फार्मसी करिअरचा राजमार्ग
करिअर विशेष
सध्या फार्मसीसारखे क्षेत्र अत्युच्च शिखरावर आहे. रोजगाराच्या अनेक संधी त्याबरोबरच स्वयंरोजगाराची संधी यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा फार्मसीला प्रावीण्य घेण्याकडे ओढा निर्माण झाला आहे.
अन्न, वस्त्र, निवारा यांबरोबरच आता औषध ही मूलभूत आणि अत्यावश्यक गरज निर्माण झाली आहे. एखादी व्यक्ती केवळ औषधांच्या जोरावरच टिकून आहे, असे बोलले जाते. अशा औषध निर्मिती क्षेत्रात आपण प्रवेश करीत आहोत. त्यामुळे या क्षेत्रात असलेल्या संधीबाबत आपण जागरूक असले पाहिजे. तसेच आपल्याला याबाबत अधिक कल्पना यावी, यासाठी नोकरी आणि व्यवसायाच्या कोणत्या संधी आहेत, याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे.
औषध उत्पादन कंपन्यांमध्ये औषध निर्मिती व शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साधनांच्या निर्मितीसाठी, बल्क ड्रग्स, क्लिनिकल ट्रायल मटेरियल, एक्सीपीएंटस, इंटरमिजिएट, केमिकल्स, मेडिकल डिव्हायसेस, ड्रग फॉर्म्युलेशन्स, ड्रग कॉम्बिनेशन्स, डायग्नोस्टिक, मटेरियल्स व इतर औषध निर्मितीसाठी प्रोडक्शन ऑफिसर या पदावर तसेच सौंदर्य प्रसाधने उत्पादन कंपन्यांमध्ये डी फार्म, बी फार्म पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना प्रोडक्शन ऑफसर या पदावर संधी उपलब्ध आहेत. तसेच न्यूट्रास्युटिकल्स व अन्न उत्पादन कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी आहेत.
औषध निर्मितीमध्ये गुणवत्ता नियंत्रण अत्यंत महत्त्वाची बाब आहे. यासाठी बी फार्मसी पदवीधारकांची औषध गुणवत्ता नियंत्रक म्हणून नेमणूक होते. तसेच क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी ॲशुरन्स, इन प्रोसेस क्वालिटी कंट्रोल, गुड मॅन्युफॅक्चरींग प्रॅक्टिसेस, डॉक्युमेंटेशन, प्रोसेस व्हॅलीडेशन, क्वालिटी व्हॅलिडेशन, बायो स्टॅटिस्टीक्स या क्षेत्रात बी फार्म पदवीधारकांना करिअर करता येईल.
नवीन औषधांचा शोध लावणे (आरअँडडी) आणि त्यांचे विविध फॉर्म्युलेशन बनविण्यासाठी गॅलॅनिकल रिसर्च, फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट (एफ ॲण्ड डी), ॲनालिटिकल रिसर्च, क्लिनिकल रिसर्च, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट, फार्माकोव्हिजिन्स व अशा विविध क्षेत्रांत फार्मसी पदवीधारकांना प्राधान्य असते. क्लिनिकल ट्रायल आणि संशोधन कंपन्यांत (कॉन्ट्रक्ट रिसर्च ऑरगनायझेशन - सी.आर.ओ.) क्लिनिकल रिसर्च असोसिएट्स आणि डाटा अनालिस्ट या पदांसाठी बी. फार्म विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध आहेत. रेग्युलेटरी अफेअर्स, ड्रग रजिस्ट्रेशन फाइलिंग, ड्रग पेटंटिंग या नवीन क्षेत्रात फार्मसी पदवीधारकांना उज्ज्वल करिअरची संधी उपलब्ध आहेत.
औषध निर्माण कंपनीत औषध विक्री प्रसारासाठी डी. फार्म किंवा बी.फार्म उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रोफेशनल सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह तसेच औषध निर्माण कंपनीतील मार्केट रिसर्च, प्रोडक्ट मॅनेजमेंट, सेल्स अँड मार्केटिंग, मेडिकल ॲडव्हर्टायझिंग, ड्रग इंपोर्ट- एक्सपोर्ट व अशा अन्य विभागात बी.फार्मसी विद्यार्थ्यांची प्राधान्याने निवड होते.
औषध निर्मिती कंपन्यांमधील मटेरियल्स मॅनेजमेंट विभागात स्टोर हाऊस, वेअर हाऊस ऑफिसर, एक्झिक्युटीव्ह, मॅनेजर याखेरीज प्रोडक्शन प्लॅनिंग अँड इनव्हेंटरी कंट्रोल (पी.पी.आय.सी.) कॉस्टिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, टेक्निकल सपोर्ट सर्व्हिसेस डिपार्टमेंट व अशा अन्य विभागांत फार्मसी पदवीधारकांना करिअरची संधी उपलब्ध आहेत. तसेच पर्चेस डिपामार्टमेंटमध्ये पर्चेस ऑफिसर, पर्चेस एक्झिक्युटिव्ह, पर्चेस मॅनेजरपदांसाठी तसेच पॅकेजिंग डिपार्टमेंटमध्ये पॅकेजिंग ऑफिसर, पॅकेजिंग एक्झिक्युटिव्ह, पॅकेजिंग मॅनेजर या पदासाठी फार्मसी पदवीधारकांना संधी असते.
लॉजिस्टिक, ड्रग सप्लाय चेन मॅनेजमेंट, कोल्ड स्टोरेज या व्यतिरिक्त टॉक्सीकोलॉजी लॅब, पॅथोलॉजी लॅब, डायग्नोस्टीक लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून फार्मसी पदवीधारकांना संधी आहेत.
बी. फार्म पदवीधारकांना सरकारी नोकरीच्या संधीदेखील उपलब्ध आहेत. सरकार दवाखान्यात फार्मासिस्ट, अन्न व औषध प्रशासनात ड्रग इन्स्पेक्टर, सी.डी.आर.आय., डी.सी.आय, आय.सी. एम.आर., एक्साईज, डब्ल्यू, एच.ओ. आणि यु.एस.एफ.डी.ए. च्या भारतातील शाखा, लोकसेवा व राज्यसेवा परीक्षेस पात्र, सरकारी औषध गुवणत्ता नियंत्रक, सशस्त्र सेना दलासाठी फार्मासिस्ट, रेल्वे हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट या पदांसाठी डी. फार्म किंवा बी. फार्म उमेदवारांचीच गरज असते.