बटर, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, २ टेबलस्पून अक्रोड-बदामचे बारीक तुकडे, ४ टेबलस्पून क्रॅनबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी यांपैकी उपलब्ध असलेल्या एका फळांचा क्रश, अर्धा टीस्पून वेलची जायफळपूड, ब्राऊन शुगर पावडर जरुरीप्रमाणे. 
कृती : एका वाडग्यात पिठीसाखर व लोणी चांगले फेटावे. त्यात वेलची जायफळपूड घालून पुन्हा फेटावे. त्यात सत्त्व, सातू पीठ, ताक, बेकिंग पावडर घालून हॅंडब्लेंडरने मिश्रण मऊसूद करावे. त्यात अक्रोड-बदाम तुकडे, क्रॅनबेरी क्रश घालून पुन्हा चांगले फेटावे. केक टीनला ब्रशने बटर लावून त्यावर हे मिश्रण ओतावे. प्रेशरकुकरमध्ये तळाशी दोन कप जाडे मीठ घालावे व कुकरची जाळी ठेवून झाकण लावावे. शिटी व गोल रबर काढावा व मोठा गॅस ठेवून १० मिनिटे तापवावे. नंतर झाकण उघडून जाळीवर केक टीन ठेवावा व झाकण लावावे. मध्यम आच ठेवावी. ४० ते ५० मिनिटे शिजवावे. केकचा छान सुगंध येऊ लागला की गॅस बंद करावा. १० मिनिटांनी झाकण उघडून केक टीन बाहेर काढावा. जरासा आपटावा व केक काढून प्लेटमध्ये ठेवावा. नंतर चाळणीत ब्राऊन शुगरची पावडर घालावी व केकवर पाडावी. 
टीप : हा केक करताना दरवेळी वेगळी फळे वापरावीत आणि केक सजावटीचे काम मुलांना द्यावे.


मिक्‍स फ्रूट-बिस्कीट केक  
साहित्य : दहा गुड-डे बिस्किटे, १० व्हॅनिला क्रीम बिस्किटे, अर्धा कप मिक्‍स फ्रूट ज्यूस, दूध आवश्‍यकतेनुसार, ४ टेबलस्पून किंवा आवडीप्रमाणे बटर, ड्रायफ्रूट्स‌चे तुकडे, १ कप नाचणीचे रवाळ पीठ 
कृती : मिक्‍सरमध्ये बिस्किटांची रवाळ पावडर करावी. ती काचेच्या बोलमध्ये घ्यावी. त्यात मिक्‍स फ्रूट ज्यूस व पिठीसाखर आणि नाचणी पीठ आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्सचे तुकडे, दूध घालून हॅंडब्लेंडरने चांगले घुसळावे. केक टीनला बटर लावावे व त्यात हे मिश्रण ओतावे. ओव्हन १८० अंश सेल्सिअसवर प्रीहीट करावा. २० ते २५ मिनिटे बेक करावे. तयार केकवर सजावट करावी.


पीच-लाल भोपळ्याचा केक  
साहित्य : एक कप शिजवलेल्या लाल भोपळ्याची प्युरी, १ कप पीच फळाची प्युरी, १ कप किसलेला गूळ, २ कप गव्हाची कणीक, दुधात खललेले केशर, २ टेबलस्पून किंवा जरुरीप्रमाणे मध, चिमूटभर इनो सॉल्ट, २ टेबलस्पून वितळलेले लोणी 
कृती : लाल भोपळ्याचे तुकडे कुकरमध्ये शिजवून त्याची प्युरी करावी. पीच फळांचीही प्युरी करावी. हे दोन्ही मोठ्या वाडग्यात घ्यावे. त्यात किसलेला गूळ, लोणी, कणीक, मध घालून हॅंडब्लेंडरने फेटून घ्यावे. दुधात खललेले केशर व इनो सॉल्ट घालून पुन्हा चांगले फेटावे. केकटीनला बटर लावावे व प्रीहीटेड ओव्हनमध्ये अर्धा तास बेक करावे.


बनाना/चॉकलेट मग केक  
साहित्य : पंचवीस ग्रॅम नारळाची पावडर, २५ ग्रॅम नाचणी आटा, १५ ग्रॅम बटर, १ कप पिकलेल्या केळ्याचा लगदा, अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर, १५ ग्रॅम फ्रुटी लेमन योगर्ट, १ टेबलस्पून कोको पावडर, कणभर मीठ, ५० ग्रॅम क्रीम चीज, ५० ग्रॅम व्हीप क्रीम, १५ ग्रॅम पिठीसाखर, ४ थेंब व्हॅनिला इसेन्स, पाव टेबलस्पून लेमन झेस्ट (हे एका मग केकचे साहित्य आहे). 
कृती : काचेच्या बोलमध्ये नारळ पावडर, नाचणी आटा, मीठ, कोको व बेकिंग पावडर एकत्र करावे. दुसऱ्या बोलमध्ये बटर, केळ्याचा लगदा, योगर्ट हे सर्व पदार्थ हॅंडब्लेंडरने फेटावे. हे मिश्रण पावडर मिश्रणात ओतावे. छानशा मगला बटर लावावे व त्यात हे मिश्रण ओतावे. प्रीहिटेड ओव्हनमध्ये १०५ अंश सेल्सिअसवर २० मिनिटे बेक करावे. थंड होऊ द्यावे. केकला चकाकी येण्यासाठी क्रीम चीज, व्हीप क्रीम, व्हॅनिला इसेन्स, पिठीसाखर, लेमन झेस्ट हे चांगले एकजीव करून केकवर ओतावे. हवे असल्यास हा मग केक फ्रीजमध्ये थंड करून सर्व्ह करावा. गरजेप्रमाणे आणखी मग घेऊन केक करावेत.


