देखणी मास्टर शेफ 

पूजा सामंत 
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

शेफ्स डायरी
 

कोणे एके काळी ज्यांना ‘खानसामे’ म्हटले जाई, त्यांना अलीकडच्या म्हणजे गेल्या किमान वीस वर्षांपासून तरी ‘शेफ’ असे म्हटले जाते आहे. या क्षेत्राला विलक्षण ग्लॅमर, नावलौकिक आणि त्यामुळे येणारा पैसा-मानमरातब प्राप्त झाले आहे. आपल्या देशापुरता विचार करायचा झाल्यास घरातील स्वयंपाकघरात जरी स्त्रीची मक्तेदारी असली तरी बाहेर हे क्षेत्र पुरुषप्रधान मानले जाते. या क्षेत्रांत अनेक दिग्गज आहेत, ज्यांनी स्वकर्तृत्वावर आपले स्थान सिद्ध केले आहे. त्यात काही तुरळक महिला शेफ दिसू लागल्या आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर शिप्रा खन्नासारखी शिमल्याहून आलेली तरुणी ‘मास्टर शेफ’ झाली. आपल्या देशातील मोजक्‍या महिला शेफमध्ये तरुण, तडफदार आणि देखण्या शिप्रा खन्नाचे नाव नक्कीच आहे. 

शिप्रा, तुझे बालपण कसे गेले? 
शिप्रा खन्ना : माझे बालपण खूपच रम्य होते. माझ्या बालपणाचा विचार मी माझ्या आजीआजोबांखेरीज करूच शकत नाही. त्यांच्याचमुळे माझे बालपण समृद्ध, लाडाकोडाचे, धमाल मस्तीचे गेले. आईवडील अर्थात होतेच, पण आजीआजोबांइतके माझे लाड कोण करणार? मी शिमल्यात मोठी झाले. जवळजवळ वर्षभर शिमल्याला थंडी असते. त्यातील ४-५ महिने हिमवर्षाव होतो. त्यामुळे इथे अन्न ताजे आणि गरम असणे अतिशय आवश्‍यक आहे. खाण्या-पिण्यातील माझे सगळे लाड आजीआजोबांनी पुरवले. आजीने दररोज मला ‘आज क्‍या खाना है तेनुं?’ असे प्रेमाने विचारावे आणि आजोबांनी तिने हौसेने, ममतेने केलेले अन्न मला भरवावे.. हा निखळ आनंद घेत मी वाढले. शिमला येथील लॉरेटो कॉन्व्हेंटमध्ये माझे दहावीपर्यंत शिक्षण झाले. बालपणी मी अतिशय अवखळ होते. 
माझी आई आणि आजी दोघीही सुगरणी. त्यांना विशेषतः पंजाबी अन्न शिजवताना मी दररोज पाहत होते. बर्फवृष्टी होणे हा आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता. मग घराबाहेर पडणे सोपे नव्हते. घरातील जीवन आणि स्वयंपाकघर हे असे आपोआप जाणून, समजून आणि पुढे उमजत गेले... 

असे असले तरी आपल्याकडे हे कौशल्य आहे, याची जाणीव तुला कधी झाली? 
शिप्रा खन्ना : जगात कुठेही गेलात तरी पंजाबी समाज खवय्या मानला जातो. वाळवंटात जरी पंजाबी गेले, तरी पाण्याआधी ते रुचकर अन्न कुठे आणि कसे मिळेल याचा शोध घेतील असे माझे ठाम मत आहे. आम्ही शिमल्याचे खन्ना म्हणजे पंजाबी आणि शिवाय जन्मजात खवय्ये! आमच्याकडे दोन्ही वेळा अतिशय रुचकर स्वयंपाक आजी-आई करत असत. या दोघींना किचनमध्ये बघून माझाही किचनमधला वावर वाढत गेला. ‘मैं भी कुछ बनाती हूँ...’ असा माझा केवळ बालहट्ट न मानता त्या दोघींच्या देखरेखीखाली मी किचनमध्ये हळूहळू ‘तयार’ होऊ लागले. ‘जगाच्या पाठीवर कुठेही गेलीस तरी तुझी रोटी - तंदूर तुला उत्कृष्टपणे करता आली पाहिजे,’ असे या दोघींचे मत होते. ७-८ वर्षांची असताना मी चहा-कॉफी करू लागले. नवव्या वर्षी तर, सब्जी, दाल (माखनीदाल), अर्हर की  दाल, पनीर हंडी, पनीर प्याज असे त्यांचे बघून सहज करू लागले. 
खूपदा असे होते, स्वयंपाकघरात लहान मुले आली, की त्यांना किचनबाहेर काढले जाते. माझ्या घरात उलट झाले. किचनमध्ये माझे स्वागत झाले. मी केलेले ‘एक्‍सपेरिमेंटल’ खाद्यपदार्थ कौतुक करत आवडीने खाल्ले जाऊ लागले. माझा हुरूप वाढत गेला. 
वयाच्या बाराव्या वर्षी मी ओव्हनमध्ये छानपैकी बेक होणाऱ्या वस्तू शिकले. साहित्य आणून देणे हे काम आईचे होते. मी पदार्थांचा नवा शोध लावत गेले, मला प्रोत्साहन मिळाले. कारण आजीआजोबांचा प्रेमाचा शब्द मला नवी प्रेरणा - ऊर्जा देत गेले. किचनमध्ये किती वस्तू सांडल्या आहेस, किती नासाडी करतेस असे कुणी कधी म्हणाले नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे माझा जोश, उत्साह, हुरूप कायम राहिला. 

