कॉफीबाज

संकलन : इरावती बारसोडे, ज्योती बागल
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

कॉफी स्पेशल
अस्सल कॉफीप्रेमींचं कॉफीशी असलेलं नातं..
त्यांच्याच शब्दांत...

रोमँटिक कॉफी
माझी आई कर्नाटकची असल्यामुळं मला कॉफीची लहानपणापासून सवय आहे. कॉफीविषयी बालपणाच्या चांगल्या आठवणी आहेत. आईनं नेसकॅफेची सवय लावली होती. लग्न झाल्यावर बायकोनं फिल्टर कॉफीची सवय लावली. त्यामुळं आता फिल्टर कॉफी आवडते. कर्नाटक, धारवाडकडं स्टीलच्या पेला-वाटीत मिळणाऱ्या कॉफीचा फील आवडतो. आम्ही चेन्नई, जर्मनी अशी वेगवेगळ्या ठिकाणांहून कॉफी मागवतो. बऱ्याचदा दुपारी ११.३०-१२ वाजता आमचे मित्र खास कॉफी प्यायला घरी येतात. 
चहाचं आणि पावसाचं नातं आहे. चहा म्हटलं की मी नेहमी कल्पना करतो, की किशोरचं (कुमार) गाणं सुरू आहे आणि पावसात एकटा माणूस चहाचा कप घेऊन उभा आहे. पण हेच जेव्हा कॉफी असेल, तेव्हा मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचं रोमँटिक गाणं आणि कोणीतरी दोघं हातात हात घेऊन कॉफी पीत आहेत, अशी कल्पना करतो. 
कॉफीबद्दल खूप किस्से आहेत. कधीकधी व्यावसायिक गाणी करायला वेळ लागतो. मी आणि नरेंद्र भिडे एकदा एक आयटम साँग करत होतो, पण काही केल्या ते होत नव्हतं. आम्ही बराच वेळ झगडत होतो. शेवटी ३-३.३० ला आम्ही ठरवलं आता हे गाणं नको करायला. आपल्याला जे जमतं ते करू. नरेंद्रला नेहमी शब्द आधी लागतात आणि मग तो चाल लावतो. पण त्या दिवशी सगळंच खेळी-मेळीत चाललं होतं. त्यानं आधी चाल लावली आणि मग मी शब्द लिहिले. त्यावेळी आम्ही कॉफी पीत होतो. तेव्हा हे काव्य सुचलं -

एक कॉफी आणि झिम झिम झिम पाऊस हा
मौन तू ही मौन मी ही, गीत माझे अन तुझेही, गाई पाऊस हा 

अशा चिंब वेळी धुक्यासोबती
लपेटून घ्यावे मन..मनाभोवती
सरींतून जाणवावी तहान नवी
आणि वाफ होत जावे 
पुन्हा पुन्हा मी..आणि तू..अन पुन्हा..पाऊस हा 
एक कॉफी आणि झिम झिम झिम पाऊस हा

हळुवार जावे घनांना तडे
क्षण क्षण संथ वाहे प्रहराकडे
शब्दांविण गुंफली ही कविता कुणी
जिच्यातून बरसलो 
जरा जरा मी..आणि तू..अन जरा..पाऊस हा 
एक कॉफी आणि झिम झिम झिम पाऊस हा

