चित्रातले जग कसे असते?
चित्र गमती
पुराणकथांची रेखाटनं
माऊली सांज, अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वाऱ्यावरी वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी..
सांज ये गोकुळी, सावळी सावळी
सावळ्याची जणू साऊली...
- सुधीर मोघे
गुराखी आणि गाय एकमेकांशिवाय अधुरे. या चित्रात गाईची शेपटी दाखवली नाही आणि कृष्णदेखील अर्धाच काढला आहे. पण शेपटीच्याच आकारातून कृष्णाचं उपरणं गायीला जोडलं आहे, यातून त्यांचं नातं पूर्ण झालं आहे.
मनजित बावा यांचं बालपण पंजाबमध्ये गेलं. लहान असताना शाळेतून परत येताना ते पायी किंवा सायकलवर दूर फिरायला जात असत. कदाचित या भटकंतीमुळं सूर्यफुलांचा सोनेरी पिवळा, भात शेतीचा गर्द हिरवा, सूर्यास्ताचा तांबडा आणि आभाळाचा निळा असे सगळे तुकतुकीत प्रसन्न रंग मनजित बावा यांच्या चित्रात दिसतात.
त्यांच्या चित्रात निसर्ग, काल्पनिक दुनिया, प्राणी, पक्षी याशिवाय बासरी दिसते. बावा स्वतः एक उत्तम बासरीवादक होते.
त्यांनी महाभारत, रामायण आणि सुफी काव्य याच्या आधारे अनेक चित्रं काढली. या पुराणकथांना त्यांनी नवीन आकार आणि तजेलदार रंग दिले.
तुम्हाला आवडतात पौराणिक कथा? एखाद्या आवडत्या गोष्टीतील प्रसंग काढून पाहा.
मनजित बावा यांचे गुरुजी त्यांना रोज पन्नास स्केचेस करायला सांगायचे. याची त्यांना पुढं सवयच लागली.
हिमाचल प्रदेश, गुजराथ, राजस्थान या ठिकाणी त्यांनी जेव्हा प्रवास केला तेव्हा त्यांनी अशाच प्रकारे ह्या जागांची, तिथल्या माणसांची, जनावरांची अनेक रेखाटनं केली. तुम्ही सुटीत नवीन ठिकाणाला भेट दिल्यावर भरपूर फोटो तर काढालच. त्यावेळी एक छोटं स्केचबुक घेऊन जा. आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टींची चित्रस्वरुपात नोंद करा.