मी, माझ्यासाठी.. कधीतरी! 

विभावरी देशपांडे 
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

कॉफीबीन्स
कधीतरी लोकांच्या अपेक्षांच्या पलीकडं जाऊन स्वतःचा विचार करायला हवा. कारण साठीत, सत्तरीत कितीही वेळ, पैसा आणि स्वातंत्र्य असेल तरी शरीर साथ देईलच असं नाही! 

मागच्या आठवड्यात माझ्या एका सिनेमाचं जयपूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रीनिंग झालं. मागच्या महिन्यात जेव्हा स्क्रीनिंगची तारीख ठरली तेव्हा मी आणि माझी सख्खी मैत्रीण राधिका इंगळे सहज बोलून गेलो, ‘जायचं का जयपूरला?’ कल्पना मस्त होती. पण असं पटकन उठून कुठं जाणं तसं सोपं नसतं. कर्वे शिक्षणसंस्थेच्या मीडिया इन्स्टिट्यूटची राधिका डायरेक्‍टर आहे. तिची माध्यम नावाची एक संस्था आहे, ती स्वतः नाट्यदिग्दर्शक आहे आणि त्याव्यतिरिक्त ती हजारो गोष्टी करत असते. तिचा मुलगा यंदा बारावीला आहे. माझी मुलगी अजून तशी लहानच आहे. शिवाय मी आठवड्यातले तीन दिवस मुंबईत राहते. याशिवाय लिखाण, नाटकाचे दौरे, शूटिंग या निमित्तानी घरापासून आणि मुलीपासून दूर असते. मला नवरा, आई वडील, सासू सासरे, शेजार अशी उत्तम सपोर्ट सिस्टीम आहे. पण तरीही मनात एक गिल्ट असतोच. बायको म्हणून, मुलगी म्हणून, आई म्हणून, सून म्हणून आपण सगळं उत्तम पद्धतीनी पार पाडतो की नाही, हा प्रश्‍न सतत घोळत असतो. आपण कामासाठी सतत बाहेर असतोच, मग केवळ मजा करायची म्हणून पुन्हा घर आणि मुलगी सोडून कसं जायचं? हा विचार सतत मनात असतो. राधिकाचंही तसंच काहीसं आहे. पण हे सगळं बाजूला ठेवून आम्ही जायचा निर्णय घेतला. मला स्वतःला प्रवास खूप आवडतो. जगाच्या पाठीवरची प्रत्येक जागा मला पाहायची आहे, अनुभवायची आहे. माझ्या नवऱ्याला तितकीशी प्रवासाची आवड नाही. त्यामुळे अनेक गोष्टी पाहायच्या राहून गेल्या आहेत. ग्रिप्स थिएटरशी असलेल्या संबंधाच्या निमित्तानी युरोपात प्रवास अनेकदा केला आहे. पण भारतातच अनेक जागा बघायच्या राहून गेल्या आहेत. त्यामुळे जयपूरला जायचंच असं ठरवलं. मी आणि राधिका दोघीच. फिल्म फेस्टिव्हलचं केवळ निमित्तच! प्रवास हा मुख्य हेतू होता. इंटरनेटवर फ्लाईटचं चांगलं डील मिळालं. आजकाल मी कुठल्याही हॉटेलमध्ये राहाण्याऐवजी Airbnb राहते. मला महागड्या, थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची खूप हौसही नाही आणि दरवेळी परवडेल असंही नाही. Airbnb च्या साईटद्वारे त्या त्या शहरातल्या घरांमध्ये राहता येतं. ही सोय स्वस्त तर असतेच पण त्या घरांना त्या शहराचा, संस्कृतीचा एक गंध असतो. हा अनुभव मला खूप समृद्ध करणारा वाटतो. आपल्या बजेटनुसार अगदी सध्या घरांपासून आलिशान बंगल्यापर्यंत काहीही निवडता येतं. अशाच एका घरात आम्ही आमचं बुकिंग केलं आणि निघालो. तीन दिवस जयपूर आणि दोन दिवस पुष्करमध्ये राहिलो. भरपूर गप्पा मारल्या, उत्तम जेवलो, भटकलो, शॉपिंग केलं आणि खूप एनर्जी, समाधान गोळा करून परत आलो. आल्यावर वाटलं आपण या आधी हे का केलं नाही? आमच्या फेसबुकच्या फोटोंवर अनेक कमेंट्‌स आल्या. काहींना खूप आनंद वाटला, काहींना आश्‍चर्यही वाटलं, आमच्या अनेक मैत्रिणींनी तर ‘आम्हाला नेहमी वाटतं असं करावं पण जमतच नाही’ असंही म्हटलं. 

वास्तविक पाहता आम्ही जगावेगळं आणि क्रांतिकारी असं काहीच केलं नव्हतं. याहून खूप मोठे मोठे विक्रम बायका करतात. आम्ही फक्त एक प्रवास केला. मग असं काहीतरी भारी केल्यासारखं आम्हाला आणि आमच्या बरोबरीच्या बायकांना का वाटलं असेल? 

