‘उत्तम लेखकांची उणीव भासतेय...’ 

पूजा सामंत
मंगळवार, 27 एप्रिल 2021

गप्पा 

‘मेरे पास माँ है!’, ‘मैं आज भी फेंके हुए पैसे नही उठाता!’ ‘बसंती, इन कुत्तो के सामने मत नाचना’ असे दमदार संवाद ज्यांच्या लेखणीतून उतरले ते सलीम खान... त्यांनी तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ हिंदी सिनेमा आपल्या लेखणीने गाजवला. साध्या-रोजच्या बोलाचालीच्या भाषेतून त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयाला हात घातला. त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा...

सलीमजी, तुम्ही संवाद लिहिलेल्या ‘शोले’, ‘जंजीर’, ‘त्रिशूल’, ‘दिवार’ या चित्रपटांची मोहिनी आजही आहे. तुम्ही अजूनही लेखन का करीत नाही?
सलीम खान : मुले लहान असताना फिल्म स्क्रिप्ट्स लिहून चरितार्थ चालवणे हे माझे कुटुंब प्रमुख म्हणून कर्तव्य होते. वक्त-किस्मत का साथ था, लिखने का हुनर था। मला लेखक म्हणून काम मिळत गेले. पुढे मुले मोठी झाली, आपापल्या पायांवर उभी राहिली आणि सलमानने घरातला मोठा मुलगा म्हणून संपूर्ण घराची जबाबदारी घेतली आणि मी लेखणीला लगाम दिला! 

घरातील प्रत्येकाला अगदी थेट सलमानलाही माझी मदत, माझा सल्ला हवा असतो. अनेक घरगुती कामांसह सगळ्याच कामांचा व्याप मोठा आहे. लिखाणासाठी लागणारी मानसिक शांती आताशा मिळत नाही. पण, जेव्हा सलमानला त्याच्या चित्रपटातले सीन आवडत नाहीत आणि त्याला ते नव्याने लिहून हवे असतात, तेव्हा मग तो मला व्हिडिओ कॉल करतो, आपली कैफियत मांडतो. मग माझ्या शैलीचा संवाद मी लेकासाठी असा अधून-मधून लिहून देतो! अर्थात याचे श्रेय मला मिळत नाही, मला ते नकोही असते. जेव्हा कधी सलमान, अरबाज किंवा सोहेल, जावई आयुषला (शर्मा) तशी आवश्यकता पडते, तेव्हा मी त्यांना माझ्या शैलीतून स्क्रिप्ट लिहून देतो. त्यात कधी बदल होतात, पण आपल्या मुलांसाठी संवाद लिहिणे हा आनंद शब्दात मांडता येणे कठीणच! ते फक्त पित्याचे हृदय जाणू शकेल.

सलमानसारख्या सुपरस्टार्सचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतात. या अपयशाची कारणमीमांसा तुमच्या मते काय असावी?
सलीम खान : मेरी राय में, इट्स पॉव्हर्टी ऑफ टॅलेन्ट इन टुडेज टाइम! लोगों में पढने की आदत नहीं रही। जर वाचन झाले नाही तर नवे विचार कसे सुचणार? काय लिहिणार? त्यामुळे नव्या पिढीत उत्तम लिहिणारे लेखक राहिले नाहीत, ही माझी व्यक्तिगत खंत आहे. सलमानचा सिनेमा असो अथवा अन्य स्टारचा, पण त्या सिनेमाचे फ्लॉप होणे हे त्या लेखकाचे, पटकथाकाराचे अपयश मी मानतो. आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? कथा-पटकथा ही सिनेमाची जान, त्याचा आत्मा असतो. आत्मा बेजान होऊन चालणार नाही. पण अपयश हे लेखकाचे आणि दिग्दर्शकाचे असते. कलाकारांचा थेट दोष त्यात कमी!

अमिताभ बच्चन यांच्या अँग्री यंग मॅन या इमेजमध्ये तुमचा लेखक म्हणून अधिक वाटा आहे... 
सलीम खान :  अमिताभ बच्चन असो अथवा संजीव कुमार किंवा आजचा सलमान खान; उत्तम पटकथेशिवाय त्यांचे अस्तित्व शून्य आहे. अमिताभला त्याच्या आईवडिलांकडून मोठा साहित्यिक वारसा लाभला होताच, पण ‘जंजीर’नंतर त्याचे नशीब रातोरात बदलले हे त्याने अनेकदा मान्य केले आहे. ‘जंजीर’साठी अन्य नायकांचा विचार चालू होता, पण इन्स्पेक्टर विजयच्या ‘अँग्री यंग मॅन’ या व्यक्तिरेखेला अमिताभच उत्तम न्याय देईल हे प्रकाश मेहरा यांना आम्ही पटवून दिले आणि ‘जंजीर’नंतर अमिताभ बच्चनचे सुवर्ण युग सुरू झाले.

