प्रीमियर

संतोष भिंगार्डे
मंगळवार, 5 जानेवारी 2021

प्रीमियर

लग्नाचे वारे...
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत लग्नाचा माहौल सुरू झाला आहे असेच म्हणावे लागेल. गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रित सिंग यांचे नुकतेच लग्न झाले. त्याचबरोबर गायक आदित्य नारायण आणि श्वेताने लग्नगाठ बांधली. क्रिकेटर यजुवेंद्र चहलने कोरिओग्राफर धनश्री वर्माबरोबर लग्न केले. आता बिग बॉस विजेती गौहर खान लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. या एकापाठोपाठ एक गोड बातम्या कानावर येत असतानाच आता प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे हिचा मुलगा प्रियांक शर्माचा साखरपुडा झाला आहे. निर्माता करीम मोरानीची मुलगी शजा मोरानीबरोबर त्याचा साखरपुडा झाला असून लवकरच ते विवाहबद्ध होतील. 
या प्रसंगी दोन्ही घरची नातेवाईक मंडळी उपस्थित होती. प्रियांकने ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलेले आहे. प्रियांक आणि शजा यांच्या साखपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रियांक अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मावस भाऊ आहे.

 

अरविंद स्वामीचे कमबॅक

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नमच्या ‘रोजा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण करणाऱ्या अरविंद स्वामीला त्यानंतर हिंदी चित्रपटांमध्ये म्हणावी तशी फारशी काही करामत करता आली नाही. त्यामुळे पठ्ठ्याने आपला मोर्चा पुन्हा साउथकडे वळविला. साउथचा हा सुपरस्टार तेथे तामीळ भाषेतील अनेकानेक चित्रपट करू लागला. मात्र आता खूप वर्षांनी तो हिंदी चित्रपटसृष्टीत कमबॅक करीत आहे. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर ‘थलैवी’ हा चित्रपट होत आहे. त्यामध्ये अभिनेत्री कंगना राणावत जयललिता यांची व्यक्तिरेखा साकारत आहे हे सर्वश्रुत आहे. आता याच चित्रपटात अभिनेता अरविंद स्वामी दिग्गज अभिनेते आणि राजकारणी एम. जी. रामचंद्रन यांची भूमिका साकारत आहे. एम.जी.आरच्या पुण्यतिथीनिमित्त या चित्रपटातील त्याचा एम. जी. रामचंद्रन या व्यक्तिरेखेचा लुक या चित्रपटाच्या टीमने शेअर केला आहे. अरविंदचा हा लुक पाहून त्या फोटोंवर कॉमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्याचा हा नवा लुक सगळ्यांना भावला आहे. ‘थलैवी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय यांनी केले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी तामीळ, तेलगू आणि हिंदी या भाषांत प्रदर्शित होणार आहे.
 

संबंधित बातम्या