- वैभव जोशी


कॉफी म्हणजे जिव्हाळा... 
मी आणि माझा नवरा ऋषिकेश आम्ही दोघंही प्रचंड कॉफीप्रेमी आहोत. कॉफी आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळं आमच्याकडं कॉफी बीन्स आणून ते ग्राइंड करून ती ब्य्रू करणं असा रोजचा मोठा प्रोग्रॉम असतो. खास कॉफी प्यायची म्हणून माझ्याकडं येणारे बरेचजण आहेत. आम्ही घरीच वेगवेगळ्या ठिकाणांहून कॉफीज ऑर्डर करून, त्या बीन्स ग्राइंड करून घरीच कॉफी तयार करतो. पुण्यात रुपाली, स्टारबक्स आणि लॉ कॉलेज रोडवर असलेल्या कॉफी नेशनची कॉफी मला आवडते. मुंबईतील 'ब्ल्यू टोकाइ'ची कॉफी आवडते. 
कॉफीबद्दलचा अलीकडंच घडलेला एक किस्सा असा, की मागच्याच वर्षी आम्ही सहकुटुंब 'बाली'ला गेलो होतो. तिथं कॉफी प्लांटेशन्स आहेत आणि 'कोपी लुवाक' ही तिकडची प्रसिद्ध कॉफी आहे. या कॉफीचं वैशिष्ट्य असं, की तिथं लुवाक नावाचा एक प्राणी आहे. तो प्राणी त्या प्लांटेशनमधले सगळ्यात चांगले, उच्च दर्जाचे कॉफी बीन्स शोधून तो खातो. ते बीन्स रात्रभर त्याच्या पोटात राहतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या विष्ठेवाटे ते अर्धवट डायजेस्टेट कॉफी बीन्स बाहेर टाकले जातात. हे जे पडलेले कॉफी बीन्स असतात ते गोळा करून, साफ करून, रोस्ट करून त्यापासून कॉफी केली जाते. त्याची क्वालिटी उत्तम असते, म्हणून ती प्रचंड महागही असते. आम्ही सर्वजण कॉफीप्रेमी असल्यानं तिथल्या कॉफीबद्दल उत्सुकता होतीच, पण जेव्हा अशा प्रकारे ही कॉफी तयार होते हे माझ्या घरच्यांना समजलं, तेव्हा 'शी.. शी..' अशी त्यांची रिअॅक्शन होती. पण मी आणि ऋषिकेशनं 'आम्ही तर कॉफी पिणार' असं सांगून टाकलं... आणि आम्ही ती महागडी कॉफी घेऊन प्यायलो. पण दुर्दैव असं की त्या कॉफीची चव मात्र आम्हाला काही रुचली नाही. अशा प्रकारचा अनुभव याआधी कधीही आम्हाला आला नव्हता. 
- विभावरी देशपांडे, पुणे


दिवसाचा बूस्टर...
मला कॉफीची चटक दोन-तीन वर्षांपूर्वी माझ्या प्रणव नावाच्या मित्रामुळं लागली. त्याच्या घरी मॉर्फी रिचर्ड्सचं एक कॉफी मशीन होतं. त्यामध्ये केलेल्या कॉफीची चव वेगळीच असायची, कॅफेमध्ये मिळते त्याच्या जवळ जाणारी. म्हणून मी ते मशीन आणलं. ते बंद पडलं तेव्हा विचार केला, की आपण घरीच प्रयत्न करू... आणि आता कॉफी तयार करणं हा माझा छंदच झाला आहे. सकाळी उठल्यानंतर दिवसाच्या रूटिनमध्ये कॉफी करणं हेही असतं. माझ्या घरी मिनी एस्प्रेसो मशीन आहे. कॉफी बीन्स ग्राइंड करण्याच्या प्रोसेसपासून मी विविध प्रकारच्या कॉफी तयार करतो. एक कप कॉफीनं दिवसाची सुरुवात कशी छान होते; एनर्जी मिळते, एकप्रकारचा बूस्ट मिळतो. कॉफी तयार करण्याच्या पद्धती, प्रकारांविषयी जसजशी माहिती होत गेली, तसतसा माझा कॉफीमधला इंटरेस्ट वाढत गेला. माझी आणि मित्रांची कॉफीवर चर्चाही होते. माझ्या नातेवाइकांना, मित्रमंडळींना माहिती आहे, की मला कॉफीचं किती कौतुक आहे. त्यामुळं ते आवर्जून मी केलेली कॉफी प्यायला येतात. कॉफी टाइम हा डेडिकेटेड आणि विश्रांतीचा वेळ असतो. मी स्वतः घरी केलेली कॉफी प्यायलो, की बाहेरची कॉफी प्यायची इच्छाही होत नाही. चहा आवडत नाही असं नाही, पण कॉफी प्यायलो, की आय अॅम अॅट पीस!
- ध्रुव दामले, पुणे


