देगाचं कलाविश्‍व 

मधुरा पेंडसे
गुरुवार, 17 मे 2018

चित्र गमती 
चित्रातले जग कसे असते?

कलाबाज, नर्तकी, रेखाटनं आणि शिल्पं.. पाहू या एडगर देगाचं कलाविश्‍व! एडगर देगा हा फ्रेंच चित्रकार. तो वकील व्हावा अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण एडगर चित्रकलेत रमला. 

कलाबाजी करणाऱ्या लोकांची देगा हा वेगवेगळ्या अँगलनं चित्र काढीत असे. मिस लाला या कसरत करणाऱ्या स्त्रीचं रेखाटन पाहा. ही सर्कशीच्या तंबूच्या टोकावर तोंडात एक दोर पकडून उभी आहे. खडूसारखे पेस्टल रंग वापरून हे रेखाटन ‘ऑन द स्पॉट’ केले असावे. खेळ चालू असताना किंवा सराव करताना काढलेल्या या चित्रात मूव्हमेंट किंवा गती दिसते. देगाची अशाप्रकारची अनेक सरावचित्रं तुम्हाला इंटरनेटवर सापडतील. 

तुम्हीसुद्धा मैदानात किंवा मधल्या सुटीत तुमच्या मित्रमंडळींची धावताना, उड्या मारताना, बॉल फेकताना - ऑन द स्पॉट रेखाटनं करून पाहा. 

देगानं केलेलं हे व्यक्तिचित्रण मला फार आवडतं. अशाप्रकारचं चित्र काढताना साधारणतः चित्रातील व्यक्तीची नजर चित्र पाहणाऱ्याच्या दिशेत दाखवली जाते. म्हणजे फोटो काढताना ज्याप्रमाणं आपण कॅमेऱ्याकडं पाहतो तसं. 

‘वूमन विथ क्रीझान्थमम्स’ या व्यक्तिचित्रणात मध्यभागी रंगीबेरंबंगी फुलांचा जणूकाही विस्फोट झाला आहे. कॅनव्हासच्या अगदी कडेला स्त्री दाखवली आहे. चेहरा तिच्या हातानी थोडा झाकला गेलाय आणि तिची नजर आपल्याकडं नाही. काय पाहत असेल ही स्त्री? 

देगा नर्तकींच्या चित्रांसाठी ओळखला जातो. नृत्य करणाऱ्या स्त्रियांच्या शरीरातील लय देगाच्या चित्रात दिसते. बॅकस्टेज, प्रयोगासाठी तयार होताना, नृत्य शिकताना अशा नर्तकींच्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगांची चित्रं देगानं काढली. 

देगानं केलेलं हे छोट्या नर्तकीचं शिल्प. उतारवयात त्याची नजर अधू होत चालली होती. अर्थातच चित्र काढायला त्याला थोडं कठीण जात असावं. तेव्हा त्यानं शिल्प करायला सुरवात केली. बॅले हा नृत्यप्रकार शिकणाऱ्या या मुलीचं मूळ शिल्प त्यानं लालसर मेणात बनवलं. नंतर कापडी स्कर्ट चढवला. त्याच्या मृत्यूनंतर मूळ शिल्पाचं कास्यशिल्प बनवले. नृत्य करताना होणाऱ्या शारीरिक हालचाली कशा प्रकारे दाखवता येतील? नर्तकी काढून बघायला आवडेल तुम्हाला?

फोटो फीचर

संबंधित बातम्या