गतिमान शिल्प 

मधुरा पेंडसे
गुरुवार, 28 जून 2018

चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?

दोस्तांनो, या आधी आपण हेन्री मोर या कलाकाराची शिल्पं पाहिली होती. या लेखातसुद्धा एका शिल्पकाराची आणि त्याच्या शिल्पांची ओळख आपण करून घेणार आहोत. या आर्टिस्टच्या शिल्पांना ‘मोबाईल’ म्हणतात. मात्र ‘मोबाईल’ हा शब्द ‘सेलफोन’ या अर्थाने नव्हे.. ज्या गोष्टी चालत्या फिरत्या असतात त्यांना मोबाईल म्हणतात. अशा या गती असलेल्या शिल्पप्रकारची सुरवात अलेक्‍झांडर क्‍लॅडरने चक्क हवेत चित्र काढून केली असे म्हणतात! 

या शिल्पांची हालचाल कशी होत असेल? 

ही शिल्पं करताना क्‍लॅडरनं अनेकदा झाडं, फांद्या अगदी कोळ्यापर्यंत निसर्गातील वेगवेगळ्या आकारांच्या रचना केल्या. अलेक्‍झांडर गणितात हुशार होता. यामुळंच त्यानं अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेतलं. या शिक्षणाचा उपयोग त्यानं ‘कायनॅटिक शिल्प’ हा कलाप्रकार करताना केला. ज्या कलाकृतींना हवेमुळं किंवा मोटरमुळं गती मिळते त्यांना ‘कायनॅटिक आर्ट’ म्हणता येईल. 

वायर, कापड आणि बुचं अशा काही वस्तू वापरून त्यानं ‘सर्कस सीन’ हे शिल्प केलं. लहानपणी त्याला सर्कस आणि त्यातली कसरत करणारी माणसं पाहायला आवडे. दोरीवर तोल सांभाळून चालणाऱ्या, उंच उड्या मारणाऱ्या कलाबाजांचं त्याला कौतुक वाटे. तुम्ही गेलाय कधी सर्कस पाहायला? सर्कशीतली मजा क्‍लॅडरच्या या शिल्पात दिसते का? 

मागील लेखात आपण पिएट मॉनड्रिअनची निळ्या, लाल आणि पिवळ्या चौकोनांची काही चित्रं पाहिली. पॅरिसमध्ये असताना क्‍लॅडर एकदा मॉनड्रिअनच्या स्टुडिओमध्ये गेला. त्याची चित्रं पाहून क्‍लॅडरला वाटलं, हे रंगीत आकार हलायला लागले तर काय होईल!? 

अमेरिकेत परत आल्यावर क्‍लॅडरनं या कल्पनेवर काम केलं. 

या शिल्पाचं नाव आहे ‘स्मॉल स्फिअर अँड हेवी स्फिअर’ या शिल्पाचा आपला एक आवाजही आहे बरं का! यातील छोटाच, पण वजन असलेला गोळा बाटल्यांना, कॅनला, लाकडी पेटीला आणि एका बाजूला दिसणाऱ्या थाळ्याला आपटतो. याचा आवाज काय गमतीशीर येत असेल ना! 

अलेक्‍झांडर क्‍लॅडरनं शिल्पांकडं पाहण्याचे नवीन प्रयोग केले. तुम्हाला या शिल्पांकडं पाहिल्यावर काय वाटतं? या शिल्पांकडं पाहून कुठल्या कुठल्या वस्तू आठवतात?

फोटो फीचर

संबंधित बातम्या