जिकडे तिकडे गवत बागडे

डॉ. मंदार नि. दातार
सोमवार, 12 जुलै 2021

Dr. Mandar N. Datara
दखल    

सह्याद्री हा अनेक विशिष्ट वनस्पतींच्या उत्क्रांतीचे उगमस्थान आहे आणि इथेच या वनस्पतींच्या वंशाचे वेगात विविधीकरण होते आहे. त्यामुळे ‘इस्चिमम’ म्हणजे ‘नथनी गवत’ प्रजातीचा अभ्यास हाती घेताना, आपल्या भूमीतील एका वनस्पती गटाचे काम हातात घेत आहोत याबद्दल आनंद होता आणि नेमका हा प्रकल्प पुढे कसा जाणार याची उत्सुकताही होती.  

मी  वनस्पतिशास्त्र हा विषय माझ्या पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतला, त्यामागे इतर कशाहीपेक्षा निसर्गात फिरण्याची अनिवार इच्छाच जास्त होती. पुढे पीचडीसाठी गोव्यातील एका अभयारण्यात काम करायची संधी मिळाली तेव्हा मी तिथे मनमुराद भटकून घेतलं. आधी माहीत नसलेल्या वनस्पतींचा शोध दरवेळी नव्या उत्साहानं घेत राहिलो. फुलांचे रंग, गंध, आकार, परागीभवनासाठी त्यांनी केलेल्या अफाट युक्त्या, त्यांचा फुलण्याचा नेमका योजलेला हंगाम हे सारं निरखत राहिलो आणि निसर्गाच्या भव्य रंगमंचावर सपुष्प वनस्पतींनी रंगवलेले भन्नाट नाट्य दरवेळी अधिकाधिक भुरळ घालत राहिलं. आधी न पाहिलेल्या वनस्पती पाहायची ओढ नूतन प्रदेशांची भूल पाडत राहिली आणि नवे प्रदेश अजून आगळ्यावेगळ्या वनस्पती पेश करत राहिले. 

पण या सगळ्या वनस्पतींमध्ये माझ्याकडून अगदीच दुर्लक्षित राहिली ती म्हणजे विविध प्रकारची गवते. या दुर्लक्षामागे अनेक कारणं होती. एकतर गवतांना नजरेत भरणाऱ्या इतर फुलांसारखे ना रंग, ना गंध. त्यांची ओळख पटवणे, त्यांचं वर्गीकरण हे वनस्पतिशास्त्रज्ञांसाठीही किचकट वाटणारं काम. कारण गवतांचा नीट अभ्यास करायचा, तर तुमच्याकडे उत्तम दर्जाचं भिंग हवं किंवा सूक्ष्मदर्शक तरी हवाच. त्यात परत त्यांची ‘यत्र तत्र सर्वत्र’ असलेली उपस्थितीच ‘अतिपरिचयात अवज्ञा’ करायला लावणारी. त्यामुळे इतर वनस्पतींच्या साजशृंगाराचे कौतुक करता करता गवते सर्वात विपुल असूनही डोळ्याआड झालेली. सुरुवातीच्या काळात स्वतः प्रयत्न करून गवते ओळखण्यापेक्षा आसपासच्या तृणकुळाच्या तज्ज्ञ मंडळींकडून गवत ओळखून घेणं जास्त सोपं होतं. 

