गिर्यारोहणातील करिअरच्या संधी

उमेश झिरपे
सोमवार, 26 जुलै 2021

करिअर विशेष

समाजात करिअरविषयी दृष्टिकोन बदलत जाताना आपण बघत आहोत. वीस वर्षांपूर्वी गिर्यारोहण म्हणजे काही मोजक्या लोकांचा क्रीडाप्रकार असाच समज होता. पालकदेखील या क्रीडाप्रकाराकडे करिअर म्हणून कधीच बघत नव्हते. मात्र, हळूहळू समाजदेखील डॉक्टर, इंजिनिअर व सीए हेच फक्त खरे करिअर ऑप्शन्स या मानसिकतेतून बाहेर येत आहे. आज कित्येक पालक आपल्या मुलामुलींना क्रीडापटू म्हणून पाहू इच्छितात. 

धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून निसर्गामध्ये भटकणे, धाडस करणे हे आता नित्याचे झाले आहे. आज कित्येक लोक वेळ मिळाला की ट्रेकिंग किंवा भटकंतीला जातात. दरवर्षी हिमालयात ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगादेखील शनिवारी- रविवारी गर्दीने खुलून जातात. थोडक्यात, गिर्यारोहण, ट्रेकिंग किंवा भटकंती सारखे साहसी खेळ समाजामध्ये रुजू पाहत आहेत. यातून मिळणाऱ्या रोमांचकारी अनुभवामुळे लोक या साहसी खेळांना आपलसं करत आहेत. सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या वाढतच आहे, परिणामतः यातून विविध प्रकारच्या रोजगारांच्या संधी उपलब्ध होत आहेत, नवीन युगातील तरुण या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघत आहे.

खरंतर गिर्यारोहणासंदर्भात काही गैरसमज आपल्या समाजात रूढ आहेत. एव्हरेस्ट शिखर चढाईला जाणे, अथवा हिमालयातील अतिउंच शिखरावरील चढाई म्हणजेच गिर्यारोहण असा समज आहे. मात्र, गिर्यारोहणाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील ट्रेकिंग म्हणजेच पदभ्रमंती हा सर्वात मूर्त प्रकार, जो सामान्य व्यक्तीही करू शकतात, कोणत्याही तांत्रिक प्रशिक्षणाशिवाय. जगभरात ट्रेकिंग खूप प्रसिद्ध आहे. आपण सह्याद्रीत ट्रेकिंगला जातो. युरोपियन आल्प्समध्ये जातात तर अमेरिकन अँडीज पर्वतरांगांमध्ये पदभ्रमंती करत आहेत. थोडक्यात, गिर्यारोहण, ट्रेकिंग सारख्या साहसी क्रीडाप्रकारांचे महत्त्व वाढत आहे. या खेळाकडे अधिकाधिक लोक आकृष्ट होत आहेत. या क्षेत्राची अर्थव्यवस्था विस्तारत आहे, यातूनच नवीन रोजगार निर्मिती होत आहे. या सुवर्णसंधीचा फायदा घेता आला पाहिजे. या साहसी क्रीडाप्रकारातून उत्तम अर्थार्जन होऊ शकते, अट आहे फक्त शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीची व योग्य आखणीची. म्हणजे नेमके काय हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर लेखामध्ये तुम्हाला याचे उत्तर नक्की मिळेल. गिर्यारोहण क्षेत्रात नेमक्या कोणत्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, याविषयी जाणून घेऊयात. 

गिर्यारोहण तज्ज्ञ (आउटडोअर एक्स्पर्ट)
शहरातील अनेक खासगी संस्था आपल्या कर्मचाऱ्यांच्या बौद्धिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात. ‘टीम बिल्डींग’ उपक्रमांसाठी कर्मचाऱ्यांना डोंगरात, निसर्गात घेऊन जाऊन अनेक अभिनव खेळ खेळतात. निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण घालवतात. असे उपक्रम आयोजित करण्यासाठी तसेच परिपूर्ण प्रशिक्षणासाठी अनेक तज्ज्ञ गिर्यारोहकांची गरज भासते. गिर्यारोहणातील बेसिक व अॅडव्हान्स कोर्स केलेल्या तरुण-तरुणींना ‘आउटडोअर एक्स्पर्ट’ म्हणून काम करता येईल. अशा तज्ज्ञ लोकांना प्रचंड मागणी असते. या क्षेत्रामध्ये तुम्ही अर्धवेळ अथवा पूर्णवेळ काम करू शकता. गिर्यारोहकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा हा उत्तम पर्याय आहे.

