विज्ञान शाखा-संशोधनाची संधी 

डॉ. अरविंद नातू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर), पुणे
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
सध्याच्या काळात मूलभूत विज्ञान व संशोधन क्षेत्रात विपुल संधी आहेत, अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखांपलीकडे फार मोठे विश्‍व आहे याची बहुसंख्य विद्यार्थ्यांना माहितीच नसते. दहावी, बारावीला चांगले गुण मिळवून कशी घसघशीत पगाराची नोकरी मिळवायची, या एका विचाराने भारावून गेलेल्या बहुतेक पालक आणि मुलांचा हाच विचार असतो. यात काही गैर नाही. मात्र, विद्यार्थ्याला काय आवडते आणि या दोन शाखांव्यतिरिक्त कोणते विकल्प आहेत, त्याचेच हे प्रबोधन. गॅट करारानंतर जग हे एक वैश्‍विक खेडं झालं आहे. त्यात जर आपले स्थान बळकट करायचे असेल, तर आपल्याला संशोधनाशिवाय गत्यंतर नाही. आपण का संशोधन करू शकत नाही, आपण इतरांवर का अवलंबून राहतो? आपल्याकडे गुगल, ॲपल का नाही, त्यांच्याकडे काम करण्यातच आपण धन्यता का मानतो? याची उत्तरे शोधण्यासाठी चाकोरीबद्ध सेवावर्धित विचारांपलीकडे जाऊन ज्ञानवर्धित अर्थव्यवस्थेसाठी म्हणजेच समाजासाठी संशोधनाची वाट धरायला हवी.

आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सेवाधिष्ठित क्षेत्राकडे वाटचाल करत आहे; पण कोणत्याही क्षेत्रात तग धरून राहण्यासाठी ज्ञानवर्धित अर्थव्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यासाठी संशोधन हा मूळ पाया आहे; पण आपल्या शिक्षण पद्धतीत तुलनेने संशोधनाला तितके महत्त्व दिले जात नाही. खरेतर बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांमध्ये संशोधन या विषयाची अगदी जुजबी माहिती विद्यार्थ्यांना होते. मुळात बारावीनंतर आपला कल कोणत्या विषयाकडे आहे, हे निश्‍चितच झालेले नसते. पदवी अभ्यासक्रमात म्हणूनच अभ्यासाबरोबरच संशोधनालाही तितकेच महत्त्व दिले 
पाहिजे. याच ‘‘अभ्यासाधिष्ठित संशोधन’’ उद्देशाने २००६ मध्ये आयसरची स्थापना करण्यात आली. विद्यार्थिकेंद्रित अभ्यासक्रम हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आहे. तुमच्या आवडीचा विषय व अभ्यासक्रम मिळाला तरच अभ्यास सहजपणे व चांगला होतो व यश हे निश्‍चितच मिळते याच उद्देशाने मूलभूत नैसर्गिक विज्ञान शाखांमधील पदवी अभ्यासक्रमाची आखणी करण्यात 
आलेली आहे. 

प्रवेश घेताना 
विज्ञान अभ्यासक्रम म्हटले की, केवळ अभियांत्रिकी व वैद्यकीय असा अनेक विद्यार्थ्यांचा गैरसमज असतो; पण प्रत्यक्षात मात्र विज्ञान अभ्यासक्रमांतर्गत भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, सांख्यिकीशास्त्र, जैवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र, खगोलभौतिकशास्त्र, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, भूभौतिकशास्त्र, भूरसायनशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये पदवी आणि पदव्यूत्तर पदवी म्हणजेच BS-MS ही पदवी बारावीनंतरच्या पाच वर्षांच्या अभ्यासानंतर मिळते किंवा इंटिग्रेटेड पदवी घेता येते. या संस्थेमध्ये प्रवेशासाठी तीन वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियांद्वारे प्रवेश दिला जातो. 
    जेईई ॲडव्हान्स https://jeeadv.ac.in/
    केव्हीपीवाय - KVPY (किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना ) www.kvpy.iisc.ernet.in/
    राज्य व केंद्रीय बारावीची परीक्षा (आयसर प्रवेश परीक्षा अनिवार्य) 
वर उल्लेख केलेल्या तीनही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यावर केवळ मेरिट बेसिसवर पारदर्शकपद्धतीने आयसरमध्ये प्रवेश दिला जातो. जेईई ॲडव्हान्स व केव्हीपीवाय परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यावर आयसर येण्यासाठी कोणत्याही प्रवेश परीक्षेची गरज नाही; पण केंद्रीय व राज्य बोर्डाच्या बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयसर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. मूलभूत विज्ञानात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर संशोधन अगर संलग्न शाखांमधून आपले करिअर बनवण्याची संधी प्राप्त होते. भारतात ७ आयसर असून, या सर्व आयसरसाठी एकच प्रवेश प्रक्रिया असून, मेरिटद्वारे कोणत्याही आयसरमध्ये प्रवेश मिळतो. अत्यंत कमी फी व जागतिक दर्जाच्या लॅब, ग्रंथालय, क्रीडा संकुल, मीडिया सेंटर व इतर सुविधा असल्याने विद्यार्थी फक्त पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित न राहता त्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. आयसरमधील ८० ते ८५ टक्के विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते. सरकारच्या नवीन धोरणानुसार अर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अद्ययावत माहितीसाठी www.iiseradmission.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