यात वळण आलं ते आघारकर संशोधन संस्थेमधून गवताळ कुरणांवरच्या एका संशोधन प्रकल्पाचे काम मी सुरू केलं तेव्हा. सबंध महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या या अभ्यासाचं स्वरूप हे गवताळ कुरणांमध्ये हळूहळू कमी होत चाललेल्या पशुखाद्य गवताच्या जाती आणि त्यामागची कारणं समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे होतं. अतिरिक्त चराई, दरवर्षी कुरणांमध्ये लागणाऱ्या किंवा लावल्या जाणाऱ्या आगींमुळे गवतांच्या जातीविपुलतेत कसा बदल होतो तेही समजून घ्यायचा प्रयत्न होता. पण या अभ्यासात खरी मेख होती, गवते स्वतःहून नीट ओळखायला शिकणे ही. आजवर जे टाळलं होतं ते हात पुढे करून समोर उभं होतं. मग मात्र हळूहळू गवते ओळखायच्या प्रयत्नांना सुरुवात केली. तासनतास सूक्ष्मदर्शकाखाली त्यांचा अभ्यास करून त्यांची गुणवैशिष्ट्ये समजून घ्यायचा प्रयत्न करू लागलो. याच दरम्यान आम्हाला पुण्याजवळच्या तळेगावमध्ये गवताची एक वेगळीच जात म्हणजे स्पिसी सापडली. इंग्रजीत ज्याला ‘मुरैना ग्रास’ किंवा शास्त्रीय नावाने ‘इस्चिमम’ म्हणतात, त्या प्रजातीमधलं हे गवत होतं. मुरैना ग्रासच्या एका जातीला मराठीत ‘नथनी’ असं फार गमतीदार नाव आहे. त्यामुळे ‘इस्चिमम’ला आम्ही ‘नथनी गवत प्रजाती’ म्हणायला सुरुवात केली होती. एखादी वनस्पती सापडली की तिची ओळख पटवण्यासाठी महत्त्वाचा मार्ग म्हणजे संदर्भग्रंथ हुडकणे. हे संदर्भग्रंथ म्हणजे पूर्वसुरींनी एखाद्या प्रदेशातील वनस्पतींचा सखोल अभ्यास करून, त्या प्रदेशासाठी वनस्पतींची करून ठेवलेली एक सूची. या सूचीला तांत्रिक परिभाषेत आम्ही म्हणतो ‘फ्लोरा’. पाहिलेल्या वनस्पतींची त्या फ्लोरात नोंदवलेल्या गुणवैशिष्ट्यांप्रमाणे ओळख पटवावी लागते. त्या लिखित वर्णनाशी पडताळून पाहण्यासोबतच, मान्यताप्राप्त वनस्पती नमुना संग्रहात, विविध वनस्पतींच्या आधीच संकलित केलेल्या नमुन्यांशी आपण जी वनस्पती ओळखायची आहे, ती ताडून बघावी लागते. आम्हाला तळेगावला सापडलेल्या गवताची ओळख पटवण्यासाठी आम्ही हे दोन्ही मार्ग अवलंबिले, तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्या गवताचे गुणधर्म आधी नोंदल्या गेलेल्या कुठल्याच गवत वनस्पतीशी जुळले नाहीत. मग आम्ही त्या नव्या गवताचे वर्णन करणारा, त्याच्या वेगवेगळ्या भागाची, फुलोऱ्याची तपशीलवार चित्रे आणि इतर माहिती देणारा एक शास्त्रीय निबंध लिहिला आणि त्या वनस्पतीला आमच्या संस्थेचे संस्थापक डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांच्या स्मरणार्थ ‘इस्चिमम आघारकरी’ असे नवे नाव दिले.  