‘अँग्री यंग मॅन’ आज रेलेव्हंट आहे का? प्रेक्षक त्याला स्वीकारतील का?
सलीम खान : जीवनाच्या लढाईत दोन हात करताना नायकाला प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करावा लागतो. शड्डू ठोकून उभे राहणे नायकाला अपरिहार्य असते. आत्ताची सामाजिक परिस्थिती थोडी बदलली आहे. आईच्या भूमिका बदलल्या आहेत. काळानुरूप बदल हा अपरिहार्य आहे. जर नायकाने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही तर कोण उठवणार? रावणाविरुद्ध रामाचे युद्ध चालत राहील, फक्त व्यक्तिरेखा बदलतील. म्हणूनच ‘अँग्री यंग मॅन’ विजय कायम रेलेव्हंट असेल.

बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल अशा सिनेमाची रेसिपी तुमच्या मते काय असावी?
सलीम खान : गरज आहे ती उत्तम कथा-पटकथांची! मला आठवते, एका सिनेमाच्या कथा-पटकथेवर काम करण्यासाठी मला आणि जावेदला (अख्तर) किमान तीन-चार महिने तरी लागत. ‘शोले’ आम्ही तीन महिन्यांत पूर्ण केला, तर ‘दिवार’साठी चार महिने लागले. सिनेदिग्दर्शक राज खोसला यांनी त्यांचा ‘दोस्ताना’ चित्रपट सुरू केला तेव्हा चार महिन्यांत ते स्क्रिप्ट त्यांच्या हाती सुपूर्द केले. आमच्या  स्क्रिप्टची किमान ८०-९० हस्तलिखित पाने असत. त्या स्क्रिप्टच्या शेवटच्या पानावर मी ‘The End’ असे लिहिले होते. राज खोसला आमचे बाऊंड स्क्रिप्ट पाहून थक्क झाले. ते म्हणाले, मेरे करिअर को २५ साल हो चुके है, पर आज तकी मैने इतनी कम्प्लिट स्क्रिप्ट नहीं देखी। 

सलीमजी, गेल्या ५० वर्षांत फिल्म इंडस्ट्री कितपत बदलली आहे?
सलीम खान : परिवर्तन प्रकृती का नियम है। थांबला तो संपला हे सत्य आहे. माझे एवढेच म्हणणे आहे, की बदल हे चांगल्यासाठी व्हावेत, पण ते माझ्या हातात नाही. उत्तम कथांवर, चुरचुरीत संवाद आणि सशक्त व्यक्तिरेखा हव्यात. आज नेमकी कमतरता तीच जाणवतेय. तांत्रिक बदल प्रचंड झालेत. भारतीय सिनेमा हा हॉलिवूडच्या रांगेत बसणारा झालाय. मग तो ‘बाहुबली’ असो अथवा रोहित शेट्टीचा सिनेमा असो. पण आत्मा हरवला आहे सिनेमाचा!

सलमान बोहल्यावर कधी चढणार आहे?
सलीम खान : हा प्रश्न मला तुम्ही विचारू नका अशी विनंती मी तुम्हाला करेन, क्योंकी इस सवाल का जवाब खुदा भी नहीं जानता। तो आज न उद्या लग्न करेलही.. लग्न करणे सोपे आहे, लेकिन शादी का रिश्ता निभाना बडा मुश्कील है। सगळी लग्ने टिकतातच असे नाही. इंदूरला जवळच राहणाऱ्या सुशीलाशी माझे प्रेम जुळले. तिच्या वडिलांचा आमच्या लग्नाला नकार होता. मी माझ्या सासऱ्यांना समजावले, माझ्यात आणि तुमच्या लेकीत कधीही हिंदू मुस्लिम या कारणाने वाद होणार नाहीत.. ती तिचा धर्म पाळेल आणि मी माझा! माझे हे वचन मी कायम निभावले म्हणून माझ्या कुटुंबात गणपती, जन्माष्टमी, ईद, दिवाळी त्याच उत्साहात आनंदात गेली ५५ वर्षे साजरे होताहेत.

संबंधित बातम्या