परकीय भाषा शिक्षणाचं महत्त्व

मेधा पुरकर 
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
 

शब्द आणि शब्दांची भाषा ही उत्क्रांतीदरम्यान माणसाला मिळालेली मोठी देणगी आहे. मुळातच बुद्धिमान असणाऱ्या माणसाने या देणगीचा आपले आयुष्य सुकर आणि समृद्ध करण्यासाठी पुरेपूर उपयोग आणि वापर केला आहे. जगात आजमितीला २०० च्या आसपास भाषा बोलल्या जातात. आधुनिक जगात जो देश अधिक बलशाली, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा, त्या देशाची भाषासुद्धा मग महत्त्वाची बनून जाते. 
नवनवीन नोकरीच्या, व्यवसायाच्या, करियरच्या संधी तिथे निर्मण होतात आणि ती भाषा माहीत असणाऱ्या लोकांना आपसूकच त्याचा फायदा मिळतो. त्यातून आजचा जमाना तर जाहिरातीचा आणि माहिती तंत्रज्ञानाचा आहे. वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात अनुवादित होत असतात, फक्त जाहिरातीच नव्हे तर इंटरनेटवरून अनेक प्रकारची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याची अहममिका असते. म्हणूनच दिवसेंदिवस एक परकीय भाषा आणि एक स्थानिक भाषा उत्तम येत असणाऱ्या अनुवादकांना वाढती मागणी आहे. 
एक परकीय भाषा जेव्हा आपण शिकतो तेव्हा फक्त भाषाच नाही तर त्या भाषेच्या माध्यमातून तो देश, तिथला भौगोलिक प्रदेश, तिथली माणसं, त्यांचा इतिहास, त्यांची संस्कृती, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांचे साहित्य आशा सगळ्यांचीच ओळख होते, दुसऱ्यांचा विनाअट स्वीकार करण्याची आपली मानसिकता वाढीस लागते, आपण खूप खुल्या मनानी सगळीकडे बघू लागतो, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि एक माणूस म्हणून आपण अजून समृद्ध होतो. मातृभाषा, त्याहून वेगळी अशी एक राष्ट्र भाषा आणि इंग्रजी अशा तीन भाषा तर बहुतेक सगळ्या भारतीयांना येत असतात, त्यामुळे अजून एक परकीय भाषा शिकणं हे आपल्यासाठी खूप अवघड नसतं. त्यामुळे ज्यांना शक्‍य आहे, ज्यांना भाषेची आवड आहे, त्यांनी तर एक परकीय भाषा शिकावीच; पण ज्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचे ध्येय आहे त्यांनी तर नक्कीच शिकावी. परंतु सगळ्या गोष्टी त्वरित मिळण्याच्या आजच्या युगात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे एखाद्या परकीय भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी ती भाषा कमीत कमी २ ते ५ वर्षे अविरतपणे शिकावी लागते. 