दैवी पेय!
चहा की कॉफी असा कोणी प्रश्न विचारला, की मी बेंबीच्या देठापासून ‘कॉफी’ असा ओरडतो. चहाऐवजी मी कधीपण कॉफी पहिली निवडतो. (याचा अर्थ असा नाही, की चहाबाबत माझ्या मनात आकस वगैरे आहे) कॉफीच्या विविध प्रकारांची चव घ्यायला मला आवडते, (स्टारबक्स किंवा सीसीडी मधील नाही) लाते, कॅपुचिनो, मोका इ. याच कॉफीमध्ये वापरलेल्या बीन्सच्या वैविध्याचेही भलते अप्रूप आहे. भारतातील कूर्ग, चिकमंगलुर (कर्नाटक) इथली कॉफी पावडर माझ्याकडे आहे. मुन्नारची (केरळ) कॉफी आणि अस्सल कोलंबियन कॉफीचा आस्वादही मी घेतला आहे... आणि अजून अशा ‘कॉफी वैविध्या’च्या शोधात आहे. मला आवर्जून ‘कोपी लुवाक’ या कॉफीचा उल्लेख करावासा वाटतो. ही साधारणतः तुम्हाला सापडेल ती इंडोनेशियात. ही कॉफी ‘लुवाक’ चक्क प्राण्याचा विष्ठेपासून तयार होते! (त्यामुळे स्वानुभव स्वजबाबदारीवर घेणे!)  
कॉफी म्हटले की मला खासकरून दोन गोष्टी आठवतात. एक म्हणजे परीक्षेच्या एक दिवस आधी दोन ते तीन कप कॉफी पिऊन रात्री दोनपर्यंत ‘नाइट मारायची’ आणि परीक्षेत झोपायचे; आणि दुसरे म्हणजे, सुटीचा दिवस, संध्याकाळची वेळ आणि मी केलेली खास फोम कॉफी, घरच्यांबरोबर तासनतास गप्पा, चर्चा आणि मनमुराद हसणे.
अशी ही बहुरंगी, बहुरूपी आणि अनेक आठवणींची साक्षीदार असलेली कॉफी, मी तरी दैवी पेयच मानतो!
- प्रथमेश लखोटे, बदलापूर


दाक्षिणात्य मित्रांशी गट्टी जमली...
चहा भूतलावरचं आद्य पेय असलं तरीही कॉफीचा दर्जा चहापेक्षा नेहमीच वरचा आहे. कॉफी मला राजघराण्यातली वाटते. म्हणजे असं... एक छान नक्षीदार ट्रे, त्यात गरम दुधाची किटली, इटालियन काचेच्या नाजूक सोनेरी कडा असलेल्या कपबश्या, इन्स्टंट कॉफीचे स्याशे अशा राजेशाही थाटामुळं कॉफीपानाची लज्जत वर्धिष्णू होते. असं असलं तरीदेखील मद्रदेशीय फिल्टर कॉफीचा कडसर स्वाद मला नेहमीच भावला आहे. याच फिल्टर कॉफीच्या मन प्रसन्न करणाऱ्या स्वादामुळं अनेक दाक्षिणात्य मित्रांशी माझी गट्टी जमली. इन्स्टंट कॉफीची चव जर उत्तम प्रतीचे काचेचे कप वाढवत असतील, तर उकळती फिल्टर कॉफी ही स्टीलच्या पेलावाटीनं खालीवर करून प्यावी. ती लज्जत आगळीच. माझा दिवस कॉफीच्या कपानं सुरू होतो आणि मावळतोदेखील कॉफीपानानंच!
- सतीश कुलकर्णी, डोंबिवली


