पेटन्टमधील करिअर!

प्रा. ॲड. गणेश शं. हिंगमिरे
सोमवार, 26 जुलै 2021

करिअर विशेष

सरकारी आणि बिगरसरकारी अशा दोन्ही क्षेत्रांत फार मोठा वाव आहे अशा करिअर ऑप्शनमध्ये आजमितीला पेटन्ट क्षेत्रातील करिअरचा निश्चितच समावेश होतो.

दहावीला चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा विज्ञान शाखेचे आकर्षण असते. खूप वेळा पालकही आपल्या मुलाने/ मुलीने शाखा विज्ञान निवडावी या बाबत आग्रही असतात. आपल्या मुलाने/ मुलीने डॉक्टर, इंजिनिअर होऊन आयुष्यात यशस्वी व्हावे अशा अनेकांची इच्छा असते. काही थोड्या मंडळींना अध्यापन, संशोधन अशी क्षेत्रही खुणावत असतात. विज्ञान शाखेमुळे खुल्या होणाऱ्या असंख्य पर्यायांचेही विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आकर्षण असते. रसायन शास्त्र, संगणक शास्त्रापासून ते पर्यावरण शास्त्रापर्यंत विज्ञानाच्या शाखा -उपशाखांमध्ये करिअरला फार मोठ्या प्रमाणात वाव असतो. विज्ञान शाखेच्या शिक्षणाबाबतचे हे आकर्षण खरेच आहे. पण विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचा सर्वोत्कृष्ट म्हणता येईल असा एक पर्याय बहुतांश पालक आणि विद्यार्थ्यांच्याही नजरेपलीकडे राहतो तो म्हणजे पेटन्ट क्षेत्रातील करिअर! पेटन्टमध्ये काम करण्यासाठी विज्ञानातील किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी आवश्यक असते. पेटन्ट व्यावसायिकाच्या पात्रतेबाबत पेटन्ट कायद्यातील हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. यामागील कारण म्हणजे पेटन्ट दाखल करण्यासाठीच्या कागदपत्रांना ‘टेक्नो-लीगल’ समजले जाते. जर तुम्हाला एखाद्या संशोधनामागील शास्त्र माहीत नसेल तर त्या संशोधनाबाबतची नेमकी कागदपत्रे तयार करणे शक्य होत नाही, किंवा त्यासाठी योग्य ते शास्त्रीय संदर्भ पुरवले जाऊ शकत नाहीत. यामुळे पेटन्ट कायद्यांतर्गत पेटन्ट मिळवण्यासाठी अर्ज दाखल करणारी व्यक्ती विज्ञान, अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवीधर असणे आवश्यक आहे. एखाद्या विशिष्ट संशोधनासाठी वैयक्तिक पातळीवर कोणीही पेटन्ट दाखल करू शकते, परंतु पेटन्ट कार्यालयांमध्ये जर एखाद्या संशोधकाच्यावतीने त्याच्या संशोधनासाठी पेटन्ट दाखल करावयाचे असल्यास किंवा पेटन्ट कार्यालयांमध्ये प्रॅक्टिस करावयाची असल्यास त्या संदर्भातील परीक्षा देऊन पेटन्ट एजंट होणे अनिवार्य असते आणि फक्त शास्त्र, अभियांत्रिकी आणि फार्मसी पदवीधारक पेटन्ट एजंट होऊ शकतो. आणि ही परीक्षा भारत सरकार घेते व या परीक्षेचा निकाल आजपर्यंत अत्यल्प राहिलेला आहे.

पेटन्ट एजंट असे ऐकल्यावर त्यातल्या ‘एजंट’ या शब्दामुळे कदाचित काही मंडळींना बिचकल्यासारखे वाटण्याची शक्यता आहे. पण ही पात्रता मिळविणे सोपे नाही. भारत सरकारच्या पेटन्ट कार्यालयाच्या म्हणजे कन्ट्रोलर ञफ पेटन्ट यांच्यावतीनेच पेटन्ट एजंटसाठीची पात्रता परीक्षा दरवर्षी घेतली जाते. आणि या परीक्षांच्या आजवरच्या निकालांचा आढावा घेतला तर या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांपैकी दरवेळी जास्तीत जास्त २५ टक्के उमेदवारच यशस्वी होत आले आहेत असे आपल्या लक्षात येईल.

ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही संशोधनाचे पेटन्ट दाखल करता येते. वयाच्या एकविसाव्या वर्षानंतर ही परीक्षा देता येते किंवा नंतर व्यवसायही करता येतो, ही अट वगळली तर या परीक्षेसाठी वयाची कुठलीही कमाल मर्यादा नाही, म्हणजे तुम्ही शास्त्र किंवा अभियांत्रिकीचे तीस वर्षांपूर्वीचे पदवीधर आहात आणि आता निवृत्त झाला आहात तरी ही परीक्षा देऊन नव्याने सेकंड इनिंग सुरू करणे शक्य असते. अनेकदा विज्ञान किंवा अभियांत्रिकीच्या पदवीधर असलेल्या महिलांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे करिअरमध्ये ब्रेक घ्यावा लागतो. अशा महिलांना दुसरी इनिंग सुरू करण्यासाठी पेटन्ट हे उत्तम क्षेत्र ठरू शकते. मात्र पेटन्ट एजंट होण्यासाठी करावा लागणारा अभ्यास हा एक मोठा यज्ञ आहे. त्यासाठी प्रचंड मेहनतीची आवश्यकता असते. या परीक्षेत दोन लेखी पेपर असतात आणि हे पेपर पेटन्ट कायद्याला अनुसरून असतात व बहुतांश प्रश्न हे प्रॅक्टिकल बेस्ड असतात म्हणून पेटन्ट एजंटचा अभ्यास करताना केवळ थिअरीचा अभ्यास करून भागत नाही. 

