यशासाठी आरोग्याचे अधिष्ठान

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
 

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या जगण्यासाठी असलेल्या मूलभूत गरजा आहेत. पण आधुनिक जगातल्या प्रगत मानवाला नुसते साधे जगणे अपेक्षित नसते, तर ‘क्वालिटी लाइफ’ची अपेक्षा असते. असे उच्च प्रतीचे जीवन जगायला उत्तम आर्थिक प्राप्ती असावी लागते आणि ही प्राप्ती मिळवण्यासाठी अर्थार्जनाचा जो जीवनमार्ग स्वीकारला जातो, तो मार्ग म्हणजे त्याचे करिअर. 

पूर्वी शेती, व्यापार आणि नोकरी हेच करिअरचे पर्याय मानले जायचे. ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी’ असेही म्हटले जायचे. पण आजच्या पुढारलेल्या जगात आपल्या पायावर उभ्या राहण्याच्या, अर्थार्जन करण्याच्या आणि सन्मानाने जगण्याच्या अगणित वाटा निर्माण झाल्या आहेत. काही उत्कृष्ट करिअरसाठी, तर ठाशीव चौकटीतले पदवीधर व्हायचीही गरज लागत नाही. बैठे-मैदानी खेळ, चौसष्ट प्रकारच्या कला आणि आपण विचारही करू शकणार नाही असे छंद यामध्येही जगाचे डोळे दिपवून टाकणारे अनेक करिअर्स आजच्या तरुणांसमोर हात जोडून उभे आहेत. 

करिअर आणि यशस्विता
मात्र, करिअरची संधी असणे, ती मिळवणे आणि त्याचे शिक्षण घेऊन त्यात पदार्पण करणे ही एकेकाळी खूप दुर्धर असलेली गोष्ट आज तितकीशी असाध्य राहिलेली नाही. पण त्यानंतर त्या करिअरमध्ये टिकून राहणे, त्यात यशस्वी होणे ही गोष्ट, मात्र पूर्वीपेक्षाही जास्तच अवघड होऊन बसली आहे. कारण यशस्वितेची व्याख्यादेखील आजकाल बदलत चालली आहे. 
 साध्या सरळ अर्थाने एखाद्या व्यवसायात किंवा नोकरीत यशस्वी होणे म्हणजे त्यात भरपूर पैसे मिळवणे, चांगले नाव कमविणे आणि व्यवसायाची नेत्रदीपक वाढ करणे किंवा नोकरीत सर्वोच्चपदी पोचणे. पण आजकाल त्यात वाढती स्पर्धा, व्यावसायिक राजकारण, सरकारी यंत्रणा आणि कायदेविषयक समस्या यांना समर्थपणे तोंड देऊन आपली प्रगती करणे या गोष्टीही समाविष्ट झाल्या आहेत.   

साहजिकच आजच्या जगात कोणत्याही युवकाला यशस्वी व्हायचे असेल, तर अनेक विशेष सवयी, सॉफ्ट स्किल्स शिकाव्या लागतात. आपले व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करावे लागते. शाळा कॉलेजातील अभ्यासाबरोबरच परिणामकारक संभाषण कला, वेळेचे व्यवस्थापन, भाषांचे महत्त्व, संगणकाचे ज्ञान, प्रेझेंटेशन तंत्र इत्यादी गोष्टी करिअर घडवण्यासाठी शिकाव्या लागतात.

यशस्वितांच्या सात सवयी
स्टीफन कोवे या लेखकाने लिहिलेल्या ‘सेव्हन हॅबिट्‌स ऑफ हायली इफेक्‍टिव्ह पीपल’ या ग्रंथात आजच्या जगात यशस्वी होण्यासाठी असलेल्या सात सवयींचा ऊहापोह केला आहे. यात... 

