स्वप्नचित्र 

मधुरा पेंडसे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?

स्वप्नांमध्ये काहीही शक्‍य असतं ना!  
मला कधी कधी गाढ झोपेत चित्रविचित्र स्वप्नं पडतात. अगदी अजब आणि मजेदार! सकाळी उठल्यावर स्वप्नात काय काय घडलं हे आठवायचा मी खूप प्रयत्न करते.. कधी आठवतात पण कधी खूप सारं विसरायला होतं. तुम्हाला होतं असं? 
अशाच काही स्वप्नांना चित्रस्वरूप देणाऱ्या कलाकारांचा एक ग्रुप होता. आपल्या मेंदूत खोलवर, सुप्त विचार आणि भावना असतात आणि त्याच गाढ झोपेत दिसायला लागतात, असा त्यांचा विश्‍वास होता. 

वरील चित्र रिने मॅग्रिट यानं काढलं आहे. चित्राचं नाव आहे ‘मॅन विथ अ न्यूजपेपर.’ 
चित्रातील चार दृश्‍यं पाहा. पहिलं चित्र सोडलंत तर बाकीची तीन चित्रं सारखीच वाटतायत ना? आपल्याला असं वाटू लागतं, की पहिल्या चित्रातील माणूस या खोलीत का बसलाय? आणि पुढच्या चित्रात कुठं गेला? काय झालं असेल? 
रिने मॅग्रिट हा एक सररिॲलिस्ट म्हणजे अतिवास्तववादी चित्रकारांपैकी एक प्रसिद्ध चित्रकार होता. स्वप्नात तुम्ही काहीच ठरवून करू शकत नाही, म्हणूनच या चित्रकारांना स्वप्नांबद्दल खूप आकर्षण होतं. कितीतरी मजेदार दृश्‍यं स्वप्नात दिसतात, ज्यांचा एकमेकांशी काहीच मेळ नसतो. यातूनच नवीन आणि अनपेक्षित कल्पना सुचत असतील कदाचित! 

मॅग्रिटचं वरील चित्र पाहा. चित्राला नाव दिलंय ‘द रेकलेस स्लीपर.’ 

एका लाकडी बॉक्‍समध्ये हा माणूस लाल पांघरूण घेऊन डोळे मिटून झोपलाय. त्याला स्वप्नं पडत असेल का? ह्या माणसाच्या खाली ग्रे - करड्या रंगात वेगवेगळ्या गोष्टी दाबून बसवल्या आहेत. हा ग्रे भागसुद्धा थडग्यावरच्या दगडासारखा दिसतोय. या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध असेल? 

मॅग्रिटनं अनेक चित्रं काढली. त्याच्या चित्रांत काही गोष्टी हमखास दिसत- सफरचंद, पाइप, मेणबत्त्या, सूट आणि हॅट घातलेली माणसं, निळं आभाळ आणि पांढरे ढग, दारं-खिडक्‍या आणि आरसे... म्हटलं तर ह्या गोष्टी काही अनोळखी किंवा विचित्र नाहीत, पण या वस्तू मॅग्रिट ज्या प्रमाणं त्याच्या चित्रांत मांडतो तिथंच खरी गंमत दिसायला लागते! 

तुम्हीसुद्धा एक प्रयोग करून पाहणार? घरातल्या एका वस्तूकडं टक लावून पाहा. तुम्हाला आवडेल तितका वेळ पाहा. त्यानंतर या वस्तूकडं पाहताना मनात आलेले सगळे विचार आणि शब्द लिहून काढा.

फोटो फीचर

संबंधित बातम्या