शीण पळवणारी कॉफी
माझ्यासाठी अति प्रिय काही असेल तर ते एकच, गरम स्ट्राँग कॉफी. कॉफी म्हटलं की आठवते तिची जिभेवर रेंगाळणारी थोडी स्ट्राँग कडवट चव. हो कडवट, कारण कॉफी प्यायची तर स्ट्राँगच. गोड आणि कॉफी... मुळात ही संकल्पना मला आवडतच नाही. झोप उडवून तरतरी आणणाऱ्या पेयामध्ये कडक कॉफीचा नंबर पहिला असेल. कॉफीला पर्यायी एकतर काही नसावं आणि असलंच तरी कॉफीची सर त्याला नसावी. सुस्ती-आळस-कंटाळा दूर सारून स्फूर्ती आणि ताजंतवानं करण्यात कॉफी फायदेशीर असल्याचं मी तरी अनुभवलं आहे. कामाचा लोड कितीही असू द्या, लेट नाइट काम सुरू असेल, शीण आला असेल... आणि त्याच वेळी समोर कॉफीचा वाफाळलेला कप जेव्हा समोर दिसतो, त्या कॉफीचा घोट जेव्हा घशाखाली उतरतो ना, तेव्हा हा सगळा शीण, कंटाळा व आळस क्षणार्धात कुठच्या कुठे पळालेला असतो. कॉफीचं महत्त्व माझ्या लेखी खूप आहे, कारण वेळोवेळी सुख-दुःखात, महत्त्वाच्या क्षणी माझा आत्मविश्वास वाढवण्यात आणि मला खंबीर करण्यात जर कोणाची साथ असेल, तर ती कॉफीची! लेखन हा माझा आवडता छंद. त्यामुळं काही सुचत नसेल आणि कॉफी प्यायलो तर डोकं जाम भारी काम करतं, थोडक्यात माझ्या रिफ्रेशमेंटसाठी कॉफी तिचं काम चोख पार पाडते.
- क्षितिज कुलकर्णी, पुणे


अनुभवांची साक्षीदार
कॉफी म्हटलं ती सीसीडी, स्टारबक्स अशी नावं आठवतात... पण घरी आईनं केलेली आपल्याला हवी तशी कॉफी पिण्यात काही वेगळीच मजा असते. बाहेर चहा पिते, पण घरी मात्र कॉफीच लागते. संध्याकाळी कप हातात घेऊन दिवसभरातल्या गोष्टी आईला सांगणं... सकाळी झोपाळलेल्या अवस्थेत कप घेऊन बसणं... हे अनुभव खासच आणि कॉफीच त्यांची साक्षीदार आहे! 
- मुग्धा घाणेकर, डोंबिवली


कॉफी माझी सखी
‘कॉफी’च्या सुगंधाबरोबर किती आठवणी ताज्या होतात.. कॉलेजमध्ये अभ्यास करताना जेव्हा रात्री जागवल्या, तेव्हा कॉफी एक मैत्रीण होऊन कायम सोबत करायची. कालांतरानं नोकरीसाठी घरापासून दूर राहिले, तेव्हा ही मैत्रीण अधिक जवळ आली. बॅचलर जीवनात कधी कोणाचा प्रॉब्लेम सोडवायला, तर कधी कोणाला घरची आठवण आली म्हणून सोबत करायला या सखीला निमंत्रण दिलं जायचं. कधीकधी तर तिला भेटायची इतकी तीव्र इच्छा व्हायची, पण घरी दूध संपलेलं असायचं. मग काय रात्री १२ वाजताही आम्ही सगळ्याजणी हिरानंदानीच्या सीसीडीमध्ये जाऊन तिला भेटायचो. आयुष्यात जेव्हा जीवनसाथी निवडण्याचा टप्पा आला, तेव्हा कित्येक होतकरू स्थळांना भेटण्याच्या गमतीदार प्रसंगांची ती एक साक्षीदार आहे. मला वाटतं माझ्यापेक्षा तीच मला जास्त ओळखत असावी.
त्याही पुढं आमच्या प्रेमाच्या साक्षीपासून ते आमच्या लग्नाचं प्रोजेक्ट प्लॅनिंग करण्यापर्यंत ती नेहमीच उपस्थित होती. लग्न झाल्यावर नवऱ्याशी कोणतीही गहन चर्चा करायचा बेत असला, की मी त्याला विचारत असे, ‘एक एक कॉफी घेऊया?’ हल्ली तर त्याला नुसतं ‘कॉफी घेऊया का?’ असं विचारलं तरी तो धास्तावतो, या विचारानं की त्याच्या पुढ्यात कोणता विषय येणार आहे. अशा प्रफुल्लित आणि ताजंतावनं करणाऱ्या सखीचं नातं म्हणजे ‘कॉफी आणि बरंच काही..’
- दीप्ती देशपांडे, मुंबई


