हॉकनीची चित्रे 

मधुरा पेंडसे
शुक्रवार, 15 जून 2018

चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?
 

उन्हाळ्यात या चित्राकडे पाहिल्यावर कोणालाही या स्वीमिंग पूलमध्ये डुंबावेसे वाटेल! ‘अ बिगर स्प्लॅश’ या चित्रात डेव्हिड हॉकनीने कॅलिफोर्नियातला एक स्वीमिंग पूल काढलाय. आत्ताच कोणीतरी पाण्यात उडी घेतलीये असे या चित्राकडे पाहून वाटते ना? 

डेव्हिड हॉकनी हा विसाव्या शतकातला एक प्रसिद्ध चित्रकार. गुगलवर जर ‘ब्रिटिश चित्रकार’ असा सर्च दिलात, तर डेव्हिड हॉकनीचे नाव नक्की दिसेल. या आधीच्या लेखात पाहिलेल्या रॉय लिश्‍टनस्टाईन आणि अँडी वॉरहोलप्रमाणेच डेव्हिडसुद्धा पॉप आर्ट मूव्हमेंटचा भाग होता. इतर चित्रकला प्रकार कंटाळवाणे झालेत, असे या चित्रकारांना वाटे. हे पॉप आर्टिस्ट उजळ, फ्रेश रंगसंगती वापरून मजेशीर चित्रे काढत. 

डेव्हिडला कुठली चित्रे काढायला आवडत असत? 

डेव्हिड कधी कॅलिफोर्नियात तर कधी लंडनमध्ये वास्तव्य करतो. या जागा एकमेकांपेक्षा फार वेगळ्या आहेत. हा फरक त्याच्या चित्रात दिसतो. कॅलिफोर्नियात पुष्कळदा छान सूर्यप्रकाश पडतो आणि लंडनचे हवामान मात्र सतत बदलत राहते. लंडनच्या अनेक ऋतूंची चित्र त्याने काढली. 

हॉकनीचे बालपण जिथे गेले त्या परिसराचे ‘गोइंग अप गॅरोबी हिल’ हे चित्र आहे. या चित्रात अनेक उजळ रंग वापरलेले दिसतात. डेव्हिड हॉकनीने असे रंगीबेरंगी निसर्गचित्र करण्याचे काय कारण असावे बरे?  

आणि हो, ‘अ बिगर स्प्लॅश’ या चित्रात मागची झाडे पाहा.. ही ताडासारखी दिसणारी झाडे इंग्लंडमध्ये दिसणार नाहीत. 

डेव्हिडने त्याच्या आवडीच्या माणसांची अनेक चित्रे काढली आहेत. गमतीचा भाग म्हणजे, या आवडीच्या माणसांच्या जोड्या त्याच्या चित्रात दिसतात. ‘पेरेंट्‌स’ या चित्रात त्याच्या आईवडिलांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक दिसते. 

या चित्रातील आई खुर्चीवर ताठ, पण आरामात बसलेली आहे. तिची जागरूक नजर बघणाऱ्याकडे खिळलेली दिसते. वडील खुर्चीच्या टोकाशी, पेपरात डोके घालून वाचन करताना दिसतात. हॉकनीने जणूकाही आपल्या पालकांबद्दल वाटणाऱ्या भावना आयुष्यभरासाठी या चित्रात टिपून ठेवल्या. 

हॉकनी अजूनही चित्र काढतो. इतक्‍यात त्याने आय पॅडवर चित्र काढायला सुरुवात केली आहे. आय पॅडवर काढलेले चित्र पूर्ण झाल्यावर, सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसे झाले आहे हे पाहता येते. एखादा व्हिडिओ रिवाइंड केल्याप्रमाणे! 

तुम्हाला डेव्हिड हॉकनीची चित्रे आवडली? तुम्हीसुद्धा ब्रशने किंवा आय पॅडवर चित्र काढून पाहा! ठळक रंग देऊन तुमच्या घराजवळचा स्वीमिंग पूल किंवा एखाद्या बागेचे चित्र काढून पाहा किंवा तुम्हाला माणसांची चित्रे काढावीशी वाटली तर तुमच्या कुटुंबीयांपासून सुरुवात करा आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला काय काय वाटते ते तुमच्या चित्रात दाखवायला विसरू नका!

फोटो फीचर

संबंधित बातम्या