फ्रेंच भाषेतील करिअरच्या संधी 
फ्रेंच भाषेबद्दल बोलायचं तर जगामध्ये जवळजवळ ४० देशांमध्ये ही भाषा बोलली जाते. जिथे जिथे फ्रेंच वसाहती होत्या त्या त्या देशांमध्ये फ्रेंच ही त्यांच्या स्थानिक भाषेच्या बरोबरीने वापरली जाणारी भाषा आहे. फ्रान्समध्ये तर फ्रेंच भाषा बोलली जातेच, परंतु त्याव्यतिरिक्त कॅनडामध्ये फ्रेंच ही इंग्रजीच्या बरोबरीने वापरली जाणारी भाषा आहे. स्वित्झर्लंड, बेल्जियम, ट्युनिशिया या आणि अजून काही युरोपीय व आफ्रिकन देशांमध्ये फ्रेंच भाषा येत असेल तर सुरळीतपणे कामे होतातच, शिवाय युरोपियन युनियन, UNO अशा आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कामकाजात फ्रेंच भाषा वापरली जाते. गेल्या काही वर्षात अनेक फ्रेंच कंपन्या भारतात त्यांची ऑफिसेस थाटू लागल्या आहेत आणि अनेक भारतीय कंपन्या फ्रेंच प्रोजेक्‍ट्‌सवर काम करत आहेत, अशा वेळी ती भाषा उत्तम येणाऱ्या व्यवस्थापन पदावरील व्यक्तीस त्याचा फायदा मिळतो अथवा ऑनसाइट काम करणाऱ्या एखाद्या इंजिनिअरला थोडेफार फ्रेंच येत असेल तर त्यास प्राधान्य दिले जाते. भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करत असल्याने फ्रेंच सरकार आणि भारतीय सरकार यांचे  आंतरराष्ट्रीय संबंध जसजसे सुधारत जातील तसतसे फ्रेंच भाषा आणि एक भारतीय भाषा यावर प्रभुत्व असणाऱ्या लोकांना मागणी वाढत जाणार आहे. देसॉल्ट, लॉरेआल, एअर बस, अक्‍सा अशा काही फ्रेंच कंपन्यांची नावे आपल्याला चांगली परिचयाची आहेत जिथे फ्रेंच भाषा जाणकारांना संधी मिळते. ऑटोमोबाईल, सॉफ्टवेअर, एरोनॉटिकस, फार्मा, पर्यटन, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रातील पदवी आणि फ्रेंच भाषेचं ज्ञान हे गाठीशी असेल तर भरपूर वाव मिळण्याची शक्‍यता आहे.
शिकवण्याची कला अवगत असेल तर फ्रेंच भाषा शिक्षक म्हणूनदेखील चांगले करियर करता येते.  खूपशा CBSE /ICSE बोर्डच्या शाळांमध्ये आजकाल ६ वी पासून फ्रेंच भाषा शिकवली जाते. मॅनेजमेंट , इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये फ्रेंच भाषा शिक्षक हवे असतात. अनुवाद आणि भाषांतर या क्षेत्रातदेखील वाढत्या संधी आहेत. त्यासाठी मात्र फ्रेंच भाषेमध्ये C१ हे आंतरराष्ट्रीय परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अथवा M. A पर्यंतचे शिक्षण घेणे आवश्‍यक आहे. फ्रेंच भाषा कुठेही शिकलात तरी आता आंतरराष्ट्रीय परीक्षा देण्याची सोय उपलब्ध आहे. DELF exams या नावाने त्या ओळखल्या जातात. या प्रमाणपत्रास जगभरात मान्यता आहे वर्षातून चार वेळा या परीक्षा घेतल्या जातात. DELF चे ६ टप्पे आहेत. A१ ही पहिली परीक्षा, मग A२, B१, B२, C१ व शेवटची C२ परीक्षा असते. सर्व युरोपियन भाषांसाठी अशाच पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र परीक्षा आता अस्तित्वात आहेत 

फ्रेंच भाषा शिकवणारी केंद्रे 

 • Alliance Francaise , पत्रकारनगर, पुणे 
 • परकीय भाषा विभाग -सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी (रानडे इन्स्टिट्यूट) - फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे
 • S I F I L (सिमबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लॅंग्वेजस) - मॉडेल कॉलनी, पुणे  