रिफ्रेश करणारे मेडिसिन 
मी कधीकधी चहाऐवजी बदल म्हणून कॉफी घेते. कॉफीची चव खूप वेगळी असते म्हणून ती मला आवडते. मला कॉफीच्या चवीप्रमाणेच कॉफीचा वासही आवडतो. मला विशेष करून रविवारी सुटीच्या दिवशी कॉफी पीत वाचन करायला जास्त आवडते. त्यामुळे माझा मूडही फ्रेश होतो. योग्य प्रमाणात घेतलेली कॉफी शरीरासाठी चांगली असते. माझ्यासाठी कॉफी केवळ एक पेय नसून रिफ्रेश करणारे मेडिसिन आहे. 
- रजिता चंटी, हैदराबाद 


कॉफीच्या आवडीतून 
 मला लहानपणापासूनच कॉफी प्यायला आवडते. त्याची एक आठवणपण आहे. मी पुण्याला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात १९८१ ते १९८५ या काळात शिकत होतो. महाविद्यालय मुळा-मुठा नदीच्या काठाच्या संगमावर आहे. तिथे असलेल्या महाविद्यालयाच्या बोट क्लबमध्ये मी स्विमिंग शिकायला जायचो. ऑफ लेक्चरला कॅंटीनमध्ये गप्पा मारत बसायचो. माझे मित्र चहा घ्यायचे. मी काहीच घेत नव्हतो. एके दिवशी बाजूच्या टेबलवर बसलेल्या माझ्या सिनिअरने, ''का रे चहा पीत नाहीस?'' असे विचारले.'' मी मला कॉफी आवडते म्हणून सांगितले. तर तो मला कॉफी पिणाऱ्या ग्रुपमध्ये घेऊन गेला. त्यादिवसापासून मी कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये बसायला लागलो. त्यातूनच मला एक चांगला ग्रुप मिळाला. त्यांनी मला बोटींग ग्रुपमध्ये घेतले. नंतर अभ्यासात मदत केली आणि पदवीनंतर नोकरी मिळवण्यासाठीही मदत केली... हे सगळे घडले ते कॉफीच्या आवडीतून. 
- सुरेन हिरे, सातारा 


