ॲक्‍शन पेंटिंग 

मधुरा पेंडसे
मंगळवार, 20 मार्च 2018

चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?

जॅक्‍सन पॉलक हा चित्रकार त्याच्या स्टुडिओमध्ये काम करतानाचा सोबतचा हा फोटो आहे. 
ही काय बरे पद्धत आहे चित्र काढण्याची? 

जमिनीवर कॅनव्हास अंथरून मग ब्रशने त्यावर रंगांचे शिंतोडे उडवून पॉलक पेटिंग्ज करीत असे. त्याच्या या पद्धतीला ‘ॲक्‍शन पेंटिंग’ म्हणतात. कारण तो कॅनव्हासभोवती भराभर फिरत रंग फेकत असे. त्याच्या काही चित्रात तर त्याच्या पायाचे अस्पष्ट ठसेसुद्धा दिसतात. 

घरातल्या भिंतींवर कधी गिरमिट केलंय तुम्ही? भिंतींवर चित्र काढायला मजा येते ना! माझ्याच काय, पण मैत्रिणीच्या घराच्या भिंतीवरदेखील चित्र काढल्यामुळे बोलणी खाल्ल्याची माझी आठवण आहे! तुम्हाला रागवलेय कोणी भिंतीवर चित्र काढण्यावरून? 

भिंतींवर केलेल्या चित्रकामाला ‘म्युरल’ असे म्हणतात. अठराव्या वर्षी पॉलक न्यूयॉर्कमध्ये मोठ-मोठी म्युरल्स रंगवू लागला. या सरावामुळे मोठ्या आकाराच्या कॅनव्हासवर चित्र काढायला जॅक्‍सनला जराही भीती वाटत नसे. 

एका कलादालनाच्या मालकीणबाईंनी त्याला असेच एक मोठे चित्र करायला सांगितले. वीस फुटी कॅनव्हास त्याच्या घरात मावेना, तो जमिनीवर पसरवून चित्र काढण्यासाठी त्याने स्वतःच्या घराची भिंतच तोडली! त्या बाईंना चित्र तर आवडलेच, शिवाय पॉलकला चित्र प्रदर्शन भरवण्यासाठी निमंत्रणही मिळाले. 

शाईच्या पेनाला झटका मारला, तर गंमतशीर आकृत्या तयार होतात. त्यातून अचानक काहीतरी मजेशीर आकार, रचना मिळतात. एक प्रयोग करून पाहूया.. एक कोरा कागद आणि पेन्सिल घ्या आणि चक्क डोळे मिटून कागदभर पेन्सिल फिरवत राहा. हे चित्र ऑटोमॅटिझम चित्र म्हणजे स्वचलित चित्र बरे का.. जगभरातले अनेक चित्रकार अजूनही अशाप्रकारचे प्रयोग करून पाहतात. 

खालील चित्राचे नाव आहे समरटाइम (ग्रीष्मवेळ) उन्हाळ्यात जॅक्‍सन एका खेड्यात राहायला गेला. त्याला तिथे राहायला आवडत असे. तिथे राहताना त्याने हे चित्र काढले. तुम्हाला काय वाटते या चित्राकडे पाहून? जॅक्‍सन पॉलक चित्र काढताना त्याच्या आवडीचे संगीत ऐकायचा. त्याच्या चित्रात संगीतात असतो, तसा ताल आणि लय आहे असे काही लोक म्हणतात. या चित्रातील आकारांमध्ये नाच करणारी माणसे दिसतायेत तुम्हाला?

फोटो फीचर

संबंधित बातम्या