इतर परकीय भाषा 
जर्मन :
जगातील विकसित देशांपैकी एक असणाऱ्या जर्मनीची जर्मन ही राष्ट्रभाषा. युरोपियन युनियनचे कामकाज ज्या भाषांमध्ये चालते त्यातील एक भाषा म्हणजे जर्मन. गेल्या काही वर्षांमध्ये जर्मनीमधील अनेक विद्यापीठांमध्ये भारतीय तरुण उच्च शिक्षणासाठी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांना जर्मन भाषेचे ज्ञान असणे आवश्‍यक असल्याने या भाषेच्या शिक्षणास महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याशिवाय 
पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूस जवळजवळ २५० पेक्षा जास्त जर्मन कंपन्या आहेत. त्यातील बहुतांश ऑटोमोबाईल क्षेत्रातील आहेत. Wolkes Wagon, Mercedez Benz ह्या काही त्यातील नामवंत कंपन्या. त्याबरोबरच अजून या क्षेत्रातदेखील जर्मन जाणकारांना भरपूर काम आहे. फ्रेंच भाषेप्रमाणेच जर्मन भाषदेखील खूपशा SSC /ICSE/CBSE बोर्डच्या शाळांमध्ये शिकवली जाते, त्यामुळे जर्मन भाषा शिक्षक म्हणून भरपूर संधी उपलब्ध आहेत. जर्मन अनुवादक आणि भाषांतरकार पदावरदेखील अनेक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहेत. सर्व युरोपियन भाषांची आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र परीक्षा एकसारखीच असल्याने A१, A२ , B१. B२, C१, C२ अशा परीक्षा असतात व जर्मन भाषेतच कारकीर्द करायची असल्यास C१अथवा C२ किंवा M A जर्मन असणे अनिवार्य आहे.

जर्मन भाषा शिकवणाऱ्या संस्था  

 • मॅक्‍स मूलर भवन, पुणे 
 • परकीय भाषा विभाग - सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी (रानडे इन्स्टिट्यूट) - फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे
 • S I F I L (सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लॅंग्वेजस) - मॉडेल कॉलनी, पुणे

स्पॅनिश भाषा 
 स्पेन देशाची राष्ट्रभाषा असणारी स्पॅनिश दक्षिण अमेरिकेतदेखील अनेक ठिकाणी बोलली जाते. अमेरिकेतदेखील स्पॅनिश भाषा ही द्वितीय भाषा म्हणून शाळांमध्ये शिकवली जाते. स्पॅनिश गाणी तरुणांमध्ये लोकप्रिय असल्याने अनेकांचा ती भाषा शिकण्याकडे कल वाढला आहे. स्पॅनिश भाषा चांगली अवगत असेल तर करिअरच्यादेखील अनेक संधी उपलब्ध आहेत. आजकाल IB बोर्डच्या शाळांमध्ये स्पॅनिश शिकवले जाते, तिथे शिक्षक हवेच असतात. अनेक स्पॅनिश भारतात येतात योग आणि आयुर्वेदाचं शिक्षण घ्यायला तेव्हा त्यांना अनुवादकांची गरज असते, पर्यटन व्यवसायिकांना  देखील स्पॅनिश भाषा येत असेल तर फायदा होतो. स्पॅनिश हीसुद्धा एक युरोपियन भाषा असल्याने A१, A२ , B१. B२ , C१ ,C२ अशाच परीक्षा असतात व या भाषेतच करिअर करायचे असल्यास M A स्पॅनिशदेखील करता येते 

स्पॅनिश भाषा शिकवणाऱ्या संस्था  

 • Instituto espagnol, पुणे 
 • परकीय भाषा विभाग -सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी (रानडे इन्स्टिट्यूट ) - फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे
 • S I F I L (सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लॅंग्वेजस) - मॉडेल कॉलनी, पुणे

जपानी भाषा 
ही आशियाई भाषांपैकी एक महत्त्वाची भाषा आहे. जपान हा एक विकसित देश असल्याने आणि भारत सरकार व जपानी सरकार यांच्यात काही करार झाल्याने अनेक जपानी कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. फुजितसू, होंडा या काही नावाजलेल्या कंपन्या आपल्याला माहीत आहेतच. जपानी व्यवस्थापन असणाऱ्या सर्व कंपन्यांमध्ये जपानी भाषा जाणणारे कर्मचारी हवेच असतात, त्याव्यतिरिक्त इन्फोसिस, टीसीएस अशा भारतीय कंपन्यादेखील जपानी बोलू शकणाऱ्या इंजिनिर्सना प्राधान्य देतात. जपानी भाषेच्या अभ्यासानंतर JLPT (Japanese language prefesiancy test) च्या N५ पासून N१ पर्यंतच्या परीक्षा देत येतात. चांगल्या नोकरीची संधी हवी असेल तर N३ प्रमाणपत्र असणे आवश्‍यक असते. 

