कोविड टेस्टिंग किट्सचे जनक

अंजोर पंचवाडकर
रविवार, 7 जून 2020

गप्पा
कोरोना विषाणूच्या साथीच्या रोगाने हाहा:कार माजविला आहे. कोविडची साथ सुरू झाली तेव्हा अगदी सुरुवातीला आपल्याला टेस्टिंग किट्स आयात करावे लागत होते. मार्च महिन्याच्या सुरुवातीला मात्र भारताच्या दृष्टीने एक महत्त्वाची घटना घडली. पुण्याच्या ‘मायलॅब डिस्कव्हरी सॉल्युशन्स’ या कंपनीला कोविड टेस्टिंग किट्स तयार करण्यात यश मिळाले. मायलॅबच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) विभागातल्या शास्त्रज्ञांनी अवघ्या सहा आठवड्यांत हे किट तयार केले. यासंदर्भात मायलॅबच्या प्रतिमा आणि शैलेंद्र कवाडे यांच्याशी साधलेला हा संवाद.

अगदी योग्य वेळी कोविड टेस्ट्स किट्स उपलब्ध करून दिल्यात. यानिमित्ताने मायलॅबची पार्श्‍वभूमी जाणून घ्यायला आवडेल. मायलॅबची स्थापना कधी झाली? त्यामागची प्रेरणा काय होती? 
शैलेंद्र कवाडे : बायोटेक्नोलॉजीमध्ये पोस्टग्रॅज्युएशन केल्यानंतर मी काही काळ नोकरी करत होतो. लॅब इंडिया या कंपनीत नोकरी करत असताना तिथला सहकारी मित्र हसमुख रावळ आणि मी, आम्हाला दोघांनाही आपला स्वतःचा व्यवसाय असावा अशी तीव्र इच्छा होती. मला खरे तर लहानपणापासूनच, घरचे दुकान असल्याने व्यवसायाचे बाळकडू मिळालेले होते. नोकरीतला साचेबद्धपणाही माझ्या स्वभावाला फार काळ मानवणारा नव्हता. मग आम्ही दोघांनी नोकरी सोडून २०१४ मध्ये स्वतःची कंपनी सुरू केली. बरोबर राहुल आणि देबार्षी हे दोन मित्रही होते. सुरुवातीला फक्त ट्रेडिंग करत होतो. २०१५ पासून रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग सुरू करून हळूहळू रीएजंट्स, टेस्टिंग किट्स तयार करायला सुरुवात झाली.
प्रतिमा कवाडे : मी त्यावेळी खरे तर फोरेंसिक लॅबमध्ये काम करत होते आणि १० ते ६ या स्वरूपाच्या नोकरीमध्ये खूश होते. पण मॉलिक्युलर बायोलॉजीशी संबंधित उत्पादने भारतात तयार करणे हे शैलेंद्रचे स्वप्न होते. त्यामुळे मीसुद्धा माझी नोकरी सोडून मायलॅबमध्येच काम करायला सुरुवात केली. 

शैलेंद्र, तुम्ही मूळचे डोंबिवलीचे. मग मायलॅब पुण्यात सुरू करावी असे का वाटले?
शैलेंद्र कवाडे : पुण्यात व्हायरॉलॉजी संबंधित नावाजलेल्या संस्था आहेत. तसेच मॉलिक्युलर बायोलॉजीचे शिक्षण घेतलेला आमचा स्टाफसुद्धा पुण्यातीलच आहे. म्हणून रिसर्च युनिट तिथे सुरू केले. हसमुख लोणावळ्यात राहतो, लोणावळा एमआयडीसी प्रदूषणविरहित व शांत ठिकाण आहे म्हणून प्रॉडक्शन तिथे सुरू केले. त्यामुळे आता लोणावळा आणि बाणेर-पुणे अशा दोन्ही ठिकाणी काम सुरू आहे.

