शब्द आणि चित्रांचा संगम

    इरावती बारसोडे
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

गप्पा
अमृता पाटील या भारतातील पहिल्या महिला ग्राफिक नॉव्हेलिस्ट. ग्राफिक नॉव्हेल म्हणजे चित्रमय कादंबरी. आत्तापर्यंत त्यांनी चार कादंबऱ्या लिहिल्या असून त्या ‘नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित आहेत. पुराणाचे अभ्यासक आणि लेखक देवदत्त पटनाईक यांच्याबरोबर लिहिलेली त्यांची नवीन कादंबरी ‘अरण्यका - बुक ऑफ फॉरेस्ट’ नुकतीच प्रसिद्ध झाली. त्यानिमित्त या पुस्तकाविषयी आणि एकूणच त्यांच्या प्रवासाविषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...

तुमचे बालपण कुठे गेले? चित्रकलेकडे कशा वळलात?
अमृता पाटील : माझे वडील नौदलामध्ये असल्यामुळे माझे बालपण केरळ आणि मुख्य म्हणजे गोव्यात गेले. शालेय शिक्षणानंतर अॅडव्हर्टायझिंग शिकण्यासाठी मी आर्ट स्कूलला गेले. लहान असताना आम्ही राहत असलेल्या छोट्या गावात फारसे काही करायला नव्हते. त्यामुळे स्वतःची करमणूक करण्यासाठी जर्नल, गोष्टी लिहायचे. माझी आई गोष्टी सांगताना चित्रे, गोष्टीतली पात्रे काढत असे. आत्ता असे जाणवते, की त्याचा प्रभाव माझ्यावर पडला असावा. 

ग्राफिक नॉव्हेल करण्याचा विचार कसा सुचला?
अमृता पाटील : ग्राफिक नॉव्हेल करण्याचा प्लॅन अजिबात नव्हता. मी २४ वर्षांची असताना गोव्यावर आधारित लिहिलेली कादंबरी घेऊन प्रकाशकाकडे गेले. प्रकाशक म्हणाली, ‘अजून काही आहे का तुझ्याकडे?’ मी मुंबईत अॅडव्हर्टायझिंग करत असताना स्वतःसाठी व्हिज्युअल जर्नल ठेवायचे. त्याच्यात माझे कॉमिक बुकच्या स्वरूपात मांडलेले फँटसी लाइफ होते. दिवसभरात जे घडायचे त्याचे ‘कूल’ व्हर्जन त्यात असायचे. म्हणजे ज्या गोष्टी मी लोकांना म्हणू शकले नाही, त्या त्या वेळी जे सुचले नाही अशा गोष्टी त्यात होत्या आणि त्या कॅरॅक्टरचे नाव कारी होते. ते मी एडिटरला दाखवले. २००६ मधली ही गोष्ट आहे. तेव्हा भारतात साहित्यामध्ये अशा प्रकारची एलजीबीटीक्यू तरुण पात्रे नव्हती. अजूनही नाहीत. इडिटरला वाटले, अशा गोष्टीसाठी हीच योग्य वेळ आहे आणि मग मी ‘कारी’ पुस्तक केले. 

तुमच्या पुस्तकांमधील चित्रांविषयी सांगा.
अमृता पाटील : ‘कारी’ बऱ्यापैकी इलस्ट्रेशन आणि ब्लॅक अँड व्हाइट पुस्तक आहे. माझी लिहिण्याची पद्धत तशीच राहिली, पण चित्रे विकसित होत गेली. त्याचे साधे कारण असे, की महाभारतावरील ‘आदी पर्व’ आणि ‘सौप्तिक’ ही पुस्तके करायला सुरुवात केली, तेव्हा असे लक्षात आले की या जगासाठी ब्लॅक अँड व्हाइट पुरेसे नाही. आत्तापर्यंत मी कधी रंगीत चित्रे काढली नव्हती. या पुस्तकांसाठी मी पेंटिंग शिकायला सुरुवात केली. त्यामुळे या पुस्तकांमध्ये भरपूर प्रयोग दिसतील. या पुस्तकांच्यावेळी मी रंगांच्या प्रेमात पडले. ही दोन पुस्तके पूर्ण करायला एकूण ८ वर्षे लागली. तीन वर्षांपूर्वी ‘अरण्यका’ला सुरुवात केली. हे पुस्तक प्रकृतीवर आधारित आहे. नैसर्गिक थीमबरोबर अॅक्रॅलिकसारखा प्लॅस्टिकी रंग चुकीचा वाटला. त्यामुळे मी वॉटर कलरकडे वळले, जे मी याआधी कधी वापरले नव्हते. प्रत्येक पुस्तकामध्ये गोष्ट आहे. पण त्याचबरोबर हा स्वतःचाही शोध आहे. माझी कला, मानसिकता यांचा विकास आणि मला आवडणाऱ्या गोष्टी शोधण्याचा प्रवास यामध्ये आहे. 

