डिझायनिंग-आश्‍वासक करिअर

विवेक वेलणकर
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
 

जगभरात डिझायनिंग या क्षेत्राला प्रचंड मागणी आणि वाव आहे. त्या मानाने भारतात अजून हे क्षेत्र लहान आहे; परंतु गेल्या काही वर्षांत हे क्षेत्र भरारी घेऊ लागले आहे.
डिझायनिंग ही एक कला आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, अशा तरुण-तरुणींना या क्षेत्रात भरपूर संधी आहेत. प्रॉडक्‍ट डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन डिझायनिंग इ. विषयात या शाखेतून स्पेशलायझेशन करता येते.
या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणं आवश्‍यक असतं. कोणत्याही शाखेतून बारावी नंतर या क्षेत्रात करिअर करण्यासाठी राष्ट्रीयस्तराकडे नावाजलेल्या दोन संस्थांची माहिती घेऊयात.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (अहमदाबाद) 
भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत १९६१ मध्ये स्थापन झालेली ही संस्था जागतिक स्तरावर नावाजलेली आहे. या संस्थेत पदवी आणि पदव्युत्तर, असे दोन्हीही कोर्सेस चालवले जातात. बारावीनंतर चार वर्षांचा ‘ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन डिझाईन’ नावाचा कोर्स येथे उपलब्ध आहे. या कोर्सच्या प्रवेशासाठी जाहिरात दरवर्षी सप्टेंबरमध्ये भारतातील प्रमुख वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होते. यासाठीचे अर्ज संस्थेच्या www.nid.edu या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतात. संपूर्ण भरलेले अर्ज नोव्हेंबरअखेरपर्यंत स्वीकारले जातात. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईमध्ये लेखी परीक्षा होते. यामध्ये डिझाईन ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते.यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांना मे महिन्यात अहमदाबादमध्ये स्टुडिओ टेस्ट आणि मुलाखत यांना सामोरे जावे लागते. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांची डिझाईनमध्ये करिअर करण्याची क्षमता तपासली जाते. यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मेअखेरपर्यंत प्रवेशाची सूचना मिळते. फक्त साठ जागा असणाऱ्या या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या दोन सेमिस्टरमध्ये फाउंडेशन कोर्स दिला जातो. यामध्ये ज्यांच्यातील डिझाईन कौशल्यक्षमता विकसित केल्या जातात. त्यानंतर तीन प्रकारच्या विशेष शाखांमध्ये म्हणजे इंडस्ट्रियल डिझाईन (प्रॉडक्‍ट डिझाईन, इंटेरिअर डिझाईन) कम्युनिकेशन डिझाईन (ग्राफिक डिझाईन, ॲनिमेशन, एक्‍झिबिशन) आणि टेक्‍सटाईल डिझाईनिंग त्यांना प्रावीण्य मिळवता येते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजी
भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था काम करते. शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता या बाबतीत संस्था जागतिक स्तरावर नावाजलेली आहे. संस्थेच्या दिल्ली, मुंबई, बंगळूर, चेन्नई, गांधीनगर, हैदराबाद, कोलकता येथे शाखा आहेत. बारावीनंतर चार वर्षांचा पदवी कोर्स येथे चालवला जातो. यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. यासाठीची जाहिरात डिसेंबरमध्ये विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होते. मुंबई येथे होणाऱ्या प्रवेशपरीक्षेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुलाखत व गटचर्चा यांना सामोरे जावे लागते. मे अखेरपर्यंत विद्यार्थ्यांची अंतिम प्रवेश यादी तयार होते.
या संस्थेत उपलब्ध असलेले बारावी नंतरचे कोर्सेस खालीलप्रमाणे ः

फॅशन डिझायनिंग 
बारावीला बसणाऱ्या किंवा बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत दोन तासांचा जनरल ॲप्टिट्यूड पेपर असतो. ज्यात गणितीय क्षमता, संख्यात्मक क्षमता, कम्युनिकेशन क्षमता, इंग्रजी यांची चाचणी होते. त्याचबरोबर तीन तासांची कलात्मक सृजन क्षमता चाचणी (क्रिएटिव्ह ॲबिलिटी) द्यावी लागते.

फॅशन टेक्‍नॉलॉजी 
बारावीला बसणाऱ्या किंवा बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा चार वर्षांचा ॲपरेल प्रॉडक्‍शनचा अभ्यासक्रम आहे. यालाही दोन तासांचा जनरल ॲप्टिट्यूड पेपर द्यावा लागतो. त्यानंतर तीन तासांची व्यवस्थापकीय क्षमता चाचणी द्यावी लागते. याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमही येथे उपलब्ध आहेत.

आयआयटी पवई 
आयआयटी पवई येथे ४ वर्षांचा बॅचलर ऑफ डिझायनिंग नावाचा कोर्स उपलब्ध आहे. यामध्ये इंडस्ट्रियल डिझाईन, व्हिज्युअल कम्युनिकेशन, इंटरॅक्‍शन डिझायनिक, ॲनिमेशन अँड मोबिलीटी अँड व्हेईकल डिझायनिंग या विषयातील शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते. यासाठी एक स्वतंत्र सीईटी आयआयटी पवईतर्फे घेतली जाते, ज्यामध्ये visualisation and spatial ability, observatiio and Design ability, Environment and Sepcial awareness, Analytical and Logical reasoning, Language and Creativity, Design thinking and problem solving या सहा विषयांवर आधारीत प्रश्‍न विचारले जातात. या कोर्सच्या अधिक माहितीसाठी www.idc.iitb.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या. डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजीमधील या जगविख्यात संस्थांखेरीज भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक संस्थांमध्ये पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र कोर्सेस उपलब्ध आहेत. नावीन्याची आवड आणि क्रिएटिव्हिटी असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक आश्‍वासक करिअर म्हणून फॅशन डिझायनिंगकडे नक्कीच बघता येईल.   

संबंधित बातम्या