ट्रेकिंग मार्गदर्शक
काही लोक गिर्यारोहणाची आखणी स्वतःहून करतात. कसे जायचे, कुठे जायचे इत्यादी. पण एवढे पुरेसे नसते. अवघड श्रेणीत मोडणाऱ्या गिर्यारोहण परिसरांमध्ये प्रत्यक्ष अनुभव असलेली व्यक्ती सोबत घेऊन जाण्याला लोक प्राधान्य देतात. यासाठी कसलेला आणि अनुभवी गिर्यारोहक असला की, ट्रेकिंग करताना वाट चुकणे किंवा अपघात होणे असे प्रसंग क्वचितच उद्‌भवतात. मोठ्या ट्रेकला जाण्यासाठी आवश्यक असलेला सराव करून घेण्यासाठीदेखील ट्रेकिंग मार्गदर्शकाला लोक प्राधान्य देतात. 
ट्रेकिंग मार्गदर्शक अथवा आउटडोअर एक्स्पर्ट होण्याआधी ट्रेकिंगचे अथवा गिर्यारोहणाचे अत्याधुनिक व तांत्रिक प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचा खूप चांगला फायदा होतो. असे प्रशिक्षण देणाऱ्या काही प्रमुख सरकारमान्य संस्था उत्तर व पूर्व हिमालयात वसलेल्या आहेत. यात दार्जिलिंगची हिमालयन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूट (संपर्क : https://hmidarjeeling.com), उत्तरकाशी येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग (संपर्क : https://www.nimindia.net/), मनाली येथील अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स (संपर्क : https://abvimas.org), पहलगाम (जम्मू व काश्मीर) येथील जवाहर इन्स्टिट्यूट

ऑफ माउंटेनियरिंग अँड विंटर स्पोर्ट्स (संपर्क : https://www.jawaharinstitutepahalgam.com) अशा काही प्रमुख संस्थांचा समावेश होतो. या सर्व संस्था उत्तर भारतामध्ये आहेत. येथे गिर्यारोहणातील सर्व प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. गिर्यारोहणातील जोखीम, सुरक्षा, कोणताही साहसी उपक्रम करत असताना नेमके कुठे थांबायचे, याचे प्रात्यक्षिकांमधून प्रशिक्षण दिले जाते. दक्षिण भारतामध्ये मात्र अशा संस्थांचा अभाव आहे. पुण्यात गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग (GGIM) ही एकमेव सरकारमान्य गिर्यारोहण संस्था आहे. इथे ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग इत्यादीसाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. (संपर्क : ggimpune@gmail.com अथवा www.ggim.in)

ट्रेकिंग संस्था
हौस म्हणून ट्रेक करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. ट्रेकिंगमध्ये मिळणारा आनंद लोकांना या खेळाकडे आकर्षित करत आहे. मात्र, ट्रेकिंगला कुठे जावे, कसे जावे व कधी जावे, ट्रेकिंगसाठी काय पूर्व तयारी करावी, आपल्या शारीरिक क्षमतेला अनुसरून कोणता ट्रेक योग्य याबद्दल लोकांना माहीत नसते. तसेच ट्रेकिंगला जाण्याची पहिलीच वेळ असेल तर एखाद्या जाणत्या ग्रुपसोबत जाण्यास लोक प्राधान्य देतात. 
या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे ट्रेकिंग कंपनी. गिर्यारोहणाचा उत्तम अनुभव असणाऱ्या गिर्यारोहकाने ट्रेकिंग कंपनी काढली तर त्यातून खूप उत्तम प्रकारे अर्थार्जन करता येते. सह्याद्री, हिमालयात सोप्यापासून अति अवघड प्रकारामध्ये मोडणारे असंख्य ट्रेक्स आहेत, अनेक लोक हे ट्रेक्स करण्यासाठी धडपडत असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन करणारी संस्था गिर्यारोहकाने सुरू केली, तर त्याचे उत्तम करिअर घडेल.