शिमल्याहून थेट तू या जगात पोचलीस. हा प्रवास कसा घडला? 
शिप्रा खन्ना : शिमला हे मुंबई-दिल्लीच्या तुलनेत अतिशय लहान. पण माझी पाककला खरे म्हणजे इथेच रुजली, वाढली. मी पाककलेत रस घेतेय ही माझ्यासाठी तेव्हा फक्त एक्‍साइटमेंट होती. पुढे कधीतरी भविष्यात ‘कुकिंग’ हे माझे करिअर होईल, असे मात्र मला कधी वाटले नाही. 
‘मास्टर शेफ’ या रिॲलिटी शोमध्ये भाग घेणे, त्यात मी अगदी बाहेरच गेले असते, पण पुन्हा जिद्द न सोडता काम करत राहिले आणि शेवटी जिंकले. 
शिमला ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, सिंगापूर, युरोप आणि संपूर्ण आशिया अशी जगभर भ्रमंती केली आणि त्या त्या प्रांतांच्या शेफ्सना भेटून अनेक खाद्यपदार्थ शिकले. जगातील सप्ततारांकित - पंचतारांकित हॉटेल्स ते लक्‍झरी रिसॉर्टसपर्यंत अनेक प्रसिद्ध शेफ आणि त्या त्या देशांतील - प्रांतांतील खाद्यसंस्कृती मला जाणून घेता आली, समजून घेता आली. त्यामुळे माझ्यातील पाककौशल्य अधिक समृद्ध करता आले, ही ‘मास्टर शेफ’ या शोने मला दिलेली मोठी भेट आहे. या प्रवासात मी माणूस म्हणूनही घडत गेले. आपण भारतीय वापरतो तेच अन्नघटक, पण तरीही चवीत पडणारा फरक मला अचंबित करत गेला. अजूनही अर्ध्यापेक्षा जास्त देशांची खाद्यसंस्कृती मला जाणून घ्यायची आहे. खाद्यसंस्कृतीच्या मिलाफाने जनजीवन एक होते, माणसे एक होतात, दोन भिन्न खाद्यसंस्कृती दोन देशांना, कधी दोन राज्यांना आणि दोन टोकाच्या व्यक्तींना जोडणाऱ्या सेतूचे काम करतात. म्हणूनच असे वाटते, शेफ म्हणून माझा प्रवास नुकताच सुरू झाला आहे... 

महिला शेफ म्हणून तुला या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी कशी मिळाली? काही अडथळे आले? 
शिप्रा खन्ना : पुरुषांच्या तुलनेत महिला कुठेही कमी नाहीत, हे माझे वैयक्तिक मत आहे. क्रिएटिव्हिटीमध्ये त्या कांकणभर अधिकच सरस असतील. पण पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना फार पुढे जाण्याची संधी पूर्वी मिळाली नाही. महिलांना आपल्या देशांत पूर्वी घराबाहेर पडणे, शिक्षण घेणे वर्ज्य होते. मग त्यांचा विकास कसा व्हावा? थॅंक गॉड, काळानुरूप सगळे बदलत गेले. महिलांनी स्वतःचा विकास केला. पण पोलिस, लष्कर, नेव्ही, शेफ यांसारखी क्षेत्रे पुरुषप्रधानच राहिली. मात्र, ही परिस्थिती वेगाने बदलते आहे. मोठ्या हॉटेल्समध्ये शेफच्या ड्यूटी वेळीअवेळी असतात, म्हणून महिलांना या क्षेत्रात आरंभी संधी कमी मिळाल्या. आता मात्र महिला शेफ यांची संख्या वाढते आहे. 

पाकशास्त्र ही कला मानली जाते. तुझे मत काय आहे? तुझ्याकडून काही चुका झाल्यात का?
शिप्रा खन्ना : कुकिंग करते समय सिर्फ अपने हाथ ही नहीं, दिल और दिमाग भी हाथों के साथ होने चाहिए। पदार्थ मनापासून चांगला व्हावा असे वाटत असेल तर तो मनापासून करणे गरजेचे आहे. दिलेल्या प्रमाणात साहित्य वापरून पदार्थ करणे कठीण नाही. पण त्या पदार्थांत आपले मन लावणे आणि मग तो करणे यातली गंमत काही और आहे. 
प्रोफेशनल किचनमध्ये माझ्याकडूनदेखील आरंभी काही चुका झाल्या. पण मी त्या सावरून घेतल्या. कधी मीठ जास्त झाले, तर त्यात बटाटा कुस्करून घालणे, कधी टोमॅटो सॉस घालणे या घरोघरी माहिती असणाऱ्या कल्पना आम्हीदेखील वापरतो. चूक झाल्यास हातपाय गाळून न बसता त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. प्रोफेशनल किचनमध्ये अन्न वेळेवर सर्व्ह करणे आवश्‍यक आहे, त्यामुळे त्याक्षणी ती वेळ आणीबाणीची समजून काम करणे हे महत्त्वाचे. हेच आव्हान आहे. जीवनात आव्हाने नसली तर जीवन सपक, नीरस होऊन जाईल. 

अडीअडचणींच्या वेळी तू कोणाचा सल्ला घेतेस? 
शिप्रा खन्ना : मुळात चुका टाळणे हे आव्हान आहे, त्याशिवाय स्वतःत सुधारणा कशी होणार? जीवनात चुका होऊ न देणे हा माझा प्रयत्न असतो, पण तरीही चुका झाल्या तर परमेश्‍वर हाच माझा पाठीराखा आहे. प्रामाणिकपणे जीवन जगणाऱ्यांमागे त्याचा हात पाठीवर असतो हा माझा विश्‍वास आणि अनुभवही आहे. अनेक सीनियर पुरुष शेफ आमच्या व्यवसायात उभे असतानादेखील मी अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांची मानकरी ठरले यातच माझ्या करिअरच्या आनंदाचे संचित आहे.    

संबंधित बातम्या