सुरुवातीला कोणत्या स्वरूपाचे उत्पादन होत होते? मॉलिक्युलर बायोलॉजीशी निगडित टेस्टिंग किट्सबद्दल थोडे सांगा ना.
प्रतिमा कवाडे : थोडक्यात सांगायचे तर आम्ही प्रामुख्याने NAT kits तयार करतो. नॅट म्हणजे न्युक्लिईक ॲसिड टेस्टिंग किंवा RNA टेस्टिंग. कुठल्याही रोगाचा व्हायरस हा विशिष्ट प्रकारच्या RNA किंवा DNA च्या धाग्याने (strand) तयार झालेला असतो. रुग्णाच्या तपासणी नमुन्यातून तो आरएनए वेगळा करून त्याचे परीक्षण करून रुग्ण रोगवाहक आहे किंवा नाही हे तपासता येते. HIV, HBV, HCV या व्हायरसचे स्क्रीनिंग करणाऱ्या किट्स आम्ही तयार करतो. या टेस्ट्स रोग्याला रक्त देण्यापूर्वी करणे आवश्यक असते. तसेच H1N1, स्वाइन फ्लू, TB आणि कँसर डिटेक्शन किट्सही करतो. एखाद्या हॉस्पिटलची किंवा फोरेंसिक लॅबची मागणी असेल, तर आम्ही त्यांच्या गरजेनुसार कस्टमाइझ्ड किट्स करून देतो. व्हेटरनरी आणि शेतकी प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या किट्ससुद्धा मायलॅब तयार करते.
शैलेंद्र कवाडे : मार्च २०१९ मध्ये आम्हाला किट्ससाठी FDA ची मान्यता मिळाली. तो खरे तर आमच्यासाठी महत्त्वाचा क्षण होता. त्यावेळी या क्षेत्रात परदेशी कंपन्यांचे वर्चस्व होते. मायलॅब ही NAT किट्स तयार करणारी एकमेव भारतीय कंपनी आहे. अर्थात २०१४ पासून आमचा रिसर्च सुरू होता. त्याला आलेले हे फळ होते. 

आत्ता सध्या कोरोनामुळे तुमच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. या कोरोना टेस्टिंग किट्स आणि एकूणच या सगळ्या अनुभवाबद्दल काय सांगाल? प्रतिमा तुमच्या ‘लेडीज टीम’बद्दल खास जाणून घ्यायला आवडेल.
शैलेंद्र कवाडे : वर म्हटले तसे, संशोधन सुरूच असते आणि इतकी सगळी विविध किट्स तयार करण्याचा अनुभव गाठीशी असल्यानेच सहा आठवड्यांमध्ये कोरोना टेस्ट्स किट्स तयार करणे शक्य झाले. चीनमध्ये जेव्हा कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हाच या साथीच्या प्रसाराबद्दल आम्हाला अंदाज आला आणि आम्ही त्यावर काम सुरू केले. 
प्रतिमा कवाडे : आमच्या आर अँड डीच्या टीमचे करावे तितके कौतुक कमीच आहे. मिनल, आदिती, रेश्‍मा आमच्याकडे अगदी सुरुवातीपासून आहेत. शेफाली मॅडम सगळ्यात सीनियर, त्यांचा molecular diagnosis या क्षेत्रात ४० वर्षांचा अनुभव आहे. गौरी, हर्षदा, स्मिता, उत्कर्षा या सगळ्या मुली अशी आमची ‘लेडीज R & D टीम’ आहे. आमच्यात रणजीत हा एकटाच मुलगा. हे सगळे पोस्टग्रॅज्युएट आहेत; शिवाय प्रत्येकाचे अजून काही वेगवेगळे सर्टिफिकेशन आहेच. या सगळ्यांबरोबर दिनेशमामा आणि छायामावशी यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. लॅबमधे स्वच्छता राखण्याचे महत्त्वाचे काम हे दोघे करतात. दुसरीकडे फॅक्टरीसाठी एक वेगळी मोठी टीम आहे, ती प्रॉडक्शन सांभाळते.
खरे सांगू का, हा आमचा स्टाफ नाहीये. ही मायलॅब फॅमिली आहे. सगळ्या स्टाफला त्यांच्या घरातल्यांचासुद्धा पूर्ण पाठिंबा आहे. आपण करतो ते काम सध्या किती महत्त्वाचे आहे याची प्रत्येकाला जाणीव आहे. मी आणि प्रज्ञा (हसमुखची पत्नी) ‘कमी तिथे आम्ही’ या तत्त्वाने काम बघतो. सगळ्या मुलींना आमच्याशी बोलताना अजिबात दडपण नसते.
शैलेंद्र कवाडे : तसे म्हणाल तर एकूण सगळी कंपनी हीच एक मोठे कुटुंब आहे. अमुक काम याचे, तमुक त्यानेच करायचे असे कोणी अडून बसत नाही. आत्ता या कोरोना काळात उत्पादन आणि लॉजिस्टिक, ही दोन महत्त्वाची कामे आहेत. मायलॅब ही दोस्तांची कंपनी आहे. मालक-नोकर, वरिष्ठ-कनिष्ठ हा प्रकार नाहीच. ५५ जणांचा स्टाफ आहे, ते सगळेच फॅमिली आणि सगळेच फ्रेंड्स! पण मोकळेपणा असला तरी कामाचे स्वरूपच असे आहे, की भोंगळपणाला अजिबात थारा नाही. मल्टिनॅशनल कंपनीसारखी व्यावसायिक शिस्त, तर भारतीय आपुलकी असे संमिश्र वातावरण आहे आमच्याकडे. 

