विज्ञान शाखेतील पर्याय...
करिअर विशेष
अकरावीमध्ये असताना PCB अथवा PCM अथवा PCMB विषय निवडल्यास फक्त त्याच विषयांच्या अभ्यासाकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. बारावीमध्ये गेल्यानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा आपल्या प्रगतीचा आढावा घेऊन आपल्याला बारावी व संबंधित सीईटीमध्ये किती गुण मिळतील याचा अंदाज घ्यावा लागतो. त्यावरून कोणकोणत्या सीईटी द्यायच्या याचे नियोजन करावे लागते. कारण अनेक सीईटी परीक्षांचे फॉर्म नोव्हेंबरपासूनच उपलब्ध होतात. प्रत्यक्षातील करिअर निवड मात्र जूनमधील बारावी व सीईटी परीक्षांच्या निकालावर करावी लागते.
वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, वास्तूशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, कृषी, पशुवैद्यकीयशास्त्र अशा अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षांना सामोरे जावे लागते.
आरोग्यविज्ञान शाखेतील प्रवेशासाठीच्या सीईटी
NEET - National Eligibility Cum Entrance Test
सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयानुसार देशभरातील शासकीय, शासन अनुदानित तसेच खाजगी व अभिमत विद्यापीठामधील MBBS व BDS शाखांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेण्यात येत आहे.
MBBS च्या देशभरातील सुमारे ४९७ महाविद्यालयातून ६१ हजार जागा व ३१३ महाविद्यालयातून BDS शाखेच्या २७ हजार जागांवरील प्रवेश या एकाच परीक्षेतील गुणांच्या आधारे देण्यात येतात. (AIIMS व JIPMER संस्था वगळून) आरोग्यविज्ञान शाखेतील BAMS, BHMS सह उर्वरित शाखांचे राज्यातील प्रवेश नीटमधूनच देण्यात येतात. सन २०२० पासून देशभरातील सर्व राज्यातील प्रवेशासाठी नीट परीक्षा ‘आयुष’ मंत्रालय नवी दिल्लीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
- नीट परीक्षा नॅशन टेस्टिंग एजन्सी NTA तर्फे देशपातळीवर घेण्यात येते.
देशभरातून सुमारे १५ लाख तर राज्यातून २ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देतात.
प्रवेशासाठीचे ऑनलाइन अर्ज ऑक्टोबर - नोव्हेंबर तर परीक्षा सर्वसाधारणपणे मे च्या पहिल्या आठवड्यात होते.
www.nta.nic.in संकेतस्थळावर माहिती
महाराष्ट्र राज्यातील शासकीय, खासगी महाविद्यालयातील MBBS, BDS, BAMS, BHMS सह सर्व उर्वरित नऊ शाखांचे (सुमारे २८ हजार जागा) प्रवेश राज्य सामाईक परीक्षा कक्ष मुंबई अंतर्गत DMER तर्फे www.dmer.org संकेतस्थळवरून एकदाच एकत्रित पसंतीक्रम नोंदवून अनेक प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून प्रवेशप्रक्रिया राबविली जाते.
AIIMS ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स
नवी दिल्लीसह देशभरातील १५ संस्थांमधून सुमारे १२०० जागा उपलब्ध होता. शैक्षणिक शुल्के फक्त ४ हजार रुपये प्रतिवर्षे असल्यामुळे या नामांकित संस्थेमध्ये प्रवेशासाठी प्रचंड चुरस असल्यामुळे आपली बौद्धिक क्षमता तपासूनच निवड करावी. संपूर्ण वेळापत्रक, ऑनलाइन अर्ज डिसेंबरमध्ये www.aiimsexams.org संकेतस्थळावर उपलब्ध होतात.