जपानी भाषा शिकवणाऱ्या संस्था  

 • परकीय भाषा विभाग -सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी (रानडे इन्स्टिट्यूट) - फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे
 • S I F I L (सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लॅंग्वेजस) - मॉडेल कॉलनी, पुणे
 • टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे

चायनीज भाषा 
सगळ्यात जास्त लोकसंख्या असल्याने जगात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा आहे चायनीज! दिवसेंदिवस ही भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणाऱ्या लोकांचे महत्त्व वाढत जात आहे. एक बलाढ्य आर्थिक सत्ता होऊ पाहणारा हा चीन देश आपला शेजारी असल्याने तर चायनीज भाषा येणाऱ्या तज्ज्ञांची गरज वाढत जाणार आहे. लष्करी सेवेपासून ते अगदी manufacturing इंडस्ट्री पर्यंत चायनीज जाणणाऱ्या भाषांतरकरांना बोलावले जाते. जपानी भाषेसारखीच चायनीज भाषेची लिपी देखील चित्रलिपी असल्याकारणाने ती भाषा लिहायला आणि वाचायला शिकणं हे थोडं अवघड वाटू शकतं, पण चायनीजच्या काही लेव्हल्स करून नोकरीच्या संधी मिळू शकतात. 
HSK१ ,२,३,४ अशा आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र परीक्षा चायनीज भाषेसाठी देता येतात.

चायनीज भाषा शिकवणाऱ्या संस्था  

 • SIFIL (सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लॅंग्वेजस) - मॉडेल कॉलनी, पुणे

रशियन भाषा 
रशिया आणि भारत यांचे संबंध गेल्या अनेक वर्षांचे आहेत, तरीही रशियन येणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या खूप थोडी आहे आणि मागणी मात्र भरपूर आहे. रशियन भाषेची लिपी थोडीशी वेगळी आहे. पर्यटन क्षेत्रात, औषधे-यंत्रनिर्मिती या क्षेत्रात अनुवादक म्हणून रशियन भाषातज्ज्ञांना बोलावले जाते. योगाभ्यास, आयुर्वेद आणि वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठीदेखील रशियन नागरिक भारतात येत असतात, त्यांना अनुवादक गरजेचे असतात, लष्करी सेवेमध्ये, काही सरकारी संस्थांमध्ये देखील रशियन भाषांतरकार काम करतात. 
रशियन भाषा शिकवणाऱ्या संस्था  

 • परकीय भाषा विभाग -सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी (रानडे इन्स्टिट्यूट) - फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे येथे रशियन भाषेतील पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध आहे. 
 • कोल्हापूर विद्यापीठ
 • मुंबई विद्यापीठ 

कोरियन भाषा 
Samsung , LG  या कोरियन मोबाईल कंपन्या जगप्रसिद्ध आहेत. खेळ, संशोधन, यंत्रनिर्मिती या क्षेत्रातही कोरियन भाषाज्ञान उपयोगाला येते. उत्तर व दक्षिण कोरियाची राष्ट्र भाषा असणारी कोरियन भाषा शिकण्यासाठी इंजिनिअरिंग क्षेत्रातील लोक आता उत्साह दाखवू लागले आहेत. TOPIK नावाची या भाषेची परीक्षा असते, परंतु पुण्यात फक्त SIFIL (सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लॅंग्वेजस - मॉडेल कॉलनी) मधेच ही भाषा शिकवली जाते.  

 
 

संबंधित बातम्या