मला वाटतं याचं उत्तर सोपं आहे. आम्ही दोघीच जाऊन मज्जा करून आलो. घर, मुलं, काम, जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून. नवरा किंवा मित्र यांची मदत किंवा सोबत न घेता. आता अनेक तरुण मुली म्हणतील की यात काय एवढं? याचं उत्तर ‘काहीच विशेष नाही’ असंच आहे. पण चाळिशीच्या आसपासच्या माझ्यासारख्या working mothers साठी हे उत्तर इतकं सोपं नाही. माझ्या आधीच्या पिढीत अनेक स्त्रिया home maker होत्या. काही नोकरी करणाऱ्याही होत्या. त्यांच्याकडून ‘घरचं सगळं नीट पार पाडा आणि मग नोकरी करा’ अशी ‘साधी’ अपेक्षा होती.. आणि त्यांनाही ती मान्य होती. त्यासाठी त्या जिवाचं रान करायच्या. त्यामुळं ‘स्वतःसाठी मी काय करते’ हा प्रश्‍न त्यांना पडत नसावा.. आणि पडलाच तरी ‘मी स्वतःसाठी नोकरी करतेच की. मग अजून किती टाकायचं घरच्यांवर’ असं उत्तर त्या स्वतःला देत असाव्यात. माझ्या नंतरची पिढी खूपच वेगळी आहे. स्वतःसाठी काहीही करताना त्यांना कुठलीही अपराधी भावना त्रास देत नाही. माझ्या मते हे उत्तम आहे. पण माझी पिढी कुठंतरी मधेच अडकली आहे. 

आमच्यासारख्या अनेक जणींना ‘आपण सगळं व्यवस्थित करत आहोत की नाही हा प्रश्‍न सतत भेडसावत असतो.. आणि बहुतांश वेळा ‘व्यवस्थित’ या शब्दाचा अर्थ ‘लोकांच्या अपेक्षांनुसार’ हा असतो. आईसारखं स्वतःला घरच्यांसाठी झोकूनही देता येत नाही आणि तरुण सख्यांसारखं ’My life my choice’ या तत्त्वावरही जगता येत नाही. 

मला वाटतं माझ्या पिढीतल्या मुलींना मोठं होता होता कळत नकळत काही Do’s and don’ts दिले गेले होते. म्हणजे अगदी ‘नवऱ्याला उलटून बोलायचं नाही’, ‘सातच्या आत घरात यायचं’ किंवा ‘बाई म्हणजे चूल आणि मूल’ ही पारंपरिक शिकवण निश्‍चित नव्हती. स्वातंत्र्य होतं, संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. मनाजोगतं शिक्षण दिलं होतं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र असायला हवं असा आग्रहही धरला होता. पण तरीही मंगळागौरी केल्या, डोहाळजेवणं केली. (यातलं काहीच केलं नाही आणि माझ्या सासूनी माझ्यावर ते कधीच लादलं नाही. त्याबद्दल मी तिची आभारी आहे.) यामध्ये हौस हा एक मुद्दा असू शकतो पण कुठंतरी आपण सगळ्यांच्या अपेक्षांना पुरं पडलं पाहिजे हे नकळत आमच्या मनावर बिंबवलं गेलं. ‘आपल्या आधी समोरच्याचा विचार करायचा. आपली संस्कृती ही भोगाची नाही, त्यागाची आहे’ असं काहीसं ऐकत आम्ही वाढलो. मी कुणावर कुठलेच आरोप करत नाहीये. फक्त मागं पाहताना ‘काय घडलं असेल?’ असा विचार करते आहे. आज माझी मुलगी १३ वर्षांची आहे. तिला वाढवताना हा विचार माझ्या मनात प्रकर्षानी आल्यावाचून राहत नाही. आणखी एक गोष्ट. ही सगळी निरीक्षणं, अनुभव हे माझ्या सामाजिक, आर्थिक स्तराविषयी मर्यादित आहेत. 

