विसलरची चित्रे  

मधुरा पेंडसे
गुरुवार, 5 जुलै 2018

चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?

मित्रांनो, हे चित्र ओळखीचे वाटतेय? तुम्ही ‘मिस्टर बीन’चा विनोदी चित्रपट पहिला असेल तर तुम्हाला हे चित्र नक्की आठवेल! या चित्रावरून त्याने बऱ्याच गमती केल्या आहेत. 

हे चित्र काढलेय जेम्स मॅकनिल विसलर (James McNeill Whistler) या अमेरिकन आर्टिस्टने! या चित्राला ‘विसलर्स मदर’ या नावाने ओळखतात. काय दिसतेय या चित्रात? पहिल्या नजरेत तर हे पेंटिंग नसून फोटोच असावा असे वाटते. कुणी आपल्या आईचे चित्र काढले आणि ते कसेही असले तरी छानच दिसेल ना? पण या चित्रात काहीतरी खास आहे! चित्राकडे पाहून आदर, प्रेम, हळुवारपणा दिसतोच, पण चित्रातल्या ‘आई’ या विषयाप्रमाणेच अजून कुठल्या गोष्टींमुळे हे चित्र खास झालेय? 

विसलरने या चित्राचे नाव ‘अरेंजमेंट इन ग्रे अँड ब्लॅक’ असे ठेवले आहे. रंगीबेरंगी छटा वापरून या चित्रातील शांत वातावरण दिसलेच नसते कदाचित! चित्राच्या बॅकग्राउंडमध्ये एका बाजूला पडदा आणि भिंतीवरती लावलेली फोटोफ्रेम या वस्तूंनी काळजीपूर्वक बनवलेले आयत दिसतील. पुढे वृद्ध स्त्रीची जवळजवळ फक्त छाया दिसते. तीसुद्धा मागच्या वस्तूंसारखी एकदम स्थिर. तिचे डोके आणि हात मात्र हलक्‍या रंगात आणि जिवंत दिसतात.. आणि हे सगळे काळपट, मातकट रंग वापरून काढले आहे. काळ्या रंगाच्या छटांनी चित्राची रचना केली आहे म्हणूनच विसलर नेहमीच आग्रहाने चित्राचे नाव ‘विसलर्स मदर’ नसून ‘अरेंजमेंट इन ग्रे अँड ब्लॅक’ आहे, असे सांगत असे. 

हे चित्र वापरून अनेक विषयांसाठी पोस्टर्स बनवली गेली. १९३४ मध्ये या चित्राचा अमेरिकन पोस्ट ऑफिसने स्टॅम्पदेखील बनवला. 

विसलर तरुणपणी नकाशाचे आरेखन करीत असे. त्याला हे काम जरा कंटाळवाणे वाटत असे, असे म्हणतात. तो नकाशाच्या समासात समुद्री सर्प, जलपऱ्या, देवमासे काढत असे. अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आल्यावर त्याची एचिंग विभागात बदली करण्यात आली. एचिंग (etching) प्रक्रियेत धातूच्या प्लेटवर चित्र कोरून मग त्यावर शाई लावून छापे घेतले जातात. पुढे त्याने असंख्य लिथोग्राफ तयार केले. 

तुम्ही तुमच्या आईचे चित्र काढले तर चित्रातली आई काय करत असेल? स्वयंपाक करत असेल, पुस्तक वाचत असेल, की गाडी चालवत असेल? या चित्रासाठी तुम्ही कोणते रंग वापराल?

संबंधित बातम्या