‘कारी’ या पहिल्या पुस्तकाविषयी काय सांगाल?
अमृता पाटील : ‘कारी’ एकदम शहरी, मुंबईत घडणारी गोष्ट आहे. यामध्ये मुख्य नायिका एक २१ वर्षांची मुलगी आहे, जिची स्वतःच्या शरीराबद्दल, लैंगिकतेबद्दल ठाम मते अजून तयार झालेली नाहीत. त्यामुळे हे विषय तिला छळत नाहीत. तिच्यामध्ये तरलता आहे. एखादा किडा खोलीच्या कोपऱ्यात बघून खोलीकडे कसा बघतो, तशी ती जगाचे निरीक्षण करते आहे. ही गोष्ट आहे मैत्रीची, प्रेमाची, मृत्यूची आणि त्यानंतरच्या दुःखाची. ही कादंबरी अजूनही लोकांना भावते. ‘कारी’ची चौथी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. 

महाभारतासारख्या विषयाकडे का वळलात?
अमृता पाटील : ‘कारी’ची गोष्ट खूप वैयक्तिक आहे, इतकी की मी स्वतःचीच त्वचा काढल्यासारखे मला वाटले. मग मी ठरवले, की परत स्वतःला एवढे एक्सपोज करायचे नाही. म्हणून खासगी गोष्टीकडून पुराणाकडे वळले. ‘आदी पर्व’ आणि ‘सौप्तिक’ ही दोन पुस्तके केली. प्रत्येक गोष्टीमध्ये सूत्रधार आहे. पहिल्या पुस्तकात गंगा आणि दुसऱ्यात अश्वथामा सूत्रधार आहे. ‘अरण्यका’मध्ये कात्ययानी सूत्रधार आहे. माझ्या गोष्टीतली कात्ययानी मोठी, खादाड आहे. तिला लोकांना खायला घालायला आवडते. तिची भूक इतकी जास्त आहे, की त्यामुळे तिला गावातून बाहेर काढतात. तीसुद्धा बाहेरची आहे. कारीसुद्धा विचित्र आहे. सगळ्या पुस्तकांमधले सूत्रधार वेगळे आहेत. पुस्तकांची कथा वेगळी असली, तरी ती कुठेतरी जोडलेली आहे.

‘अरण्यका’विषयी आणि त्यातील पात्रांविषयी काय सांगाल?
अमृता पाटील : लोकांना वाटते ‘अरण्यका’ हे बृहत अरण्यक उपनिषदाबद्दल आहे, पण तसे नाही. आम्ही फक्त एक छोटा संदर्भ वापरला आहे. याज्ञवल्क्य नावाचे ऋषी होते. त्यांना दोन बायका होत्या, एक कात्ययानी, एक मैत्रेयी. मैत्रेयी विदुषी, हुशार होती. तर कात्ययानीविषयी बोलताना इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ती वापरली जाते, ‘शी हॅड इंटेलिजन्स कॉमन टू विमेन.’ म्हणजे जी फक्त घर चालवते, वर्गामध्ये ठसा उमटवत नाही, तिचे महत्त्व कमी आहे. म्हणून याला आव्हान देण्याचे आम्ही ठरवले. शहाणपण फक्त वर्गामध्येच मिळू शकते का की इतर ठिकाणीही मिळू शकते? हे पुस्तक देवदत्त पटनाईक यांच्या सहकार्याने केलेले आहे. इथे तीन स्त्रिया प्रमुख पात्रे आहेत. तिघींना ऋषिकाच म्हणावे लागेल. तिघीही खूप वेगळ्या आहेत. तिघींमध्ये एकच समान गोष्ट आहे, ती म्हणजे त्या वास्तवाची भावना शोधत आहेत. पौराणिक कथा वाचताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे लिंग हे नेहमी रूपक असते. ही तीन भिन्न स्वरूपाच्या बायकांची कथा आहे. पण हे तेवढ्यावरच मर्यादित नाही. रूपकाच्या खोलात जाऊन बघायला हवे. 