संवादाचं निमित्त... 
कॉफी... नुसतं असं म्हटलं तरी आजूबाजूला कॉफीचा सुगंध दरवळायला लागतो आणि मला तिची आठवण येते. मी माझ्या एका मैत्रिणीबरोबर एका महागड्या कॉफीशॉपमध्ये गेले होते. तिथं बसल्याबसल्या मी तिनं ऑर्डर केलेल्या कॉफीला मनसोक्त शिव्या घालत होते. ''काय इतकी महाग कॉफी कुठं असते का? आणि असली तरी तिला ना चव ना ढव. बरं इतके पैसे देऊनसुद्धा साखरपण आपणच टाकायची! छे! याला काय अर्थ आहे. लोक कशी ही कॉफी पिऊ शकतात वगैरे वगैरे.'' पण ती मात्र शांतपणे कॉफी यायची वाट पाहत होती. त्या काउंटरवरच्या वेटरनं तिचं नाव घेताच ती कॉफीचा ट्रे आणायला उठली. ''घे'' ती म्हणाली. या अनोळखी कॅफेमध्ये भयंकर चव असलेल्या कॉफीची चव एकदम माझ्या जिभेवर तरळून गेली. ''नको गं बाई मला ती बेचव कॉफी.'' माझ्या तोंडून पटकन निघून गेलं आणि मी तिच्याकडं पाहिलं. ती शांतपणे त्या कॉफीच्या मगाकडं पाहत कुठल्या तरी विचारत गढून गेली होती. ''सॉरी हं. पण मला खरंच नको अगं.'' मी म्हणाले. ''अगं नाही नाही. मी तुझ्या बोलण्यामुळं नाही शांत. डोक्यात खूप काही वेगळं सुरू आहे. जे सांगायचं आहे, पण सांगता येत नाही.'' ती म्हणाली. ''हे बघ, या कॉफीसारखंच नको असलेल्या वाईट विचारांना गिळून टाकायचं असतं आणि जे गिळता येत नाहीत असे विचार बोलून मोकळं व्हायचं.'' तेव्हा ती भरभरून बोलली... कॉफीबरोबर तिच्या मनात सुरू असलेली घालमेलसुद्धा संपली आणि माझ्या मनाला कोणाच्या तरी भावनांना मोकळी वाट करून दिल्याचं समाधानही मिळाळं. जेव्हा जेव्हा अशा कॉफीचा वास येतो ना, तेव्हा तेव्हा मला तिची आठवण येते... 
- सायली शिगवण, पुणे 


कॉफी म्हणजे बिस्मिल्ला खाँसाहेबांची सनई 
 बरेचजण चहाबाज असतात, तसा मी कॉफीबाज वगैरे मुळीच नाही. म्हणजे रोज सकाळी उठल्यावर रेडिओ लावल्याशिवाय सकाळच होत नाही, तसेच काहींना चहा घेतल्याशिवाय दिवस सुरू होत नाही असे वाटते. माझ्यासाठी कॉफी म्हणजे बिस्मिल्ला खाँसाहेबांच्या सनईसारखी आहे. रोज हवी असे नाही, पण जशी विशेष प्रसंगी ती असल्याशिवाय पूर्णता नाही. तसेच काहीसे कॉफीचे आहे. निवांत आहे, सुंदर माहोल आहे, निसर्ग त्याच्या सौंदर्याची उधळण करत आहे; अशा प्रसंगी कॉफी हवीच! त्याशिवाय त्या प्रसंगाला, त्या क्षणाला पूर्तता नाही. असाच एक प्रसंग आठवतो मला.. पावसाळा होता; आम्ही मित्र वरंधा घाटात फिरायला गेलो होतो. निसर्ग स्वर्गीय सुख अनुभवू देत होता. आमच्या गाड्या घाटाच्या निम्म्या रस्त्यात वाघजाई मंदिराजवळ थांबल्या. तिथली खेकडा भजी आमची भूक चाळवत आम्हाला खायचे निमंत्रण देत होत. आम्ही ते स्वीकारत भज्यांवर मनसोक्त ताव मारला, भजी झाली आता चहा हवा अशी मित्रांची इच्छा; सुदैवाने ती लगेच पूर्ण झाली. मला मात्र कॉफी हवी होती... तीही माझ्या पद्धतीने केलेली. ती काही तिकडे पूर्ण होऊ शकली नाही. माझ्या समोर दोन पर्याय होते. मित्रांबरोबर पुढे जायचे नाहीतर घरी येऊन मस्त कॉफी करून प्यायची.. पण दुसरा पर्याय मला अधिक जवळचा होता. पावसाचे कारण देत मित्रांनापण तयार केले, आम्ही माघारी फिरलो आणि मी घरी येऊन कॉफी करून प्यायलो. 
- रोहित वाळिंबे, भोर 