ट्रेकिंग साहित्याची विक्री
ट्रेकिंगला जाण्यासाठी अनेक उपकरणांची गरज भासते. साध्या ट्रेकला जायचे असेल तरी उत्तम बूट आणि हवामानाला अनुसरून कपडे असणे आवश्यक असते आणि जर हिमालयातील उंचीवरील ट्रेक करायचे असेल तर मग गरम कपडे, सामान वाहून नेण्यासाठी योग्य बॅगा अशा एक ना अनेक साहित्यांची गरज भासते. गिर्यारोहणाचा अनुभव असलेली व्यक्ती कोणते साहित्य कधी घ्यावे याबद्दल सर्व योग्य मार्गदर्शन करू शकते. त्यामुळे असे साहित्याची विक्री करणारे दालन अथवा ऑनलाइन पोर्टल जर गिर्यारोहकाने सुरू केले तर आपल्या क्षेत्राशी निगडित उत्तम करिअर त्याला करता येऊ शकते. 

बोल्डरींग प्रशिक्षक
प्रस्तरारोहण हा गिर्यारोहणाचा अविभाज्य भाग. सह्याद्रीच्या काळ्या दगडावर प्रस्तरारोहण अक्षरशः फुलले. महाराष्ट्रामध्ये अनेक पारंगत प्रस्तरारोहक उपलब्ध आहेत. या सर्वांना रोजगार म्हणून खूप मोठी संधी चालून आली आहे. निसर्गात होणाऱ्या प्रस्तरारोहणावर आधारित कृत्रिम प्रस्तरारोहण अर्थात बोल्डरींग हा नवीन खेळ जनसामान्यात रुजू पाहतो आहे. अनेक शाळांमधून आणि व्यायामशाळेत (जिममध्ये) बोल्डरींगच्या भिंती (कृत्रिम भिंती) उभारण्यात आल्या आहेत. शाळेमध्ये या खेळाचा समावेश करण्याची दोन प्रमुख करणे आहेत. एक म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती लाभते, निर्णय क्षमता प्रबळ होते व मुले साहसी बनतात. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये या खेळाचा समावेश करण्यात आला आहे व भारतातील शालेय विद्यार्थी या खेळामध्ये प्रवीण आहेत. त्यांना अधिक उत्तम खेळाडू बनविण्यासाठी कसलेल्या  प्रस्तरारोहकांना प्रचंड मागणी आहे. 

प्रेरणादायी वक्ता
तुम्ही जर उत्तम ट्रेकर असाल व तुमची सादरीकरण कला उत्तम असेल तर तुम्हाला या दोहोंचा उपयोग करून उत्तम अर्थप्राप्ती करता येईल. गिर्यारोहण करताना घडलेले प्रसंग तुम्ही भाषणातून, लिखाणातून, पुस्तकाच्या माध्यमातून मांडू शकता. तसेच गिर्यारोहण संदर्भातील व्हिडिओदेखील बनवू शकता. अनेक ठिकाणी वक्ते म्हणून जाऊ शकता. प्रेरणादायी अनुभव व विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक गिर्यारोहकांना अनेक आमंत्रणे येतात. तुम्ही तुमच्या कौशल्यांचा योग्य उपयोग केल्यास या क्षेत्रात तुम्हाला उत्तम करिअर घडविता येईल.