इथूनच सुरू झाला गवतांमधली एखादी प्रजाती- ज्याला आम्ही शास्त्रीय परिभाषेत जीनस म्हणतो- तो घेऊन, त्याचा सविस्तर अभ्यास करायचा प्रयत्न. आधीच्या गवताळ कुरणांच्या अभ्यासापेक्षा हा अभ्यास एकदमच वेगळा होता. या अभ्यासात, एकाच प्रकारच्या वनस्पतीच्या वेगवेगळ्या जातींचे नमुने भारतभरातून जमा करून, त्यांचा सखोल अभ्यास करणे हा मुख्य भाग होता. ‘आसेतू हिमाचल’ पसरलेल्या भारतभूमीचा अफाट विस्तार आणि त्यामध्ये असलेली भूभागांची, प्रत्येक ठिकाणच्या पाऊसमानाची, मातीच्या प्रकारांची आणि एकुणातच हवामानाची विविधता, तिथल्या भागातील वनस्पतींचा आढळ आणि वितरण ठरवते. त्यामुळे एकच वनस्पती जरी वेगवेगळ्या भागात वाढत असली, तरीही वरील कारणांमुळे ती वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये दाखवू शकते. त्यामुळे एकाच वनस्पतीजातीच्या, वेगवेगळ्या प्रदेशातील वाढणाऱ्या नमुन्यांचा अभ्यास आपल्यापुढे त्या वनस्पतीचे खरे चित्र उभे करू शकतो. या कामासाठी आम्ही आधीपासूनच अभ्यासत असलेली ‘इस्चिमम’ ही वनस्पती प्रजाती निवडली. या निवडीमागे, या वनस्पतींच्या पूर्वपरिचयासोबत अजून एक कारण होते, ते म्हणजे या वनस्पतीच्या अनेक जाती प्रदेशनिष्ठ असण्याचे. प्रदेशनिष्ठ म्हणजे एका ठरावीकच प्रदेशात, भूभागात वाढणारे सजीव. इस्चिममच्या जगभरात ऐंशी जाती आढळतात. यातील तब्बल साठ जाती आपल्या देशाच्याच विविध भागांत वाढतात. विशेष म्हणजे यातील सत्तर टक्क्यांहून अधिक जाती आपल्या सह्याद्रीत आहेत. सह्याद्री हा अनेक विशिष्ट वनस्पतींच्या उत्क्रांतीचे उगमस्थान आहे आणि इथेच या वनस्पतींच्या वंशाचे वेगात विविधीकरण होते आहे. त्यामुळे ‘इस्चिमम’ म्हणजे ‘नथनी गवत’ प्रजातीचा अभ्यास हाती घेताना, आपल्या भूमीतील एका वनस्पती गटाचे काम हातात घेत आहोत याबद्दल आनंद होता आणि नेमका हा प्रकल्प पुढे कसा जाणार याची उत्सुकताही होती.  

मी वनस्पतींच्या वर्गीकरण शास्त्राचा अभ्यासक असल्याने माझे आजवरचे सारे काम हे वनस्पतींच्या बाह्यगुणांवरून त्यांची नावे ओळखणे याभोवतीच केंद्रित झालेले होते. भारतात अशा तऱ्हेचे कामच बहुतांश केले जाते. मात्र जगभरात गेल्या काही दशकात वनस्पतींच्या, आपल्या डोळ्यांनी दिसू शकणाऱ्या गुणवैशिष्ट्यांपलीकडे, त्यांच्या गुणसूत्रांचा अभ्यास करून, त्या त्या वनस्पतींच्या उत्क्रांतीवर काही प्रकाश पडतो का, हे पाहण्याचे प्रयत्न हळूहळू वेग घेत आहेत. वनस्पतींच्या वेगवेगळ्या जाती उत्क्रांत होताना, गुंफल्या जाणाऱ्या परस्पर संबंधांवर आधारित वंशावळी रचणे आणि त्यातून त्यांचे अापापसातील संबंध जोखणे, हा अभ्यास जागतिक पातळीवर कधीच केंद्रस्थानी आला आहे. काही वर्षांपूर्वी मानवी जनुकांचे नकाशे तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबद्दल तुम्ही वाचले ऐकले असेलच. वनस्पतींच्या बाबतीत केले जाणारे कामही हे तसेच काहीसे. मात्र पूर्ण जनुकांचा नकाशा तयार करण्याच्या भानगडीत न पडता, उत्क्रांतीच्या दरम्यान डीएनएच्या ज्या भागात खात्रीने काही बदल झाले आहेत, तो भाग निवडून, त्यांचाच आराखडा तयार करणे हे ते काम. भारतातील असे प्रयत्न मात्र फारच तोकडे आहेत. ‘इस्चिमम’ ऊर्फ ‘नथनी’ गवताच्या कामासाठी आम्ही पारंपरिक बाह्य रूपाच्या अभ्यासाच्या जोडीने, आधुनिक डीएनएवर आधारित वंशावळ तयार करण्याची योजना केली. त्यासाठी या डीएनए आधारित वंशावळीच्या कामात जाणकार असलेला माझा सहकारी मित्र डॉ. रितेश कुमार चौधरी हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग होता. आम्ही आमच्या संस्थेतील ज्येष्ठ संशोधक डॉ. शुभदा ताम्हनकर यांचेही या प्रकल्पासाठी मार्गदर्शन घेतले. आमच्यासोबत सारंग बोकील हा तरुण विद्यार्थी संशोधक या प्रकल्पावर रुजू झाला आणि आमच्या कामाचा श्रीगणेशा झाला. जागतिक पातळीवरच डीएनएच्या वंशावळीवरून ‘नथनी’ गवत प्रजातीचा अभ्यास पहिल्यांदाच होणार होता. ही आपल्या भूमीतील वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती होती आणि याचा आपणच कोणीतरी अभ्यास करण्याची गरज होती आणि आम्ही ते हातात घेत होतो. 