छंद लावणारी कॉफी 
'कॉफी' हा शब्द जरी ऐकला तरी एकदम रिफ्रेश व्हायला होतं आणि मग त्या मागोमाग येतात 'कॉफी आणि तिच्या खूप साऱ्या आठवणी'. माझी आणि कॉफीची ओळख तशी लहानपणापासूनच आहे. पण तेव्हा फक्त नेसकॉफी आणि ब्रु कॉफीच माहिती होती. मग कॉलेजमध्ये गेल्यावर फिल्टर कॉफी माहिती झाली आणि नकळत तीच सगळ्यात लाडकी झाली. वेगवेगळ्या प्रकारची कॉफी ट्राय करायची आणि आवडली की घरी आणायची हा छंदच आहे मला. आजही माझ्याकडं घरात ३-४ प्रकारच्या कॉफी आहेत. ही सवय मला माझ्या एका मैत्रिणीमुळं लागली. तीच मला पहिल्यांदा आमचा कॉफीवाल्यांचा 'स्वर्ग' म्हणता येईल अशा सीसीडीमध्ये घेऊन गेली होती. तिथली मोका, लाते, फ्रॅपे हे सगळे प्रकार ऐकून मी थक्क झालो होतो. कारण त्या आधी कॉफी इतक्या प्रकारात मिळते हे मला माहितीही नव्हतं. तरी आज माझी आवडती कॉफी म्हणाल, तर सगळ्यात आधी फिल्टर कॉफीचाच नंबर लागेल आणि मग सीसीडीमध्ये मिळणारी कॅफे फ्रॅपे. या दोन कॉफी मी अगदी कधीही पिऊ शकतो. सो भेटूया कधीतरी सीसीडीमध्ये, 
तोपर्यंत चीअर्स! 
- भूषण कुलकर्णी, मुंबई 


कॉफीच्या देशात 
विमानतळावर पाऊल ठेवलं. धावत-पळत, पुढचं विमान गाठायचं होते. सिक्युरिटी चेकपाशी प्रचंड मोठी रांग! मनात चलबिचल. अत्यंत उतावीळ अवस्थेत हा थांबा पार करून अस्मादिक पुन्हा एकदा जोशात ॲमस्टरडॅमच्या शिफॉल विमानतळावर ठरलेल्या गेटपाशी! तिथं भलत्याच विमानाची घोषणा ऐकली आणि लक्षात आलं काहीतरी गंडलंय! इतकावेळ, आजूबाजूचे लोक, वातावरण यांची राजसभा करून अर्जुनाप्रमाणं, एकच लक्ष ठेवून असलेल्या मला अचानक मोठा धक्का बसला! लंडनला जाणारी, सगळी पुढची विमानंच रद्द झालीयेत. माझ्या डोक्यावर ढगफुटी होतेय की काय असंच झालं. शांतपणे दोन खोल श्वास घेतले आणि ती मदतीला आली - ती कॉफी! खिशात काही युरोज, काही पौंड आणि एक कार्ड; जे चालत नाहीये याचीही तिथल्याच एका मशीननं वर्दी दिली. म्हटलं, हरकत नाही. 
एका चकचकीत हॉटेलमध्ये जाऊन, निवांतपणे कॉफी मागवली. माझ्या या थंडपणाला पाहून, तिथली सुंदरी चक्रावलीच! तिनं मला, ''संपूर्ण वातावरण खराब आहे. तू इथंच अडकलीयेस, याची कल्पना आहे का तुला?'' या आशयाचं एक भलंमोठं भाषण कॉफीसह फुकट दिलं! मी हसून, माझी कॉफी घेऊन तिथल्या पारदर्शक काचेजवळ जाऊन बसले. बाहेर धावपट्टी दिसत होती. संपूर्ण पांढऱ्याशुभ्र दाट बर्फाच्या, जाडसर चादरीत बुडालेली. माझ्या आणि कॉफीच्या गप्पा सुरू झाल्या. प्रत्येक घोटासह ती मला सांगत राहिली - वेलकम टू माय कंट्री! तिचा हात घट्ट धरला आणि बाहेरचा भुरभुरणारा बर्फ तिच्या वाफाळत्या वासासारखा मला मात्र मोहवत राहिला, आपलासा वाटत राहिला! तो कॉफीचा; तिच्याच रंगासारखा कप, मी आजही जपून ठेवलेला आहे! 
- डॉ. ऊर्जिता कुलकर्णी, पुणे 