‘बाईच घर धरून ठेवते, समतोल राखते, घराचं घरपण जपते, A son is a son till he gets his wife, a daughter is a daughter all her life’ असं सगळं ऐकत आम्ही वाढलो. आपल्या मुलगी असण्याचं एक गोड बंधन किंवा ओझं आनंदानी वाहात मोठ्या झालो. ठोस नियम आणि बंधनं नसली तरी ‘आपण काहीही चुकीचं करता कामा नाही कारण सगळं सांधून, जपून ठेवण्याची, योग्य ते वागण्याची, करण्याची जबाबदारी आपलीच आहे’ हा पक्का विश्‍वास घेऊन आम्ही संसारात पडलो. आम्हाला स्वतंत्र विचार करायलाही शिकवलं होतं, आमच्या हक्कांची जाणिवही करून दिली होती; पण नाती टिकवायला तडजोड करायलाही शिकवली होती. या सगळ्याचा आमच्या परीनी अर्थ लावत आम्ही घर चालवायला लागलो. मुलं वाढवायला लागलो. आमच्या बाबांपेक्षा आमच्या मुलांचे बाबा वेगळे आहेत. आमचे नवरे मुलांना उत्तम सांभाळतात. (अपवाद असतील पण आधीच्या पिढीपेक्षा आमच्या पिढीत मुलांना वाढवण्यात वडिलांचा सहभाग खूपच जास्त आहे हे निश्‍चित); पण ही मदत हा आपला हक्क आहे, यात उपकृत वाटण्याचं काही कारण नाही हे आमच्यापैकी किती जणींना वाटतं? माझा नवरा उत्तम कुक आहे, माझ्याकडं स्वयंपाकाची बाई आहे पण तरीही तो रोज उत्साहानी काही ना काही करतो. ही त्याची आवड आहे. पण अनेकदा ‘बिचाऱ्यावर फार पडतं नाही? कारण तू नसतेस ना!’ अशीच प्रतिक्रिया ऐकायला मिळते. यामध्ये माझे सासू सासरे आणि आई वडील हा खूप मोठा अपवाद आहे. आजपर्यंत त्यांनी कधीच हे वाक्‍य उच्चारलेलं नाही. या बाबतीत मी खूप नशीबवान आहे, पण सरधोपटपणे हाच विचार केला जातो. यामध्ये मूल आणि घर ही मुळात माझी जबाबदारी आहे हे एक मोठं गृहीतक असतं. मग बाहेरची जबाबदारी मी माझ्या नवऱ्याच्या बरोबरीनी उचलत असीन तरी त्याबद्दल अशी चर्चा होत नाही. कुटुंबसंस्था, त्याची रचना, जबाबदाऱ्या या गोष्टी कालसापेक्ष आहेत हे अनेकदा समाज विसरतो. पण गंमत म्हणजे आम्हालाही हे प्रकर्षानी जाणवत नाही, मी अत्यंत मोकळ्या, बुद्धीवादी आणि स्त्री-पुरुष समानता मानणाऱ्या कुटुंबात वाढले आहे. पण माझ्याही मनातून अपराधीपणाची भावना जात नाही. आमच्यावर उघड उघड बंधनं नाहीत. संपूर्ण स्वातंत्र्य आहे, आर्थिकदृष्ट्या आम्ही स्वतंत्र आहोत पण बंधन आहे आमच्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षांचं. फक्त स्वतःचा, स्वतःच्या इच्छांचा, गरजांचा विचार करताना येणाऱ्या गिल्टचं. आपण कुठल्यातरी भूमिकेत कमी पडत असू का? या एका भीतीचं. जगाच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आपल्या स्वतःच्याच स्वतःकडून आहेत अशी गल्लत सतत करून घेतली जाते.. आणि त्या काही काळ तरी बाजूला ठेवता येत नाहीत. आज आमची मुलं बऱ्यापैकी स्वतंत्र झाली आहेत, करिअरमध्ये, आर्थिकदृष्ट्या स्थैर्य आहे. (माझ्या प्रोफेशनमध्ये ते कधीच येत नाही हा मुद्दा वेगळा. मी सामान्यतः चित्र काय आहे ते मांडते आहे.) आता थोडं स्वतःकडं बघायला काय हरकत आहे? माझी एक मैत्रीण शाळेत सुटलेलं कथ्थक पुन्हा शिकते आहे. एकीनी तर मास्टर्स करायला ॲडमिशन घेतली आहे. तिची दोन्ही मुलं परदेशात मास्टर्स करत आहेत आणि ही इकडं! एका मैत्रिणीनी बाईक घेतली आहे आणि पूर्वी असलेलं रायडिंगचं स्वप्न पूर्ण करते आहे. हे सगळं करायचं आहे हे म्हटल्यावर कदाचित घरच्यांना धक्का बसेल.. ‘हे काय खूळ?’ असं म्हणतील. विरोधही होईल. पण कधीतरी लोकांच्या अपेक्षांच्या पलीकडं जाऊन स्वतःचा विचार करायला हवा. कारण साठीत, सत्तरीत कितीही वेळ, पैसा आणि स्वातंत्र्य असेल तरी शरीर साथ देईलच असं नाही! 

त्यामुळं आम्ही ठरवलं आहे. मुलींनी जमायचं, ठरवायचं आणि प्रवास करायचा. मुद्दाम मुली म्हणते आहे कारण After all, Life starts at 40! मी म्हटलं तसं आम्ही कुणी एव्हरेस्ट चढून जात नाही. तर आमच्या मनातले स्वतःकडून असलेल्या अपेक्षांचे उंच डोंगर पार करण्याचा हा प्रयत्न आहे! 

संबंधित बातम्या