या अभ्यासाचा पहिला टप्पा होता ‘नथनी’ गवताच्या वेगवेगळ्या जातींचे संकलन. हे गवत पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात उगवते, हळूहळू मोठे होते, पावसाळा सरता सरता त्याला फुले येतात आणि हिवाळ्यात त्यांच्या फुलोऱ्यातून दाणे उधळले जातात. गवतांच्या फुलांना फुले म्हणण्याचे धाडस वनस्पती शास्त्राचे विद्यार्थीच करू जाणे, इतकी याची रचना क्लिष्ट आणि सूक्ष्म असते. हिवाळा, उन्हाळाभर हे उधळलेले दाणे मातीत पडून राहतात अन् पुढच्या पावसाळ्यात उगवतात. हे दाणे आपल्या ज्वारी, बाजरी, गहू यांच्या दाण्यांसारखेच असतात, कारण आपली ही सगळी धान्ये म्हणजे मुळात गवतेच आहेत. नथनी गवताच्या संकलनासाठी रितेश, सारंग आणि मी २०१७ सालापासून तीन वर्षे भारतात फिरलो. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडूमधील सह्याद्रीमध्ये मनमुराद भटकंती केली. मेघालय, मणिपूर यांसारखी ईशान्येकडची राज्येही पालथी घातली. तीन वर्षांत देशभर सर्वेक्षण करून आम्ही इस्चिममचे साडेतीनशेहून अधिक नमुने गोळा केले. 

पण आमच्यासाठी या अभ्यासातील खरे आश्चर्य दडले होते सिंधुदुर्गातील आंबोलीमध्ये. वनस्पती संकलनासाठी आंबोली आमचे एकदम आवडते ठिकाण. याच आंबोलीने आजवर आम्हाला अनेक नव्या वनस्पती दाखवल्या आहेत. वनस्पतींमधली अनेक गुपिते इथेच केलेल्या निरीक्षणातून उलगडली आहेत. वनस्पती वर्गीकरणातले फार कळायला लागले असे वाटले की आंबोलीला जावे, एखादे अजिबात ओळखता न येणारे झाड दिसावे आणि मग फुग्यातली हवा गेल्यासारखे जमिनीवर यावे असेही अनेकदा झाले आहे. २०१७ सालच्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, आम्ही आंबोलीच्या परिसरात याच नथनी गवताच्या शोधार्थ फिरत होतो. दिसला ओढा की त्यात उतरून त्यातले गवत बघ, पठारावर फिरून तिथल्या वनस्पती न्याहाळ, घाटामधल्या कड्याकपारीत या गवताचा शोध घे, कुरणांमध्ये पायपीट कर असा आमचा दिनक्रम होता. ही अनवट वाट पायाखालून घालत असताना आम्हाला, आजऱ्याकडून आंबोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, आंबोली गावाच्या अलीकडेच एका भातखाचरांमध्ये नथनी गवताची एक वेगळी जात दिसली. सोबतच्या भिंगातून पहिले असता तिचा वेगळेपणा चटकन लक्षात आला. अभ्यासण्यासाठी या गवताचे फुलोरे आणि डीएनएसाठी त्याची पाने जमा करून आम्ही त्या गवताचा विषय डोक्यात घेऊनच पुढे गेलो. दोन दिवस आणखी शोध घेतल्यानंतर, आम्हाला आंबोली घाटाच्या पायथ्याशी, एका ओढ्यामध्येही तेच गवत पुन्हा  मिळाले. तिथलेही नमुने आम्ही जमा करून पुण्याचा रस्ता धरला. आघारकर संस्थेत परत आल्यानंतर पुढचे सहाआठ महिने आम्ही त्या गवताचा सविस्तर अभ्यास केला. त्याच्या पानांमधल्या डीएनएचाही अभ्यास केला आणि जेव्हा आंबोलीत संकलित केलेली नथनी गवताची नवी जाती आहे हे समजले तेव्हा आनंदाने ‘युरेका, युरेका’ असे ओरडलो. 