पुस्तकांमधल्या नायिका नेहमीपेक्षा वेगळ्या आहेत.
अमृता पाटील : माझ्या कुठल्याच पुस्तकातल्या नायिका टिपिकल नाहीत. मला साध्या पात्रांमध्ये रस नाही, गुंतागुंत आवडते. उगाच मॉडेलसारख्या दिसणाऱ्या नायिका आवडत नाहीत. मी सौंदर्याच्या व्याख्या विस्तारण्याचा प्रयत्न करते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी माझ्या कामात बदल करण्याचा प्रयत्न करते. 

‘अरण्यका’साठी किती संशोधन केले?
अमृता पाटील : अरण्यक पूर्ण व्हायला तीन वर्षे लागली. चित्रांचे काम एक वर्षाचे होते, उरलेला वेळ फक्त संशोधन केले. संशोधन म्हणजे फक्त वेदिक पुस्तके नाहीत, तर शास्त्रीय अभ्यासापासून सुफी कवितांपर्यंत सगळ्याचा अभ्यास केला. 

देवदत्त पटनाईक यांच्याबरोबर कामाचा अनुभव कसा होता?
अमृता पाटील : देवदत्त माझे मित्र आहेत. गेल्या १० वर्षांपासून आमची मैत्री आहे. आम्ही वाटेल त्या विषयांवर बोललेलो आहे. देवदत्त यांचे व्यक्तिमत्त्व, काम करायची पद्धत माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. आम्ही भेटलो तेव्हा त्यांच्याकडे वेदिक संकल्पनांची दोन पानी यादी होती आणि ते मला म्हणाले याचे पुस्तक कर. त्यांना व्हिज्युअल एनसायक्लोपेडियासारखे वेदिक संकल्पनांचे पुस्तक करायचे होते. ते जास्त प्रभावी ठरावे यासाठी हँडबुकऐवजी गोष्ट सांगू, असे मी सुचवले. 
पुस्तकाचा सापळा रचायला देवदत्तनेच मदत केली आहे. त्या सापळ्यावर मी काम केले. आम्ही काम सुरू केले तेव्हा मला खूप भीती होती, कारण आमची मैत्री आहे. कधीकधी प्रोजेक्टमुळे मैत्री बिघडू शकते. कामाचा अनुभव आनंददायी होता, कारण कोणीतरी मदत करत होते. माझे दोष दाखवले, टीका केली. मलाही तो हक्क होता. दुसऱ्याला समजू शकेल अशा भाषेत कसे सांगायचे, हे मला शिकावे लागले. पुस्तकानंतर आमचे संबंध आणखी दृढ झाले.

तुम्हाला नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे. 
अमृता पाटील : खरे तर हा पुरस्कार अनपेक्षित होता. तुमच्या कामाची दखल घेतली जाते, ही गोष्ट खरच छान आहे. लोक ग्राफिक नॉव्हेल्स वाचतात हे चांगले आहे. माझे माध्यम साहित्यामध्ये तितकेसे गांभीर्याने घेतले जात नाही. लोकांना असे वाटते की चित्रे म्हणजे लहान मुलांसाठी असणार. माझ्यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा होता, कारण पहिल्यांदाच या माध्यमाची गांभीर्याने दखल घेतली गेली. पुरस्कार देताना ते म्हणाले, ‘हा पुरस्कार अशा कामासाठी दिला जात आहे, ज्यामुळे कला आणि साहित्य यांमधील सीमा नाहीशा होतात,’ मला ते खूप आवडले. कोणाला तरी हे प्रयत्न जाणवले, की ही लहान मुलांची पुस्तके नाहीत. 

पुढचे उपक्रम काय असतील? काही विषय डोक्यात आहेत का?
अमृता पाटील : अशी पुस्तके करताना शेवटचे वर्ष हे फक्त गाढव काम असते, फक्त पानांची निर्मिती असते. त्यावेळेला दुसरे संशोधन सुरूच असते. आत्ताही काही गोष्टी सुरू आहेत, त्यांचे स्वरूप अजून स्पष्ट नाही. मला असे वाटते, की मला या पौराणिक कथांच्या झोनमधून थोडी विश्रांती हवी आहे. त्यामुळे सध्या मी भारताचा पर्शियाशी असलेल्या संबंधांचा अभ्यास करते आहे. कला आणि पुराणांचा वापर करून ही संस्कृती अभ्यासायची आहे. 

संबंधित बातम्या