अमिबाच्या रेघोट्या 

मधुरा पेंडसे 
शुक्रवार, 16 मार्च 2018

चित्र गमती

चित्रातले जग कसे असते?

कधी कधी रेघोट्या काढता काढता त्या पानभर पसरतात. बर्नार्डने एक अमिबासारखा छोटा आकार कॅनव्हासच्या डाव्या टोकावर काढला आणि जागा संपेपर्यंत त्याभोवती तो रेषा काढत गेला. 
शेजारील चित्राचं नाव आहे ‘बहरताना’ (Floris). लंडनमधील एका बेकरीत केक आणि पेस्ट्री छान सजवून देत. केकवरची सजावट पाहून बर्नार्डला हे चित्र सुचले! 

या चित्राची सुरवात कुठल्या छोट्या आकाराने झाली असेल बरे? 
बर्नार्ड कोहेन हा ब्रिटिश चित्रकार. त्याला विणकाम फार आवडायचे. न्यू मेक्‍सिकोमध्ये असताना विणकाम करत असणाऱ्या एका वयस्कर बाईंना बर्नार्डने विचारले, ‘चांगले आणि साधारण विणकाम यात फरक कसा ओळखायचा?’ त्या बाई म्हणाल्या, ‘विणकामात रचना काय केलीये यापेक्षा विण कशी आहे हे महत्त्वाचे! हरेक विण ठराविक दाबाची आणि अवधानाने म्हणजे लक्ष देऊन केली तर जे विणतोय ते नक्कीच छान दिसेल..’ बर्नार्डला वाटले हे अगदी चित्र काढण्यासारखेच आहे. कॅनव्हासचा संपूर्ण पृष्ठभाग तो अशाच ठराविक दाबाने काढलेल्या रेषांनी भरवत असे आणि नंतर त्यामध्ये रंग भरत असे. 

तुम्हाला बर्नार्डच्या चित्रांबद्दल काय वाटते? 

तुम्ही पण एक प्रयोग करून पाहा. एक छोटा कोणताही आकार काढा आणि त्याभोवती रेघा काढत चला. पाण्याच्या तरंगाप्रमाणे; नंतर त्या रेषेला वेगवेगळे रंग द्या. 

शेजारील चित्र एका रेषेचे आहे. बर्नार्डने कॅनव्हासभर ही एक अखंड रेष काढलीये. त्यानंतर या रेषेला हव्या त्या वळणावर वेगवेगळे रंग दिले. त्याची रेघ कॅनव्हासच्या खालच्या टोकापासून वळणे घेत सबंध कॅनव्हासभर फिरून पुन्हा खाली परतलीये. चित्राला नाव दिले आहे - इन दॅट मोमेंट (तत्क्षणी)! 

काहींना निबंध चांगला लिहिता येतो. एखाद्याला भाषण करायला लागल्यावर चांगले शब्द सुचतात. एकही चित्र नसलेले पुस्तकसुद्धा लोक आवडीने वाचतात. शब्दांशी, लिखाणाशी फारशी दोस्ती नसलेली मंडळी काय बरे करत असतील? तुम्हाला काय आवडते? शब्द की चित्र? की दोन्ही? 

शब्दांशी मैत्री नसलेला चित्रकार आणि त्याची रंगीत फटकाऱ्यांनी गिरमिट केलेली चित्रे पाहूया पुढील अंकात!

Tags

फोटो फीचर

संबंधित बातम्या