रेषांची गंमत
चित्र-गमती
चित्रातले जग कसे असते?
डबा खाऊन झालाय, बाहेर छान ऊन पडलंय, दुपारच्या सुटीनंतरचा गणिताचा तास चालू आहे आणि डोळ्यावर पेंग येतीये. अशावेळी तुम्ही खिडकीच्या शेजारी बसून बाहेर बघत वहीचं मागचं पान उघडून काय बरं करता?
वेगळाच विचार मनात चालू असताना कागदावर सहज रेघोट्या काढत बसायला आवडतं तुम्हाला?
त्यातून बऱ्याच कल्पना सुचतात. दृश्यकलेत रेघोट्या हीच मुळाक्षरं आहेत, हे तुम्हाला माहिती आहे? कुठल्याही चित्राचं नियोजन मनात न धरता पेन्सिलनं कागदावर फक्त रेघा काढायला सुरवात केली की काय होत असेल? चित्रकारसुद्धा असंच करत असतील?
पॉल क्ली हा एक जर्मन चित्रकार. त्याचं लहानसं जग तो त्याच्या चित्रात उतरवतो असं वाटतं. पॉल क्लीला वाटे, बिंदू फिरायला निघाला की रेषा बनते!
हे रेखाटन करताना त्यानं एकमेकांना जोडलेले काही चौकोन काढले असावेत आणि नंतर त्यांना माणसासारखे पाय आणि नाक डोळे काढले असावेत. ज्यामुळं ते गमतीशीर दिसतायेत. चित्र पूर्ण झाल्यावर या दोन आकृतींवर पुन्हा गिरवलंय. ज्यामुळं त्या रेषा वजनदार दिसतायेत. कदाचित यामुळंच त्यानं वरील चित्राचं नाव ‘ओझ्यानं दबलेली मुलं’ (Burdened Children) असं ठेवलं असावं.
या रेखाटन स्वरूपातील चित्रात त्याला नक्कीच काहीतरी गवसलं होत. अशा पद्धतीनं त्यानं नंतर पुन्हा पाच एक प्रयोग करून पहिले.
या चित्राचं नाव आहे ‘भावंडं’ (Siblings) दोन लहान मुलं दिसतायेत? की चार पायांचा आणि चार डोळे असलेला प्राणी? कला या शैलीला समीक्षक अतिवास्तववाद (surrealism) असं म्हणतात. या शैलीची ओळख आपण पुढं करून घेणार आहोतच.
या चित्राला पॉलनं ‘जुळी’ (Twins) हे नाव दिलंय. पहिल्या चित्रात रिकाम्या सोडलेल्या चौकोनात रंग भरलेत आणि काही रंगीत रेषा आणि टिंबं काढलीयेत. सिबलिंग्स आणि ट्विन्स या दोन चित्रात काय फरक दिसतायेत?
तुम्हालाही एका बिंदुला फिरायला घेऊन जायला आवडेल? एखाद्या विषयाचं चित्रं काढायचं असं मनात ठरवू नका.
तुमचा हात आणि पेन्सिल यांना कागदावर मोकळं सोडा. मिळालेल्या आकाराला हात, पाय आणि नाक, डोळे किंवा वाटलंच तर पंख, तुरा, शेपटी असे प्राणी किंवा पक्ष्यांचे अवयव देऊन पाहा!