  • प्रोॲक्‍टिव्ह किंवा सकारात्मकरित्या सक्रिय असणे.
  • प्रत्येक गोष्टीची सुरुवात करताना तिचा शेवट कसा करणार याचा पक्का विचार मनात तयार असणे.
  • महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणे.
  • सतत मीच कुरघोडी करेन असे न मानता इतरांना बरोबरीची संधी देणे.
  • प्रथम दुसऱ्याचे म्हणणे समजून घ्या आणि मग आपले म्हणणे ठसवा.
  • इतरांना सामावून घेत काम करा. 
  • आपली तब्येत कायम उत्तम राखा. 

 यातल्या पहिल्या सहा गोष्टी नोकरी-व्यवसायात पडल्यावर शिकाव्या लागतात. मात्र, सातवी गोष्ट म्हणजे आपले आरोग्य हे अगदी लहानपणापासून उत्तम ठेवावे लागते. कारण करिअर शोधून त्यात पदार्पण करण्याचे शिक्षण द्यायला अनेक सल्लागार मिळतील. नोकरी-व्यवसायातील अडचणी सोडवायला कित्येक करसल्लागार, विधिज्ञ, मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने सारे काही व्यवस्थित होईल, यशही मिळेल. पण त्या यशाची गोडी निरंतर चाखण्यासाठी, ते यश कायम राखण्यासाठी गरज असते निरामय आरोग्याची.  

व्यावसायिक यश आणि आरोग्य
 जगातील उद्योगविश्वात अशी अनेक छोटी मोठी उदाहरणे आहेत. ज्यात लोकांनी व्यवसायात यश मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि आयुष्याच्या मध्यावर, यश सामोरे असताना त्यांना दुर्धर आजार झाले. कारण व्यवसायाची उभारणी करताना, इतरांच्या वेळा सांभाळण्यासाठी आपल्या वेळेचे नियोजन नाही, वेळेवर जेवण नाही, कमिटमेंट्‌स पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस जागणे, मीटींग्ज आणि ग्राहकाला संतुष्ट ठेवण्यासाठी पार्ट्या, त्यामध्ये मद्यसेवन, धूम्रपान या व्यसनांचा अतिरेक या गोष्टी घडत जातात. व्यवसायासाठी वेळ देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष, काही दुखले खुपले, तर अंगावर काढणे हा नियमच होतो. वार्षिक आरोग्यचाचण्या हा विषय, तर हे लोक पूर्णपणे विसरून जातात.

आरोग्याकडे दुर्लक्ष आणि कमालीचा ताणतणाव यामुळे साहजिकच या परिस्थितीत उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बेसुमार वजनवाढ ही जीवनशैलीतील दुखणी मागे लागतात. त्यांचे वेळेवर निदान केले जात नाही आणि झालेच, तरी त्या आजारांचे पथ्यपाणी, उपचार नियमितपणे आणि काटेकोरपणे घेतले जात नाहीत. 

आजमितीला असे अनेक कर्करोग तसेच दुर्धर आजार आहेत, की ज्यांची लक्षणे दिसताच जर वैद्यकीय सल्ला घेऊन निदान केले, तर ते पूर्णपणे आटोक्‍यात ठेवता येतात. पण व्यवसायाच्या विचारात गढलेल्या आमच्या यशस्वी व्यावसायिकांना त्याची जाणीव होईपर्यंत ते आजार विकोपाला गेलेले असतात. 

आज भारतात तरुण व्यावसायिकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण ३० टक्के आहे. मधुमेहाचे प्रमाण ११.३ टक्के आहे; शिवाय १०.४ टक्के हे मधुमेह होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. तर कर्करोगाचे प्रमाण २० टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. या साऱ्याचे कारण आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष.

आरोग्यदायी सवयी
 निरामय आरोग्यासाठी उत्तम आरोग्यदायी सवयी मुलांना लहानपणापासून लावायला लागतात. पण कोणत्याही वयात त्यांचे पालन कसून आणि नियमितपणे केले, तरी त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. करिअर कोणतेही निवडा, त्यात यशस्वी होण्यासाठी या सवयी निश्‍चितपणे आवश्‍यक ठरतील.

जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याच्या व्याख्येत शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याचा समावेश केलेला आहे. त्यामुळे या तिन्ही प्रकारचे आरोग्य केवळ यशस्वी व्यावसायिक कारकिर्दीसाठीच नव्हे, तर संपन्न आयुष्यासाठीदेखील उपयुक्त ठरेल.

सकाळी लवकर उठणे : लेटनाईट पार्टीज, रात्री उशिरापर्यंत काम करणे किंवा रात्री बाहेर उशिरा फिरण्याच्या सवयीमुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे सर्वांनाच शक्‍य होते असे नाही. निरोगी आयुष्यासाठी आपण रोज सकाळी लवकर उठले पाहिजे. सकाळी लवकर उठल्याने शरीरावरचा ताण कमी होतो. पूर्ण दिवस आनंदात जातो. कामावर चांगला परिणाम होतो.

रोज किमान ३० मिनिटे व्यायाम करणे : सुदृढ शरीरासाठी व्यायाम हा हवाच. यात चालणे, पळणे, जॉगिंग, पोहणे, सायकल चालवणे असे एरोबिक व्यायाम करावेत. जोर-बैठका, सूर्यनमस्कार आणि वयाच्या १५ व्या वर्षानंतर जिममधील वजनांचे अनएरोबिक व्यायाम करावेत. दोन्ही प्रकार दिवसाआड केले तरी चालतात. याला एखाद्या मैदानी खेळाची जोड दिल्यास उत्तम.

सकाळी नाश्‍ता करणे : यात दूध, पोळीभाजी किंवा पोहे, उपमा, इडली, डोसा असे खाद्यपदार्थ असावेत. वयाच्या कोणत्याही काळात किमान एक कप दूध प्रत्येकाने घ्यालच हवे. सकाळी फक्त चहा-बिस्किटे घेणे म्हणजे नाश्‍ता नव्हे. सकाळी व्यवस्थित खाल्ल्याने सकाळच्या काळातील अभ्यास, कामे करताना एकाग्रता येते आणि कामाचा दर्जा उत्तमपणे सुधारतो. 

दिनक्रम आखणे : रोजच्या दिवसातील कामे, जेवणाच्या वेळा, अभ्यासाच्या वेळा, खेळ-व्यायाम, इतर कामे, झोपेची वेळ या गोष्टी आखून घ्याव्यात. त्यात नियमितता ठेवावी. एखाद्या महत्त्वाच्या वेळेस, कालमर्यादेचा किंवा त्यातील क्रमाचा कसा बदल करायचा हे शिकून घ्यावे. म्हणजे रोज अर्धा तास व्यायामाऐवजी परीक्षेच्या काळात तो १५ मिनिटेच करणे, सुटीच्या काळात जास्त करणे किंवा सकाळी व्यायाम न झाल्यास संध्याकाळी करणे वगैरे.

मेडिटेशन : कोणत्याही पद्धतीचे मेडिटेशन करण्याची सवय लहानपणापासून असल्यास मानसिक आरोग्य उत्तम राहते. हे आध्यात्मिकदृष्ट्या न करता, एकाग्रता आणि मनःशांती वाढण्यासाठी करावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी उद्याच्या स्वतःच्या दैनंदिन कामांचा आणि घडून गेलेल्या दिवसभरातील चांगल्या-वाईट गोष्टींचा आढावा घेणे, परिशीलन करणे ही सवय कोणत्याही करिअरमध्ये उपयुक्त ठरते. मेडिटेशनमुळे मनातील नकारात्मक भाव, ताणतणाव दूर होण्यास मदत होते आणि सकारात्मकता येऊन आत्मविश्वास वाढतो.

सामाजिक आरोग्य : सामाजिक उपक्रमात भाग घेणे. सामाजिक जबाबदारीची जाणीव, सामाजिक स्वच्छता पाळणे, वाहतुकीचे नियम पाळणे, सामाजिक नीतिमत्ता, सार्वजनिक गोष्टींचे संरक्षण करणे. याबरोबरच सामाजिक शांतता, प्रदूषण, लसीकरण आणि इतर गोष्टींचे पालन करणे. 

