पिकासोचे कलाप्रयोग 

मधुरा पेंडसे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

चित्र गमती
​चित्रातले जग कसे असते?

तुम्हाला तीन संगीतकारांची गाणी ऐकायची आहेत? या तिघांत एक बासरीसारखं वायुवाद्य वाजवतोय, दुसरा गिटार आणि तिसरा कागदावर लिहिलेली रचना गातोय.. 

रंगीबेरंगी कपडे आणि मुखवटे घालून हे काहीशा अंधाऱ्या खोलीत बसलेत. या तिघांत मध्यभागी बसलेला माणूस सर्कशीतल्या जोकरच्या पेहरावात आहे. पाब्लो पिकासो त्याच्या बऱ्याच चित्रांत स्वतःलाच एखाद्या विदुषकासारखा काढायचा. त्याच्या एका बाजूला काळा झगा आणि एक निमूळतं टोक असलेली टोपी घातलेला माणूस आहे. त्याला लांब दाढी आहे. दुसऱ्या बाजूला बसलेल्या माणसाला एक छोटी मिशी आहे. दिसतीये तुम्हाला? त्याच्या निळा - पांढऱ्या कोटाचे खांदे टोकदार आहेत. 

ही माणसं कागदाचे तुकडे वापरून केलेल्या कोलाजसारखी नाही दिसत? त्याचे धड मोठे आणि हाताची बोटं अगदी जेमतेम वाद्य हातात धरण्याइतकी लहान दिसतायेत! पण हे संगीतकार तुम्हाला आवडेल ती गाणी वाजवू शकतात बरं का. त्यांच्याकडं पाहून तुम्हाला कोणतं गाणं ऐकू येतंय? 

या बॅंडमध्ये अजून एक गडी लपलेला आहे! दिसतोय तुम्हाला? 

टेबलाखाली एक कुत्रा काढलाय. गिटार वाजवणाऱ्या माणसाच्या दोन पायांच्या मधे त्याची शेपटी दिसतीये. आता डाव्या बाजूला बघा, त्याचे केसाळ धड आणि पंजे दिसले? 

खालील फोटोतील शिल्प कसलं आहे हे ओळखणं काही फार अवघड नाही. ती एक गिटार आहे पण पिकासोच्या कल्पनेतली! तो शिल्प बनवण्यासाठी नवीन प्रयोग करून पाहात असावा. गिटार खरोखरी जशी दिसते तसं हे शिल्प नाहीच मुळी! गिटार आतून कशी दिसत असेल तसं काहीसं हे शिल्पं दिसतंय. यामधील छिद्र आत न जाता बाहेर डोकावतंय. 

पाब्लो पिकासोनं सतत अनेक कलाप्रयोग करून पहिले. इतके की त्याच्या आयुष्यभराच्या कामात अनेक कालखंडच निर्माण झाले. त्यापैकी क्‍युबिझम हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या प्रकारात एखादी वस्तू वेगवेगळ्या बाजूंनी एकाच चित्रात दाखवली जाते. म्हणजे, चित्रकार जर एका बाटलीचं चित्र काढणार असेल तर ती वरून, खालून, आतून, तिरकी, सरळ अशी सगळ्या बाजूंनी एका कॅनव्हासवर तो काढतो. अगदी एक्‍स-रे दिसणाऱ्या डोळ्यांनी पाहिल्याप्रमाणं! 

पिकासो त्याच्या मित्रमैत्रिणींचं व्यक्तिचित्रण या शैलीत करीत असे. तुम्हाला काय वाटतं, कसे दिसत असतील हे क्‍युबिस्ट चेहरे?  पुढच्या अंकात पाहूया. 
(पूर्वार्ध)

फोटो फीचर

संबंधित बातम्या