जसे कोर्टात प्रॅक्टीस करण्यासाठी वकील असावे लागते, वेगवेगळ्या करांच्या संदर्भात प्रॅक्टीस करायची असेल तर सीए व्हावे लागते, कंपनी या विषयात काम करायचे असेल तर सीएस असावे लागते तसेच पेटन्ट कार्यालयात काम करावयाचे असल्यास आपल्याला पेटन्ट एजंट व्हावे लागेल. पेटन्ट एजंट ही पात्रता मिळवल्यानंतर लीगल फर्मबरोबर काम करणे किंवा वैयक्तिकस्तरावर प्रॅक्टीस करणे, या दोन पर्यायांमधून आपण निवड करू शकता. त्याचप्रमाणे आपल्या विज्ञानाच्या किंवा अभियांत्रिकीच्या पदवीला कायद्याच्या पदवीची जोड देऊन पेटन्ट ॲटर्नी ही पेटन्ट एजंटच्या पुढची पायरीही गाठणे शक्य असते. आजमितीला अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये आयपी तसेच आर ॲण्ड डी विभागात पेटन्ट एजंटांना मोठी मागणी आहे आणि त्यांना उत्तम वेतनही दिले जाते.

पेटन्ट एजंटच्या व्यवसायाबरोबर शास्त्र आणि अभियांत्रिकीच्या पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीसुद्धा उपलब्ध असते. त्याला पेटन्ट परीक्षक असे म्हणतात. फक्त शास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवीधारक किंवा अभियांत्रिकी पदवीधरच पेटन्ट परीक्षक परीक्षेला पात्र ठरू शकतो. ही परीक्षासुद्धा भारत सरकारच्या पेटन्ट कार्यालयाकडूनच घेतली जाते. मात्र या परीक्षेसाठी वयाची अट आहे. ही परीक्षा पास होण्याऱ्या व्यक्तीला ‘क्लास वन’ किंवा ‘अ’ दर्जाच्या शास्त्रज्ञासमान मान्यता मिळते, म्हणजे त्या पातळीचे वेतन व शासकीय सुविधा उपलब्ध होतात. पेटन्ट परीक्षक परीक्षेसाठीसुद्धा पेटन्ट कायद्याचे ज्ञान असणे क्रमप्राप्त असते. पेटन्ट एजंट आणि पेटन्ट परीक्षक यासाठी भारत सरकारच्या काही संस्थांबरोबर जीएमजीसीच्या माध्यमातून प्रशिक्षण अभ्यासक्रम घेतले जातात. 

पेटन्टमधील करिअरचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे अनेक नवनवीन संशोधनावर काम करायला मिळते. म्हणजेच पेटन्टचे करिअर हे ज्ञानार्जनाचे हिमशिखर आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. भारतामध्ये आज वैयक्तिक पेटन्ट दाखल करणाऱ्यांची किंवा शैक्षणिक संस्थांच्यावतीने पेटन्ट दाखल करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. पेटन्ट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची संख्या हे त्याचे एक कारण आहे. भारतात आज फक्त बावीसशेच्या आसपास नोंदणी असणारे पेटन्ट एजंट आहेत. सव्वाशे कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात हे प्रमाण नगण्यच आहे. चीनमधून दरवर्षी लाखोंच्या संख्येत पेटन्ट दाखल होतात. मागील वर्षापासून चीनने अमेरिकेलाही मागे टाकत जगात पेटन्ट दाखल करणाऱ्या देशांच्या अग्रस्थानी मजल मारली आहे. पेटन्टच्या वाढत्या संख्येने चीनला आर्थिक सुबत्ता मिळवून दिली आहे. चीनने अमेरिका आणि जपानचा कित्ता गिरवीत पेटन्ट हा प्राथमिक शिक्षणाचा घटक बनविला आहे. त्यामुळे त्यांच्या पेटन्ट संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे आणि परिणामी अर्थकारणातही. जपानमध्ये हजारोंच्या संख्येत पेटन्ट मॅनेजर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात. सध्याचे बदलते औद्योगिक विश्व पाहता भारतातही ही परिस्थिती नक्कीच निर्माण होणार आहे. त्यामुळे आज जर पेटन्ट क्षेत्रातील करिअरचा विचार केला तर येणाऱ्या काळात स्वतःच्या प्रगतीबरोबर देशाच्या व्यावसायिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये आपलाही मोलाचा सहभाग देता येईल.

संबंधित बातम्या