ग्राफिटी 

मधुरा पेंडसे
बुधवार, 21 मार्च 2018

चित्र गमती

चित्रातले जग कसे असते?

मित्रांनो, तुमच्या शहरातल्या भिंतींवर काय काय दिसतं तुम्हाला? कधी शासकीय नियम लिहिलेले दिसतात तर कधी सुविचार! बऱ्याचदा काही जाहिराती पत्ता आणि फोन नंबरसकट रंगवलेल्या दिसतात. सार्वजनिक भिंतींवर चित्र काढलेली पाहिलीयेत तुम्ही? 
नदीवरचा पूल, रेल्वे स्टेशन, जुन्या इमारती किंवा उड्डाण पुलाखालच्या भिंतींवर क्वचित चित्र काढलेली दिसतात. स्प्रे पेंट, स्टेन्सिल आणि रंगवण्याची इतर सामग्री वापरून केलेल्या या चित्रांमध्ये काही लिखाण देखील केलेले दिसते. अशा भित्तीचित्रांना ‘ग्राफिटी’ असे म्हणतात. 

या मुलाकडे पाहून काय वाटतेय? हा रागावलेला दिसतोय? दंगेखोर असेल? टोपी उलटी घातलीये आणि चेहरा रुमालाने झाकलेला दिसतोय. हा एकदम आक्रमक वाटतोय ना? पहिल्या नजरेत असं वाटतं की एक दंगलखोर काहीतरी फेकून नासधूस करणार आहे. चित्र कृष्णधवल रंगसंगतीत आहे, पण त्याच्या हातात काहीतरी रंगीत आहे! काय आहे? पुष्पगुच्छ! 
बॅनस्की या ब्रिटिश आर्टिस्टने ही ग्राफिटी केलीये. हत्याराऐवजी हातात फुलं देऊन बॅनस्की काय

दाखवण्याचा प्रयत्न करतोय? 

या आर्टिस्टने प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणी ग्राफिटी केल्या आहेत. भांडवलशाही, शासन, गरिबी, राजकारण अशा विषयांची उपहासात्मक चित्रं बॅनस्की काढत आला आहे. लहान मुलं, पोलिस, शॉपिंग ट्रॉली, सैनिक, प्राणी, अगदी सिक्‍युरिटी कॅमेरासुद्धा त्याच्या ग्राफिटीमध्ये दिसतात. त्याची आणखी एक गंमत म्हणजे त्याने त्याची ओळख अजूनही गुप्त ठेवली आहे. 

त्याची ‘गर्ल विथ बलून’ ही कलाकृती प्रसिद्ध आहे. एक छोटी मुलगी तिच्या हार्ट शेप असलेल्या फुग्याला हवेत सोडून देत आहे. भिंतीवर उजव्या बाजूला लिहिलं आहे, देअर इज ऑलवेज होप. या चित्राकडं पाहून तुम्हाला आशादायी वाटतं का? 

‘शॉप टिल यू ड्रॉप’ ही ग्राफिटी बॅनस्कीनं लंडनच्या एका उंच इमारतीवर केली आहे. या चित्रातील स्त्री पाहून मला ‘एलिस इन वंडरलॅंड’मधल्या एलिसची आठवण येते. पुस्तकातील एलिस एका अदभुत दुनियेत पडते पण या चित्रातील स्त्री कुठल्या खोल गर्तेत कोसळतीये असं तुम्हाला वाटतं? 

भर चौकातील भिंतींवर किंवा बागेतील भिंतींवर उगाचच गिरमिट केलं तर त्यानं सार्वजनिक स्थळाची नासधूस होते. बॅनस्कीच्या ग्राफिटी मुख्यतः अशाच ठिकाणी असतात. त्यानं केलेल्या ग्राफिटी तुम्हाला नेटवर पाहायला मिळतील, त्या तुम्ही जरूर पाहा. तुम्हाला काय वाटतं, बॅनस्की त्याच्या चित्रकामानं अशा भिंती खराब करतो की मनोरंजक करतो?

फोटो फीचर

संबंधित बातम्या