मातिसची गोगलगाय 

मधुरा पेंडसे
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

चित्र-गमती 
चित्रातले जग कसे असते?

या चित्राचं नाव आहे ‘गोगलगाय’ - The snail. तुम्हाला गोगलगायीच्या पाठीवर असलेली वर्तुळं दिसतायेत का? 

एक लपलेली छोटीशी गोगलगायपण आहे, नीट पाहिलं तर दिसेल! (चित्राच्या डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जांभळ्या रंगाच्या चौकोनावर एक गोगलगायीसारखा आकार आहे.) 

हेन्री मातिसला उजळ रंगसंगती आवडत असे. या चित्रात परस्परपूरक रंग एकमेकांशेजारी ठेवून त्याने रचना केली आहे. उदाहरणार्थ, लाल रंग हिरव्या रंगावर गेला आहे आणि निळा रंग केशरी रंगाच्या जवळ आहे. या रचनेमुळे चित्रात एक गंमत निर्माण झाली आहे आणि त्याकडं लक्ष वेधलं जातंय. उजळ रंगानी रंगवलेले कागदी तुकडे कापून मग कॅनव्हासवर चिकटवून हे ‘कोलाज’ केले आहे. कोलाजव्यतिरिक्त चित्रही मातिस काढायचा आणि मूर्तिकलापण करायचा.

हे चित्र ‘गोगलगाय’पेक्षा वास्तवाशी जवळ असलेलं म्हणजे रिॲलिस्टिक आहे. रंगसंगती उजळ दिसत नाही, ‘गोगलगाय’ चित्रामध्ये दिसणारे साधे, सोपे आकार मात्र या चित्रात दिसतात. 
तुम्हाला आवडलं हे चित्र? या चित्रातील स्त्री विचारात मग्न दिसते. कसला विचार करत असेल ती? तिच्याकडं पाहून मलाच प्रश्‍न पडतो! 
कोलाज करायला मातिसनं उतारवयात सुरवात केली. रंगीत कागद कात्रीनं कापून, फुलं, पानं, प्राणी असे निरनिराळे आकार कापले. त्यानंतर त्यांच्या रचना करून पहिल्या.

या चित्रामध्ये मातिसनं वेगवेगळे लहान मोठे आकार कापले आहेत. घोड्याचा आकार मोठ्ठा (जांभळा) आणि काळजीपूर्वक कापलेले लहान आकार (पांढरा, काळा, पिवळा) दिसताहेत. 
खालील चित्रात मातिसनं एकसारखे दिसणारे आकार कापलेत पण ही सगळी पानं परस्परांपेक्षा निराळी आहेत. जवळजवळ पूर्ण कॅनव्हास याच पानांच्या आकारानी भरून गेला आहे.

या चित्रातील रंग मजेत उड्या मारताहेत, नाचताहेत असं वाटत. काम करताना तो रेडिओवर गाणी ऐकत असे. हेन्री मातिसच्या चित्रांकडं पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं? आनंदी वाटतं का? 
तुम्हाला कोलाज बनवायला आवडेल? काय काय लागेल कोलाज करण्यासाठी? रंगीत कागद, कात्री, ग्लू, पेन्सिल आणि तुम्हाला आवडणारं संगीत! तुमच्या घराच्या परसातील झाडं, पानं, फुलं किंवा असे कुठलेही आकार जे तुम्हाला आवडतात त्यांचं निरीक्षण करा.  रंगीत कागदांचे साधे आकार कापा आणि ते कोऱ्या कागदावर ठेवून वेगवेगळ्या रचना करून पाहा.

Tags

फोटो फीचर

संबंधित बातम्या