अभ्यासक्रमाचे स्वरूप 
कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर साधारणपणे शिक्षक, अभ्यासक्रम एकूणच कॅम्पसचे वातावरण याबाबत विद्यार्थी थोडा साशंक असतो. १२ वीनंतर कोणते विषय घ्यायचे, किंबहूना आपल्याला कोणत्या विषयात रस आहे, याचे पूर्ण आकलन विद्यार्थ्याला झालेले नसते. याचाच विचार करून आयसरमध्ये ५ वर्षांमध्ये १० सत्रांची आखणी केलेली आहे. त्यातील पहिल्या चार सत्रांमध्ये महत्त्वाच्या म्हणजे पदार्थविज्ञान, रसायन, जीवशास्त्र व गणित या चारही विषयांचे सखोल ज्ञान दिले जाते. त्यानंतरच मुलांचा कल व आवड विचारात घेऊन त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात करिअर करण्याची संधी दिली जाते. त्यासाठी त्यांना निवडीसाठी १३० हून अधिक कोर्सेसमधून निवडीची भरपूर संधी मिळते. त्यामुळे पहिल्यापासूनच विद्यार्थ्यांना त्यांचे निर्णय स्वत: घेण्याची सवय लागते. त्याचबरोबर शेवटच्या दोन सत्रांत आपल्या आवडीच्या विषयात संशोधन करावे लागते. अशा रीतीने पाच वर्षांनंतर एमएस पदवी त्याला मिळते. याशिवाय पदवीनंतर (B.Sc किंवा M.Sc) पी.एचडीलाही प्रवेश मिळतो. आयसरमधील सर्व शिक्षण हे परीक्षाकेंद्रित नसून, विद्यार्थिकेंद्रित असल्याने विद्यार्थी निर्णयक्षम व सर्जनशील बनतो. म्हणूनच आयसरला नुसतीच विद्यार्थी घडविणारी संस्था नसून, त्यांच्यातील क्षमता वाढविणारी संस्था आहे, असे म्हणता येईल. म्हणूनच की काय, अतिथी प्राध्यापक म्हणून जगभरातील संशोधकांना, नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांना येथे आमंत्रित करून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली जाते. आयसरमधील सर्व शिक्षक हे स्वत: संशोधक असल्याने प्रत्येक नवीन होणाऱ्या संशोधनाची, तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना मिळते. आयसरमधील विद्यार्थ्यांचे परीक्षण हे केवळ परीक्षांतील गुणांवर ठरत नसून, पाचही वर्षांतील त्याच्या आकलन, सातत्य व मूल्यांकनानुसार ठरते. 
करिअरच्या संधी-स्वतःची पारख करणं आणि आपल्या शिक्षणाचा समाजासाठी वापर करणं, ही शिक्षणाची दोन मुख्य उद्दिष्टं आहेत. पगार, पद, नोकरी यातर महत्त्वाच्या गोष्टी आहेतच; पण या पलीकडे जाऊन आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्याची संधी आयसर देते. योग्य संस्कारित शिक्षणातच तुमचं व समाजाचं भविष्य दडलेलं आहे. म्हणूनच ज्ञानवर्धित समाज तयार करण्यासाठी आयसर नेहमीच प्रयत्नशील असते. संशोधक, सायन्स, आर्थिक विश्‍लेषक ॲनॉलिस्ट, पेटंट ॲटार्नी, टेक्‍निकल रायटरसारख्या असंख्य संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. त्यामुळे बारावीनंतर वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखांकडेच जाण्याचा विचार केलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञान शाखेचा पर्याय समोर ठेवायला काही हरकत नाही.

संबंधित बातम्या