एखादा छंद, कला जोपासणे : वाचन करणे आणि चित्रपट पाहणे हा छंद प्रत्येकालाच असतो. पण त्यासमवेत बागकाम, वाद्यवादन, गायन, चित्रकला, फोटोग्राफी किंवा अन्य कोणतीही कला किंवा छंद जोपासणे आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरेल.

दैनंदिन आरोग्य (हायजिन) : रोजच्या दैनंदिन क्रिया म्हणजे शौचाला जाणे, शास्त्रीय पद्धतीने दात स्वच्छ करणे, स्वच्छ अंघोळ करणे, हात धुणे, स्वच्छ कपडे घालणे, केस ठीकठाक ठेवणे, नियमितपणे नखे कापणे जेवताना काही पदार्थ, पालेभाज्या, फळे खाण्याचे न टाळणे, तसेच भुकेपेक्षा खूप जास्त न खाणे, दर तीन-चार तासांनी थोडे थोडे खाणे, दिवसभरात २ ते ३ लिटर पाणी पिणे या सवयी आयुष्यभर आरोग्याचे रक्षण करतात. 
 उत्तम शारीरिक आरोग्य, स्थिर आणि समतोल मानसिकता, चांगल्यासवयी यांनी व्यक्तिमत्त्व सुधारते. कोणत्याही व्यावसायिक करिअरमध्ये या गोष्टींचे महत्त्व चिरंतन असते. त्यामुळे यशाचा पाया रोवला तर जातोच, पण यशाची नवनवीन शिखरे गाठणे आणि त्यावर विराजमान राहण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येते.

आरोग्याचे नियोजन
 आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याचे करिअर निवडण्यासाठी पालकवर्ग मुलांच्या नववी दहावीपासून सतर्क असतो. वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षीच मुलांना आयआयटीचे क्‍लासेस, दहावीमध्ये असताना मुलांची ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेणे, त्याला बारावीमध्ये आणि सीइटीमध्ये उत्तम मार्क्‍स पडावे यासाठी अकरावीमध्येच त्याला असंख्य क्‍लासेस लावून त्याच्याकडून मरेस्तोवर मेहनत करून घेणे, यामध्ये पालकवर्ग अगदी सरसावून तयार असतो. आपल्या मुलाचा भावी काळ अत्युत्तम जावा, त्याला जीवनात हमखास यश देणारे करिअर मिळावे यासाठीच त्यांचा सारा आटापिटा असतो. खरे तर यात काहीच वावगे नसते. पण यात त्यांचे चुकते एवढेच की समतोल, चौरस आहार, नियमित व्यायाम आणि पुरेपूर विश्रांती या आरोग्याच्या मूलभूत त्रिसूत्रीकडे त्यांचे संपूर्ण दुर्लक्ष होते; शिवाय ‘उत्तम मार्क्‍स पडून पास व्हायला पाहिजे’ या दुराग्रहाच्या जबरदस्त तणावाखाली त्याला दोन-तीन वर्षे ठेवून त्याच्या मानसिक आरोग्याचीही वासलात लावली जाते.

आज अठराव्या ते विसाव्या वर्षी स्थूलत्व, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेली कित्येक तरुण मुले आढळून येतात. याचे कारण नेमक्‍या या दोन-तीन वर्षांत त्यांनी आरोग्याच्या नियमांकडे संपूर्णत: पाठ फिरवलेली असते. वस्तुतः ज्याप्रमाणे अगदी नववीपासून या मुलांच्या शालेय अभ्यासाकडे विशेष ध्यान दिले जाते, त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे. कारण याच वयात जर त्यांनी आरोग्याची धुळाक्षरे गिरवली, तर पुढच्या आयुष्यात त्यांनी करिअर कुठलेही करो, भरभक्कम तब्येतीचा पाया त्यांच्या प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात साथ देईल.

संबंधित बातम्या