लाटांची इमोजी? छे, होकूसाईचं चित्र!
चित्र-गमती
आपल्या आजूबाजूला अनेक चित्रं, चिन्हं दिसतात. त्यांचा अर्थ लावण्याचाही प्रयत्न आपण करतो. अनेकदा आपल्या ध्यानीमनीही नसणारा संदर्भ या चित्रां-चिन्हामागे असतो. अशाच चित्र-चिन्हांची माहिती या सदरात होणार आहे..
बाबाच्या फोनवर अर्णव इमोजीस चाळत बसला होता. त्याला लाटांची एक इमोजी दिसली, ‘बाबा, हे हाय अलर्टचं चिन्ह आहे ना? सुनामीचं चित्र दिसतंय!’
बाबांनी चष्मा लावून ती इमोजी नीट पहिली, ‘अरे हे तर थेट होकूसाईच्या चित्रावरून केलेलं चिन्ह आहे!’ अर्णवच्या बाबांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला होता. तिथं ‘रोपॉलिटियन म्युझियम ऑफ आर्ट’ या कलादालनात याचं प्रिंट पहिलं होतं. ‘होकूसाईच्या चित्रावरून तयार झालेली ही ईमोजी मात्र समुद्र, लाटा, सर्फिंग अशा अर्थानी वापरतात,’ बाबांनी अर्णवला सांगितलं. मग होकूसाईचं मूळ प्रिंट फोनवरच दाखवलं.
मुलांनो, तुम्ही पहिलीये ही ईमोजी?
जपानमध्ये एकोणिसाव्या शतकात कात्सुशिका होकूसाई नावाचा एक चित्रकार होऊन गेला. लहानपणापासूनच त्याला चित्र काढायला आवडत असे. जपानमध्ये सर्वांत उंच असलेल्या फुजी पर्वताची त्यानं वेगवेगळ्या अँगल्सनी छत्तीस वूड ब्लॉक प्रिंट काढली.
वूड ब्लॉक प्रिंट म्हणजे काय?
लाकडी ब्लॉकवर चित्र काढून मग कोरणीनं त्यावर खाचे पाडायचे. मग त्यावर शाई पसरवून त्याचे कोऱ्या कागदावर छापे घ्यायचे, अशी वूड ब्लॉक प्रिंट काढायची पद्धत आहे. हे प्रिंट घ्यायचं म्हणजे काय सोपं काम नाही, कारण हरएक रंगासाठी एक नवीन ब्लॉक करावा लागतो. म्हणूनच वूड ब्लॉक प्रिंट्स नेहमीच अनेक रंगी दिसतील असं नाही.
ईमोजीमधले ‘द ग्रेट वेव्ह ऑफ कांगवा’ हे छत्तीस प्रिंट्सपैकी एक प्रिंट होय, ते जगप्रसिद्ध झालं. या चित्रात बर्फाच्छादित फुजी पर्वत समुद्राच्या महाकाय लाटांमागं अगदी लहानसा दिसतो. मासेमारी करणाऱ्या लहान बोटींमुळं त्या लाटांचं उग्र रूप समजतं. प्रिंटच्या डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात त्याच्या नावाचा स्टॅम्प आहे. हीच त्याची सही!
याच चित्रावरून अर्णवला सापडलेली ईमोजीसुद्धा तयार झाली. इमोजीच काय, हे चित्र वेगवेगळ्या आकारात, वेगवेगळ्या गोष्टींवर दिसतं. अनेक चित्रकारांनी या चित्राचा आधार घेऊन नवीन चित्रं काढली.
माणसाकडं अनेक कौशल्यं आहेत. रेघांना, आकारांना एक विशिष्ट अर्थ देणं आणि समजणं ही त्यापैकी एक महत्त्वाची जाण. ‘चित्र पाहण्याचं’ कौशल्य आपल्या जीवनाचा एक अनिवार्य भाग आहे. या चित्रांशिवाय आपण भोवतालचं जग ओळखूही शकणार नाही. आपण चित्रांचा आधार घेऊन नेमकं सांगायला कधी शिकलो? या चिन्हांची सुरवात तरी कशी झाली?
पाहू पुढील अंकांत...