छायाप्रकाशाचा चित्रकार 

मधुरा पेंडसे
गुरुवार, 3 मे 2018

चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?

चित्रकलेच्या तासाला निसर्गचित्रण असा विषय आला, की मी पाठ असल्याप्रमाणं त्रिकोणी डोंगर, त्यामधून वाहणारी नदी, नदीत कमळं आणि त्याभोवती मजेत पोहणारे हंस असं चित्रं काढायची. तुम्ही काढलंय असं निसर्गचित्र? खरंतर मी अजूनही नदीतली कमळं आणि त्याभोवती पोहणारे हंस असं दृश्‍य पाहिलंच नाहीये! आपल्या आजूबाजूच्या टेकड्या, नद्या, झाडं याकडं नीट पाहिल्यावर लक्षात येईल, की दोन त्रिकोणी डोंगरांपेक्षा प्रत्यक्षातला निसर्ग जरा वेगळा आहे! 

जे. एम. डब्ल्यू. टर्नर निसर्गचित्रण करत असे. तो कलाशिक्षकही होता आणि चांगला कवीदेखील होता. काही समीक्षक त्याला सर्वश्रेष्ठ चित्रकार मानतात. 

त्याचे वडील नाभिक होते. त्याला मात्र चित्रकारच व्हायचं होतं. अठराव्या शतकातील बहुतांश चित्रकार आपापल्या स्टुडिओमध्ये बसून काम करायचे, हा मात्र खुल्या मोकळ्या जागेमध्ये निसर्गाची चित्रं काढे. हररोज आपली रेखाटनाची वही, कॅनव्हास आणि रंग घेऊन तो बाहेर पडे आणि जे दिसतंय ते काढण्याचा प्रयत्न करे. सूर्योदय, सूर्यास्त, माध्यान्ह, धुकं, पाऊस, बर्फ या सगळ्याचं त्यानं बारकाईनं निरीक्षण केलं. दिवसभरातल्या सर्व वेळांचं आणि वर्षातल्या सर्व ऋतूंचं चित्रण त्यानं केलं आहे. यामुळंच कदाचित त्याला छायाप्रकाशाचा चित्रकार म्हणत. 

टर्नरची एक गोष्ट सांगतात, समुद्री वादळात महाकाय लाटा जवळून कशा दिसतात हे पाहण्यासाठी त्यानं बोटीच्या मस्तुलला स्वतःला बांधून घेतले होते. (मस्तूल म्हणजे जहाजाला मधे लावलेले उंच लाकडी खांब). हा प्रसंग खरा की खोटा हे मला खात्रीशीर माहिती नाही, पण जे. एम. डब्ल्यू. टर्नर असाच असावा असं वाटतं. 

टर्नरनं वापरलेल्या रंगांचा अभ्यास अनेक कलाकारांनी केला. वरील चित्राचं नाव आहे ‘समुद्रावरील कोळी’. या चित्रात असलेल्या रंगछटा Olafur Eliasson या आर्टिस्टला खूप आवडल्या. त्यानंही टर्नरचे हे रंग वापरून स्वतःची एक कलाकृती केली. खालील चित्रात तुम्हाला टर्नरचे रंग दिसतायेत का? कोणतं चित्र जास्त आवडलं? की दोन्ही कलाकृतींकडं पाहिल्यावर सारखंच वाटतंय? 

कला-पुस्तकांमध्ये, इंटरनेटवर तुम्हाला टर्नरची अनेक चित्रं पाहायला मिळतील, ती तुम्ही जरूर पाहा. 

कधीच न पाहिलेलं निसर्गचित्रण करण्याऐवजी एक प्रयोग करून पाहूयात. निसर्गचित्रण करण्यासाठी जवळच्या टेकडीवर किंवा समुद्रावर फिरायला जा. एक वही-पेन्सिल जवळ ठेवा, त्यात जसं दिसतंय तसं काढण्याचा प्रयत्न करा. हेच तुमचं खरं निसर्गचित्रण!

फोटो फीचर

संबंधित बातम्या