JIPMER जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल ॲण्ड रिसर्च या नामांकित संस्थेतील पाँडेचरी येथे १५० व कराईकल येथे ५० अशा २०० जागा MBBS शाखेच्या उपलब्ध होतात. सर्व जागा शासकीय असून वसतिगृहासह शुल्क सुमारे १२ हजार वार्षिक असल्यामुळे उच्च बुद्धिमत्ता आवश्यक. www.jipmer.edu.in संकेतस्थळावर मार्च महिन्यात ऑनलाइन अर्ज उपलब्ध होतात व परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होते. थोडक्यात आरोग्यविज्ञान शाखेतील प्रवेशासाठी देशभरामध्ये NEET, AIIMS व JIPMER या तीनच परीक्षा घेतल्या जातात.
आरोग्य विज्ञान शाखेतील प्रवेश प्रक्रिया
देशपातळीवरील १५ टक्के प्रवेश ः
देशभरातील MBBS, BDS शाखेतील शासकीय महाविद्यालातील १५ टक्के जागेवरील प्रवेश नीट परीक्षेमधून प्राप्त होणाऱ्या ऑल इंडिया कोटा (AIQ) रॅंकनुसार देण्यात येतात. संपूर्ण प्रवेशप्रक्रिया ही एसीसी मेडिकल कौन्सिलिंग कमिटीतर्फे www.mcc.nic.in संकेतस्थळावरून राबविली जाते.
महाराष्ट्र राज्यातील ८५% कोट्यातील प्रवेश ः
महाराष्ट्र राज्यातील शासकीय, खासगी महाविद्यालयातील एमबीबीएस, बीडीएस शाखेतील ८५% कोट्यातील प्रवेश राज्यातील इच्छूक विद्यार्थ्यांकडून नावनोंदणी करून नीटच्या ऑल इंडिया रॅंकच्या आधारे प्रत्येक विद्यार्थ्याला राज्यस्तरीय गुणानुक्रमांकाचे वाटप करून त्याद्वारे दिले जाते. संपूर्ण प्रवेशप्रक्रिया राज्याच्या सीईटी सेल अंतर्गत संकेतस्थळावून ऑनलाइन पद्धतीने पसंतीक्रम नोंदवून राबविली जाते.
अभिमत विद्यापीठ (Deemed University) प्रवेश
देशभरातील सर्व अभिमत विद्यापीठातील MBBS व BDS शाखांचे प्रवेश नीट परीक्षेच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या ऑल इंडिया रॅंकनुसार दिले जातात. प्रवेश प्रक्रिया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, दिली यांच्या अंतर्गत मेडिकल कौन्सिलिंग कमिटीतर्फे राबविण्यात येते.
AFMC आर्मेड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे ः
MBBS शाखेच्या ११५ मुले व ३० मुली अशा १४५ जागा उपलब्धघ आहेत. प्रवेशासाठी सीईटी नसून नीटच्या निकालानंतर www.mcc.nic.in संकेतस्थळावर नावनोंदणी करून त्यांच्यातर्फे सुमारे १७५० विद्यार्थ्यांची निवड यादी AFMC कडे पाठिवली जाते. संस्थेतर्फे स्वतंत्र चाचणी परीक्षा वैद्यकीय तपासणी व मुलाखत यामधून अंतिम प्रवेश दिले जातात.
MGIMS वर्धा
महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सेवाग्राम, वर्धा येथील MBBS प्रवेशक्षमता १०० असून त्यापैकी ५० जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी व उर्वरित ५० जागा देशातील इतर राज्यासाठी उपलब्ध होतात. प्रवेशासाठी स्वतंत्र परीक्षा नसून नीटमधील गुणांच्या आधारे
प्रवेश देण्यात येतात. राज्यातील
प्रवेशप्रक्रिया डीएमईआर, मुंबई तर देशातील प्रवेशप्रक्रिया मेडिकल कौन्सिलतर्फे राबविण्यात येते.