कोकोनट-ऑरेंज केक   
साहित्य : एक कप गव्हाची कणीक, सव्वा कप किंवा जरुरीप्रमाणे ब्राऊन शुगर, पाव कप मध, अर्धा कप ओला नारळचव, पाव कप तूप, पाव कप ताजा संत्रारस, नारळपाणी गरजेनुसार, १ टेबलस्पून बेकिंग पावडर, १ टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स, बटर. 
कृती : काचेच्या बोलमध्ये गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर चाळून घ्यावी. दुसऱ्या बोलमध्ये तूप, ब्राऊन शुगर चांगले फेटून त्यात घालावे. नारळचव कोरडा गुलाबीसर परतून घ्यावा व त्यात घालावा. संत्रारस, व्हॅनिला इसेन्स घालून हॅंडब्लेंडरने एकजीव करावे. मिश्रण घट्टसर होत असल्यास गरजेप्रमाणे नारळाचे पाणी घालावे. हे झाले केकचे मिश्रण तयार. केक पात्राला बटर लावावे व हे मिश्रण त्यात ओतावे. प्रीहिटेड ओव्हनमध्ये १८० अंशावर १५ ते २० मिनिटे बेक करावे. केक झाला का तपासून बघावे. त्यासाठी त्यात सुरी खोचून बघावी, सुरी काहीही न चिकटता बाहेर आली की केक झाला असे समजावे. तयार केक प्लेटमध्ये काढावा व त्यावर भाजलेला नारळचव पेरावा.


टी-टाइम स्ट्रॉबेरी केक  
साहित्य : एक वाटी रवा, ४ टेबलस्पून रताळ्याचे सत्त्व, पाव टेबलस्पून वेलचीपूड, १ टेबलस्पून गुलाब इसेन्स, १ टेबलस्पून गुलाबपाणी, अर्धी वाटी पिस्ता काप, १ वाटी दही, १ वाटी पाणी, पाऊण वाटी बटर, १ वाटी पिठीसाखर, प्रत्येकी अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर व बेकिंग सोडा, अर्धा टेबलस्पून ऑरगॅनिक गुलाबी खायचा रंग, अर्धी वाटी स्ट्रॉबेरीचा रस. 
कृती : ओव्हन १८० अंशावर प्रीहीट करावे. एका वाडग्यात रताळ्याचे सत्त्व, रवा, बेकिंग पावडर व सोडा चाळून घ्यावा. त्यात पिस्त्याचे काप घालावे. दुसऱ्या वाडग्यात दही, बटर, साखर, पाणी, रोझ इसेन्स घेऊन हॅंडब्लेंडरने साखर विरघळेपर्यंत ढवळत राहून एकजीव करावे. नंतर त्यात स्ट्रॉबेरी ज्यूस, सत्त्व, पिस्त्याचे मिश्रण घालून एकत्र करावे. काचेच्या बेकिंग डिशला बटर लावावे व त्यात हे मिश्रण ओतावे. अर्धा तास ओव्हनमध्ये बेक करावे. थंड होऊ द्यावे. तयार केकवर पिस्ता काप व सुकलेल्या गुलाब पाकळ्यांनी सजवावे.


किवी मार्बल केक
साहित्य : एक कप मैदा, ४ टेबलस्पून मऊसर बटर, ६ टेबलस्पून मिल्क पावडर, अर्धा कप पिठीसाखर, १ कप दूध, १ टीस्पून रोझ इसेन्स, १ टीस्पून बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ, अर्धा कप किवीची प्युरी आणि चेरीचे तुकडे.
कृती : बोलमध्ये मैदा, बेकिंग पावडर व सोडा दोन वेळा चाळून घ्यावा. दुसऱ्या बोलमध्ये साखर, मिल्क पावडर, बटर व रोझ इसेन्स इलेक्ट्रिक बीटरने मऊसूद फेटून घ्यावे. त्यात हळूहळू मैदा मिश्रण व दूध घालावे व चांगले फेटावे. शेवटी किवीची प्युरी घालून एकजीव करून पुन्हा फेटावे. केक टीनला बटर लावून त्यावर मैदा पेरावा. मैदा टीनला सगळीकडे लागला पाहिजे. आता त्यात मिश्रण ओतावे. प्रीहिटेड ओव्हनमध्ये १८० अंशावर ३५ ते ४० मिनिटे बेक करावे. नंतर रॅकवर १५ मिनिटे थंड होऊ द्यावे व त्रिकोणी तुकडे कापावेत. चेरीच्या तुकड्यांनी सजवावे.


