पिकासोची क्युबिझम शैली
चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?
दोस्तांनो, मागच्या लेखात आपण पिकासोच्या गिटारचं एक शिल्प पाहिलं. वरून, खालून, आतून, सरळ अशा सगळ्या वेगवेगळ्या बाजूंनी दिसणारी गिटार आठवतीये तुम्हाला? अशा पद्धतीत जर व्यक्तिचित्रण केलं तर?!
ही स्त्री रडताना दिसतीये? तिचा चेहरा उलट सुलट झाल्यासारखा वाटतोय ना?
याचं कारण असं आहे, की हे चित्र क्युबिझम शैलीतलं आहे. चित्राचं नाव आहे वीपिंग वूमन (आक्रंदन करणारी स्त्री).
नीट पाहिलंत, तर दिसेल की पिकासोनं तिचा चेहरा समोरून आणि बाजूनी, दोन्ही पद्धतींत दाखवलाय. चित्रावर हात ठेवून पाहा, तिचं प्रोफाइल दिसेल!
स्पेनमध्ये १९३७ मध्ये युद्ध सुरू झालं. गुरनिका नावाच्या छोट्या शहरावर बॉम्ब फेकण्यात आले होते. शहराची खूप नासधूस झाली. अनेक लोकांचा जीवही गेला. या कृतीला विरोध दर्शवण्यासाठी पिकासोनं ह्या रडणाऱ्या स्त्रीचं चित्र काढलं होतं. कदाचित तो युद्धाच्या परिणामांचं दुःख आणि दुर्भाग्य दाखवायचा प्रयत्न करत असेल.
मात्र, त्यानं याच चित्रात नवी उमेदसुद्धा दाखवली आहे! या स्त्रीचा कान छोट्या पक्ष्यासारखा काढलाय. हा पक्षी तिचे अश्रू पिऊन तिचं सांत्वन करत असेल? नवीन आयुष्याची सुरवात जवळच आहे असं सांगणारं एक फूल तिच्या टोपीवर काढलं आहे. या चित्राकडं पाहून तुम्हाला काय वाटतं?
पिकासोनं काढलेलं हे चित्र आहे ऑम्ब्रवाज व्होलार याचं! विसाव्या शतकात हा एक महत्त्वाचा कलाव्यापारी होऊन गेला. पिकासोसह कित्येक चित्रकारांच्या कलाकृती हा उत्सुक ग्राहकांपर्यंत पोचवत असे.
मिटलेले डोळे, मोठं कपाळ आणि त्रिकोणी दाढी.. ही व्यक्ती काहीशी गंभीर वाटते ना? तडे गेलेल्या आरशात जसं दिसतं तसं हे व्यक्तिचित्रण केलं आहे.
तसं म्हटलं तर कसलं डोकं आणि कसलं कपाळ! व्होलारचे डोळे खापरांसारखे किंवा विटकरी रंगाच्या वास्तुशास्त्राच्या स्केचप्रमाणं दिसतायेत. मला तर या चित्रात कितीतरी त्रिकोणी विमानं हवेत उडतायेत आणि हवेतच गोठतायेत असं वाटतं!
काळसर, तपकिरी, करडे रंग; पण व्होलारच्या चेहऱ्याचं साम्य मात्र अचूक! पिकासोचं हे वैशिष्ट्य मानलं जातं. त्यानं केलेल्या क्युबिझम शैलीतल्या कलाकृतींमध्ये चित्राच्या विषयाची कितीही मोडतोड झाली, तरी आपण नेमकं काय पाहतोय असा प्रश्नच पडणार नाही. इंटरनेटवर तुम्हाला पिकासोची या शैलीतील अनेक व्यक्तिचित्रणं पाहायला मिळतील, ती तुम्ही जरूर पाहा.
तुमच्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं क्युबिझम शैलीत चित्रण केलं तर कसं दिसेल ते करून पाहा...
(उत्तरार्ध)