तुम्हाला किंवा तुमच्या स्टाफला कोरोनाची लागण होईल याची भीती वाटत नाही का? तसेच तुमच्याकडून असलेल्या अपेक्षांचे दडपण येते का?
प्रतिमा कवाडे : कामात असले की काळजी वाटत नाही. उलट रिकाम्या मनात नाही ते विचार येऊ शकतात. दडपण म्हणाल तर हो, आपल्याकडून बारीकशीसुद्धा चूक होऊ नये याचे, परफेक्शनचे दडपण असतेच. कारण हा प्रत्यक्ष रुग्णाच्या जिवाचा प्रश्‍न असतो. पण त्यामुळेच आम्ही जास्तच काटेकोरपणे आमच्या जबाबदाऱ्या पार पाडतो.
शैलेंद्र कवाडे : पूर्वी संपूर्णतः आयात करावी लागणारी ही किट्स योग्य वेळेत आणि कमी किमतीत आपल्या देशात उपलब्ध करून देता आली याचे समाधान तर आहेच. आपल्याला कोविड होईल का अशी काळजी करून काही उपयोग नाही, काळजी घेणे महत्त्वाचे!

मायलॅबमध्ये सध्या दिवसाला किती किट्स तयार होतात?
प्रतिमा कवाडे : आता automated system असल्यामुळे दिवसाला दोन लाख किट्स तयार होतात. तसेच, RNA extraction kit सुद्धा आता मायलॅबमध्ये तयार होते. पूर्वी ती आयात करावे लागे. काही कच्चा माल मात्र अजून तरी आयात करावा लागतो, पण तोही भारतात तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिरम इन्स्टिट्युट आणि बायोकॉनची त्यासाठी मदत घेतली जाते आहे.

प्रतिमा, तू तुझ्या कामाचे नियोजन कसे करतेस? घर आणि लॅब दोन्हीला कसा वेळ देतेस?
प्रतिमा कवाडे : एरवी माझ्या वेळा लवचिक असतात. पण सध्या मात्र खूप धावपळ होते. सकाळी साडेसात-आठला डबा घेऊन बाहेर पडते. (मी घरून डबा न घेता शक्यतो बाहेर पडत नाही). आधी बाणेरच्या R&D सेंटरला जाते. तिथून दुपारी लोणावळा, जिथे आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तिथे जाते. घरी येईपर्यंत रात्र झालेली असते. मोठा मुलगा सोहम, तो बारावी सायन्सला आहे, तो मदतीला माझ्याबरोबर येत असे दोन्हीकडे. आता त्याचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. धाकटा सौमित्र तिसरीत आहे. त्याच्याकडे आणि घराकडे सासुबाई बघतात.

मायलॅबची पुढची उद्दिष्टे काय आहेत?
शैलेंद्र कवाडे : पीसीआर मशिन ही हाताळायला, त्यावर काम करायला थोडी कठीण आहेत. त्यामध्ये सुटसुटीतपणा आणण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. व्हायरस आपले स्वरूप बदलत असतो. अँटिबायोटिक्स आणि व्हायरस यांच्यामध्ये स्पर्धा सुरू असते. सध्या जे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटिबायोटिक्स (विषाणू समूहासाठी वापरली जाणारी प्रतिजैवके) वापरले जातात त्याऐवजी टार्गेटेड अँटिबायोटिक्स (विषाणूच्या संरचनेनुरूप एकलक्षी प्रतिजैवके) वापरणे इष्ट ठरते. त्यासाठी लागणाऱ्या टेस्ट किट्स व त्या चालवू शकणारी मशिन्स आम्ही तयार केली आहेत. ती लवकरच भारतीय प्रयोगशाळांसाठी उपलब्ध होतील. अत्यंत अचूक टेस्ट्स कुठेही करता येतील असा सुटसुटीत सेट-अप तयार करणे हे एक उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. अशा पोर्टेबल प्रयोगशाळांचा उपयोग विमानतळ, सैनिक छावणी अशा ठिकाणी अचूक स्क्रीनिंग करण्यासाठी होईल. Easy to use yet cost effective molecular diagnostic machine तयार करणे हे मायलॅबचे पुढचे पाऊल असेल.

संबंधित बातम्या