...एक सुख!
माझ्यासाठी कॉफी म्हणजे सुख आहे. एक कप गरम कॉफी आणि थंड हवा बेस्ट आहे. मला चहापेक्षा कॉफी जास्त आवडते. कारण, कॉफी पिऊन जी एनर्जी मिळते, जे समाधान मिळते, ते चहा प्यायल्यावर नाही मिळत. ब्लॅक कॉफी माझी फेव्हरेट आहे, पण कधीकधी दुधामधलीपण चालते. दिवसातून दोन ते तीन कप कॉफी तर होतेच.
- शंतनू सोनलकर, डोंबिवली


आठवणींची साक्षीदार.. 
माझे कॉफीचे वेड लहानपणापासूनचे! अगदी वयाच्या पाचेक वर्षांपासून कॉफी पीत आहे. एक चहा पिणाऱ्यांचा आणि दुसरा म्हणजे कॉफी पिणाऱ्यांचा गट असे सर्वसाधारण दोन गट दिसतात. आता मला विचाराल की तू कोणत्या गटात, तर मी अगदीच कट्टर वगैरे नाही, पण हो मला निश्चितपणे कॉफी पिणाऱ्यांच्या गटात बसायला आवडेल. मला वाटते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कॉफी बदलत जाते. उदा. बालपणातली कॉफी वेगळी, शालेय जीवनातली कॉफी वेगळी आणि महाविद्यालयीन कॉफीही वेगळीच. प्रत्येक कॉफीला त्या त्या काळाची चव आहे. आता कॉफीचे प्रकार सांगायचे झाले, तर कित्ती प्रकारची कॉफी प्यायली आहे मी आजवर! नॉर्मल हॉट कॉफी, कोल्ड कॉफी, अमेरिकानो कॉफी, कॅपुचिनो लाते, कॅड-बी, कॅड-एम असे अनेक प्रकार माझे टेस्ट करून झालेत... आणि आणखीही करायचेत. तर माझ्या आजवरच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साक्षीदार म्हणून या कॉफीने मला सोबत केलीये! लव्ह यू कॉफी! 
- तेजस भागवत, पुणे


कॉफी म्हणजे फुरसतीचा मामला
निवांतपणाचे द्रव्यरूप प्यायचे असेल, तर त्याला कॉफी असे म्हणतात. घाईघाईत टपरीवर तरतरी यावी म्हणून उरकायचा तो विषय नाही. कॉफी म्हणजे फुरसतीचा मामला, टेस्ट क्रिकेटची मजा आहे त्यात. कॉफी पिऊन संपवण्यापेक्षा ती पितानाच्या प्रक्रियेत खरी मजा आहे. त्याचा तो आर्त सुगंध अनुभवत तो मुखात अलगद बहरणारा कडवटपणा अगदी व्यसन लावून जातो. 
फ्रेश क्रश्‍ड कॉफी, फिल्टरमध्ये गरम पाणी ओतून त्याचे डिकॉक्शन करणे असो किंवा इन्संट कॉफी बराच वेळ फेसाळ होईपर्यंत फेटत बसणे असो... किंवा मग जायफळ किसून उकळवणे असो... सगळा कसा रसिक आणि नाजूक मामला! ‘कॉफीला भेटू...,’ असं ठरल्यावर अनेक फिल्टर कॉफी रिचवत किमान एक प्रहर खर्ची घालवण्यात जी मजा आहे ना... 
थोडक्यात सांगायचं, तर 
कॉफी हा प्रवास आहे, ठिकाण नाही
जी चालण्यात मजा आहे, ती पोचण्यात नाही. 

- संकेत कुळकर्णी, पुणे

संबंधित बातम्या