फ्रुटी लाइम चिली-चीज केक  
साहित्य : प्रत्येकी २० जिंजर व क्रॅकजॅक बिस्किटे, पाव कप अॅपल जॅम, १ कप वितळलेले बटर, १ कप डिसिकेटेड कोकोनट, ४ कप कंडेन्स्ड मिल्क, ३ कप क्रीम चीज, २ कप कोकोनट क्रीम, १ लिंबाचा लेमन झेस्ट, २ लिंबांचा रस, २ मिरच्यांचे मोठे तुकडे, अननसाचे बारीक तुकडे, १ टेबलस्पून कॉर्नस्टार्च. 
कृती : प्लॅस्टिक बॅगमध्ये बिस्किटे घालून ब्रेडक्रम्ससारखी बारीक करावीत. चुरा बोलमध्ये घ्यावा. त्यात बटर व डेसिकेटेड कोकोनट, अॅपल जॅम घालून हॅंडब्लेंडरने मिश्रण एकजीव करावे व केक टीनमध्ये ओतावे. नंतर फ्रीजमध्ये तासभर ठेवावे. दुसऱ्या बोलमध्ये क्रीम चीज, कंडेन्स्ड मिल्क, कोकोनट क्रीम हॅंडब्लेंडरने एकजीव करावे. मधे-मधे लिंबूरस घालावा. नंतर कॉर्नस्टार्च घालावा. लेमन झेस्ट व मिरच्यांचे तुकडे घालावेत. मिश्रण एकजीव करावे. हे मिश्रण टीनमधील बेसवर एकसारखे पसरावे. त्यावर अननसाचे तुकडे, थोडे झेस्ट व मिरच्यांचे तुकडे पेरावेत. हे झाले चीजकेकचे मिश्रण. आता फ्रीजमध्ये ८-१० तास सेट होण्यासाठी ठेवावे. नंतर टीनमधून केक प्लेटमध्ये काढावा. त्रिकोणी तुकडे कापून सर्व्ह करावा. तत्पूर्वी मिरच्यांचे तुकडे काढावेत. 
टीप : यासाठी इंधनाची गरज नसल्याने हा मुलांनाही शिकवता येतो.


बाजरी चेरी कप केक
साहित्य : एक कप बाजरीचे रवाळ पीठ, १ कप बटर, १ कप गूळ पावडर, पाव कप कस्टर्ड पावडर, १ टीस्पून बेकिंग पावडर, १ टीस्पून बदाम इसेन्स, २ टेबलस्पून अक्रोडाची भरड, अर्धा कप चेरी फळांचे तुकडे.
कृती : एका काचेच्या बोलमध्ये बाजरीचे रवाळ पीठ, कस्टर्ड पावडर, बेकिंग पावडर हॅंडब्लेंडरने एकजीव करावे. दुसऱ्या बोलमध्ये बटर, गूळ पावडर, अक्रोडाची भरड घालून चांगले फेटावे. लिंबूरस व बदाम इसेन्स घालून फेटावी. शेवटी चेरी फळांचे तुकडे घालावे. एकजीव करावे. कप केक मोल्डला बटर लावावे व प्रत्येकात मिश्रण ओतावे. प्रीहिटेड ओव्हनमध्ये १८० अंशावर बेक करावे. १५ ते २० मिनिटे थंड होऊ द्यावे व लगेच सर्व्ह करावे.
टीप : लहान मुलांच्या पार्टीसाठी हा केक म्हणजे उत्तम पर्याय आहे.


सोया मॅंगो केक  
साहित्य : एक कप भाजलेला रवा, २ टेबलस्पून सोया पीठ, १ कप पिठीसाखर, अर्धा कप लोणी, एक कप सोया दूध, अर्धा कप ताजा आमरस, १ टेबलस्पून बेकिंग पावडर, चिममूटभर मिरपूड व मीठ, अर्धा कप हापूस आंब्याचे बारीक तुकडे. 
कृती : एका स्टील वाडग्यात लोणी, पिठीसाखर फेटावे. दुसऱ्या वाडग्यात रवा, सोया पीठ, मीठ, मिरपूड, बेकिंग पावडर एकजीव करावे. दूध व आमरस रवीने चांगला मिसळून घ्यावा. रवा मिश्रणात सर्व एकत्र करावे व हॅंडब्लेंडरने चांगले फेटावे. केक टीनला ब्रशने बटर लावावे व त्यात हे मिश्रण ओतावे. आंब्याचे तुकडे घालावेत. १८० अंशावर प्रीहिटेड ओव्हनमध्ये २० ते २५ मिनिटे बेक करावा. नंतर प्लेटमध्ये काढावा व समान आकाराचे तुकडे कापून सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या