विद्यार्थी पालकांनी अद्ययावत माहितीसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी www.nta.nic.in राज्य सीईटी सेल www.mahacet.org व डीएमईआर www.dmer.org संकेतस्थळाच्या संपर्कात राहावे.
कागदपत्रांची तयारी
यशस्वी प्रवेश प्राप्त करण्यासाठी दाखले, कागदपत्रे यांची वेळीच तयारी करावी लागते. सीईटी परीक्षांचे फॉर्म भरताना कोणतेही दाखले सादर करावे लागत नाहीत. त्यामुळे निकाल लागल्यानंतर पालक विद्यार्थी दाखल्यांसाठी तहसील कार्यालयाकडे धाव घेतात. त्यावेळी प्रचंड गर्दीमुळे दाखले काढण्यासाठी वेळ लागतो व मानिसक त्रासही सहन करावा लागतो. दाखल्याअभावी चांगल्या प्रवेशाला मुकावे लागू नये म्हणून वेळीच दाखले काढावेत.
दाखले कोठे मिळतात
महत्त्वाचे दाखले तहसील, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून प्राप्त करावे लागतात. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नागरीक सुविधा केंद्र असते त्या ठिकाणाहून प्रथम अर्जाचे नमुने प्राप्त करून योग्य त्या कागदपत्रांसह त्याच ठिकाणी अर्ज सादर करून दाखले काढावेत.
सर्वांसाठी आवश्यक असा रहिवासी दाखला (डोमिसाईल) विद्यार्थ्यांच्या नावाने काढणे आवश्यक, वय, अधिवास व राष्ट्रीयत्व असा एकत्रित दाखला मिळतो. राज्यातील अनुसूचित जाती व जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातील, इतर मागासवर्ग व एसईबीसी प्रवर्गातील सर्वांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला आवश्यक. त्याचबरोबर जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक, अन्यथा प्रवेश खुल्या प्रवर्गातून घ्यावा लागतो. एससी, एसटी वगळता आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पालकांचा नॉन क्रिमीलेअर दाखला आवश्यक असतो. कुटुंबाचे म्हणजे आई-वडिलांचे एकत्रित उत्पन्न ८ लाख पक्षा कमी असावे लागते.
लष्कर सेवा (डिफेन्स, अपंग प्रवर्ग महाराष्ट्र कर्नाटक सीमाक्षेत्र (एम.के.बी.), डोंगरी प्रदेश, फी माफीसाठी मागील एक वर्षाचा उतपन्नचा दाखला तसेच कृषी, पशुवैद्यकशास्त्र असा वेगळ्या अभ्यासक्रमासाठी काही अतिरिक्त दाखल्यांची आवश्यक्ता असते. थोडक्यात ज्या शाखेत प्रवेश घ्यावयाचा आहे त्या माहितीपत्रकाचा अभ्यास करून दाखले वेळेत काढावेत.
विषय अत्यंत गहन व मोठा असल्यामुळे अचूक सीईटी परीक्षांची निवड, शैक्षणिक पात्रता, उपलब्ध जागा, जागावाटप, शैक्षणिक शुल्क, फॉर्म भरण्याची पद्धत, वेळापत्रक, प्रवेश प्रक्रिया, प्रवेशासाठीची कागदपत्रे, दाखले यांची सखोल माहिती हेमचंद्र शिंदे लिखित व सकाळ प्रकाशनातर्फे दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शिकामध्ये देण्यात आलेली आहे. राज्यातील निवडक सकाळ कार्यालय व प्रमुख विक्रेत्यांकडे मार्गदर्शिका उपलब्ध असून त्यासाठी सकाळ ०२०-२४४०५६७८ / ८८८८८४०५ वरती संपर्क साधावा.
सर्व परीक्षांचे वेळापत्रक, माहितीपत्रक तसेच सकाळ लेखमालेतून प्रसिद्ध होणारे लेख यासाठी www.hemchandra.in संकेतस्थळास आवश्य भेट द्या.