दृष्टिभ्रम कला 

मधुरा पेंडसे  
गुरुवार, 22 मार्च 2018

चित्र गमती    मधुरा पेंडसे    एंटरटेनमेंट  चित्रातले जग कसे असते?

या चित्राकडे पाहा, डोळ्यांना विचित्र वाटतंय? 

या चित्रात एक घुमावदार रेषा ठराविक अंतरावर काढली आहे. उभ्या मांडणीत कॅनव्हास संपेपर्यंत तीच वक्र रेषा पुन्हा पुन्हा काढलेली दिसते. रेघेचा घुमाव वरच्या बाजूला अगदी हलका आहे, पण ही रेघ जेव्हा कॅनव्हासच्या खालच्या टोकाला मिळते, तेव्हा तिची वक्रता वाढली आहे आणि ती दाट होत गेली आहे. चित्राला नाव दिलेय - फॉल. 

ब्रिजेट रायली हिने १९६० च्या सुमारास जेव्हा पहिल्यांदा तिची कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाइट) पेंटिंग्ज प्रदर्शनात मांडली, तेव्हा या रेषा स्थिर असून हलताना दिसतायत हे पाहून लोकांना फार आश्‍चर्य वाटले. 

या चित्रकलेच्या शैलीला ऑप आर्ट म्हणजे दृकभ्रमकला असे म्हणतात. हे ऑप आर्टिस्ट रंग, रेषा आणि त्यांचे पॅटर्न दृष्टिभ्रम तयार होईल असे वापरतात. यामुळे चित्रात हालचाल झाल्यासारखी वाटते. 

ब्रिजेट रायलीचा जन्म लंडनमध्ये झाला. तिला समुद्रकिनारी फिरायला आवडत असे. मावळत्या सूर्यामुळे समुद्राचे रंग बदलताना आणि समुद्राजवळच्या गुहेत साठलेल्या पाण्यात पडलेली प्रतिबिंबे बघत ती तासन्‌तास घालवत असे. 

व्हेनिसमध्ये असताना तिने उंबेर्तो बाचिओनी (Umberto Boccioni) या आर्टिस्टच्या कलाकृती पहिल्या. 

त्याचे ‘युनिक फॉर्म्स ऑफ कंटिन्युईटी इन स्पेस’ हे मूर्तिकाम प्रसिद्ध आहे. तिलाही चित्रामध्ये असेच घुमावदार आकार काढावेसे वाटले. त्रिमितीत साधलेले आकार तिने द्विमितीत करून पाहिले. 

पुढे तिने चित्रांमध्ये रंग वापरून, उष्ण आणि थंड रंग म्हणजे लाल आणि निळा एकमेकांशेजारी लावून काही प्रयोग केले. ती बऱ्याच देशांमध्ये हिंडली, भारतातही येऊन गेली. इजिप्त, भारत या देशांच्या आर्टिस्ट्‌सनी केलेल्या कलाकृती पाहिल्या. इथल्या चित्रातल्या उजळ रंगसंगती तिला प्रभावी वाटल्या. 

भारत दौऱ्यानंतर तिने एक चित्र काढले. त्याचे नाव ठेवले - नटराज. नटराज हा नृत्यकलेचा देव. 
नटराजासारखे काय बरे दिसतेय या चित्रात? 
Bridget Riley
Nataraja १९९३

या चित्रात वापरलेल्या तिरक्‍या रेषा आणि उजळ रंग नटराजाच्या नृत्याप्रमाणेच आहेत असे तिला वाटले. तुम्हाला वाटतेय तसे? खूप रंगीत आयत.. तसे म्हटले तर या चित्राची रचना अगदी साधी आहे. पण कधी कधी साध्या गोष्टीसुद्धा क्‍लिष्ट वाटू शकतात!

फोटो फीचर

संबंधित बातम्या