सध्या ट्रान्स सह्याद्री, ट्रान्स हिमालय अशा विविध स्पर्धा पूर्ण करणारे, एव्हरेस्ट, कांचनजुंगा सारखे अत्यंत उंच व कठीण शिखर चढाई करणारे नवनवे गिर्यारोहक तयार होत आहेत. या सर्वांनी आपली कौशल्ये पणाला लावून जिद्द ठेवून अत्यंत चिकाटीने आपले लक्ष्य गाठले आहे. यात काही जणांच्या उत्तर निर्णय क्षमतेमुळे, काही जणांच्या पेशन्समुळे, तर काही जणांच्या अत्यंत साहसी वृत्तीमुळे यश खेचून आणता आले. त्यांचे अनुभव सामान्य आयुष्यात प्रेरणादायी ठरतात. कॉर्पोरेट कंपन्यादेखील अशा ‘अॅचीव्हर्स’ला आमंत्रित करून आपल्या कर्मचाऱ्यांना प्रेरित करत असतात. या आधी या क्षेत्रात विदेशी व्यक्तींचा बोलबाला होता. मात्र, आता भारतीय साहसवीरदेखील आघाडीवर येऊन प्रेरणादायी वक्ता म्हणून व्याख्याने देत आहेत. उत्तम वक्त्यांना काही तासांच्या प्रेझेन्टेशन व व्याख्यानासाठी काही लाख रुपयेही मानधन म्हणून मिळू शकतात.       

आपत्कालीन मदतकार्य
अपघात, दुर्घटना घडल्यास आपत्कालीन मदतकार्य करणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींची निकड मोठ्या प्रमाणावर भासते. परदेशामध्ये ‘रेस्क्युअर’ला उत्तम भविष्य आहे. प्रशिक्षित ‘रेस्क्युअर’ यांचे अर्थार्जन उत्तम असते. याच धर्तीवर, भारतामध्ये प्रशिक्षित  ‘रेस्क्युअर’ बनल्यास फार उज्ज्वल भविष्य आहे. ‘रेस्क्युअर’ होण्यासाठी उत्तम शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, प्रसंगावधान व जलद निर्णय घेण्याची क्षमता आवश्यक असते. 

हे सर्व गुण एखाद्या कसलेल्या गिर्यारोहकामध्ये नक्की असतात. म्हणून एक चांगला गिर्यारोहक एक चांगला ‘रेस्क्युअर’ नक्की होऊ शकतो.

समाजात करिअरविषयी दृष्टिकोन बदलत जाताना आपण बघत आहोत. वीस वर्षांपूर्वी गिर्यारोहण म्हणजे काही मोजक्या लोकांचा क्रीडाप्रकार असाच समज होता. पालकदेखील या क्रीडाप्रकाराकडे करिअर म्हणून कधीच बघत नव्हते. मात्र, हळूहळू समाजदेखील डॉक्टर, इंजिनिअर व सीए हेच फक्त खरे करिअर ऑप्शन्स या मानसिकतेतून बाहेर येत आहे. आज कित्येक पालक आपल्या मुलामुलींना क्रीडापटू म्हणून पाहू इच्छितात. त्यात अनेक पालकांचा ओढा हा गिर्यारोहण, स्पोर्ट क्लाइंबिंग इत्यादीकडे वाढत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. गिर्यारोहणात शारीरिक कस तर लागतोच, मात्र नेतृत्व गुण, संघ भावना इत्यादी गुण विकसित होतात, जे गिर्यारोहणाशिवायदेखील कोणत्याही क्षेत्रासाठी उपयुक्तच आहेत. म्हणूनदेखील गिर्यारोहण ही जीवनशैली म्हणून आत्मसात करण्यासाठी लोक प्रयत्नशील आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यावर्षी पासून ‘डिप्लोमा इन माऊंटेनियरिंग’ हा गिर्यारोहणाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारा भारतातील पहिला-वाहिला अभ्यासक्रम सुरू केला आहे. यात गिर्यारोहणाचा सर्वंकष अभ्यास ‘क्लासरूम व आऊटडोअर’ असा दोन्ही पद्धतीने शिकविण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या वेबसाइटवर या कोर्सविषयी माहिती दिली आहे. गिर्यारोहण क्षेत्रामध्ये करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत, फक्त गरज आहे, संधीचं सोनं करण्याची. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर गिर्यारोहण क्षेत्रातील यशाची ‘शिखरे’ सहज गाठता येतील.

संबंधित बातम्या