चित्रातलं संगीत

मधुरा पेंडसे
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?

मित्रांनो, चित्र, शिल्प किंवा अगदी इमारतसुद्धा पाहताना आपण त्याबद्दल काही प्रतिसाद देत असतो. आपण चित्रात काय पाहतो? त्याकडं पाहून कसं वाटतं? आणि कसले विचार मनात येतात? पाहणं, अनुभवणं आणि विचार करणं या सगळ्याच गोष्टी आपण एकत्रितपणे करत असतो. या गोष्टींचा आपण सुटा विचार केला तर कलेच्या भाषेत वेगळी शीर्षकं वापरली जातात. रिॲलिझम म्हणजे वास्तवतावाद, एक्‍सप्रेशनिझम म्हणजे अभिव्यक्तिवाद आणि ॲब्स्ट्रॅक्‍टशन म्हणजे अमूर्तीकरण होय. या लेखात पाहूया की ही मोठी मोठी, अवघड नावं म्हणजे नेमकं काय? 

हा फोटो नाही, ‘म्युझिक अँड गुड लक’ हे विलियम हार्नेट (William Harnett) या अमेरिकन चित्रकारानं काढलेलं एक वस्तूचित्रण आहे. हे वास्तववादी चित्र आहे हे तुम्ही ओळखालच. या चित्रातील सगळ्या वस्तूंचं टेक्‍श्चर, आकार त्यावर पडलेला प्रकाश सगळं काही अगदी हुबेहूब काढलंय. वस्तूंच्या सावल्यांकडं पाहून त्यातील आणि खिडकीमधील अंतर समजतं. या चित्रात काही वस्तू उभ्या आणि काही वस्तू तिरक्‍या मांडल्या आहेत. त्यामुळं चित्रात अनेक अँगल/कोन दिसतात. 

राउल डुफे (Raoul Dufy) या फ्रेंच चित्रकाराच्या ‘द यलो व्हायोलिन’ या चित्रात व्हायोलिन, टेबल आणि म्युझिकल नोट्‌स दिसतायत. त्या काही जशाच्या तशा - हुबेहूब काढलेल्या नाहीत, पण ओळखता मात्र येतात. कदाचित तुम्ही म्हणाल, असं चित्र काढायला खूपच सोपं! या चित्रात सहजता आणि जिवंतपणा दिसतो. पण वरवर पाहताना वाटणारी सहजता खरंतर, एखादा पट्टीचा वादक काही कष्ट न घेता मजेत पेटीवर गाणी वाजवताना दिसतो ना तशीच आहे. या चित्राकडं पाहून कुठला कलाप्रकार आहे असं वाटतं,  रिॲलिझम, एक्‍सप्रेशनिझम का ॲब्स्ट्रॅक्‍टशन? 

जॉर्ज ब्राक (Georges Braque) या फ्रेंच आर्टिस्टच्या ‘म्युझिकल फॉर्म्स’ या चित्रात काय दिसतंय? सगळ्याच वस्तूंची तोडफोड झाल्यासारखी वाटतेय ना? म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्‍टशन का? या चित्रातदेखील हार्नेटच्या चित्रात दिसणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. दोन्ही चित्रांत उभ्या, आडव्या आणि तिरक्‍या रेषांची विचारपूर्वक रचना केली आहे. ब्राकने व्हायोलिन रंगवताना कंगोरे दाखवले आहेत, पण ते फक्त लाकडाचा पृष्ठभाग सुचवणारे आहेत. हार्नेटच्या चित्राच्या तळाशी एक कॉलिंग कार्ड तिरके लावलेले आहे. तसंच या चित्राच्या तळाशी journal या शब्दातील पाच अक्षरं त्याच कोनात बसवलेली दिसतात.

फोटो फीचर

संबंधित बातम्या