आंबोलीने आजवर अभ्यासकांना खूप काही दिले आहे. अनेक नव्या वनस्पती, प्राणी, साप, बेडकांच्या जाती अभ्यासकांनी आंबोली परिसरातून शोधल्या आहेत. आंबोली परिसरातूनच खेकड्यांच्या, कोळ्यांच्या, माशांच्या अनेक अनोख्या जाती प्रकाशात आल्या आहेत. त्यामुळे निसर्ग अभ्यासकांमध्ये आंबोलीविषयी अपार प्रेम आहे. पण आजवर आंबोलीच्या नावाने तिथेच मिळालेल्या नव्या सजीवजातीचे नामकरण करण्याची कल्पना कोणा अभ्यासकाच्या मनात आली नव्हती. ही उणीव भरून काढण्याचा एक प्रयत्न आम्ही या अभ्यासातून केला आणि नव्या गवताला ‘इस्चिमम आंबोलीएन्स’ असे नाव दिले. या संशोधनावर आधारित आमचा संशोधन निबंध न्यूझीलंडमधील ‘फायटोटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये मे महिन्यात प्रसिद्ध झाला. नथनी गवत प्रजातीच्या जमा केलेल्या साऱ्या नमुन्यांवर अजूनही काम चालू आहे, पण आंबोलीतील नव्या गवतामुळे आमच्या टीममध्ये भलताच उत्साह संचारला आहे. 

गवते हा बहुतांकडून कायमच दुर्लक्षित राहणारा वनस्पतीगट आहे. पण गवताचे मानवी अस्तित्वासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. भविष्यात उद्‍भवू शकणाऱ्या, जागतिक तापमानवाढीच्या संकटात ही गवतेच आपल्याला तारून नेऊ शकतील, असे देशोदेशीचे अभ्यासक सांगतात. त्यादृष्टीने दुर्गम भागात आणि विषम परिस्थितीत वाढणाऱ्या अनेक प्रदेशनिष्ठ गवतांचा अभ्यास करण्याची, त्यांच्याविषयी माहिती असण्याची, आणि त्यांच्या संवर्धनाचीही गरज आहे. गवतांमध्ये सामान्य माणसाला फारसे काही सौंदर्य दिसणार नाही, पण आम्हा अभ्यासकांना ती अक्षरशः दिग्मूढ करतात. ती जेवढी कोड्यात पाडतात, तेवढीच अपार सौंदर्याची अनुभूती देतात. जेवढी त्यांच्या वैशिष्ट्यांनी विस्मित करतात, तेवढीच साधेपणाने मोहवून टाकतात. त्यामुळेच गवते पहिली की बोरकरांच्या कवितेतील गवत भरलेल्या भिंतीची जी अवस्था होते तीच बरेचदा आम्हा अभ्यासकांचीही होते...  

जिकडे तिकडे गवत बागडे 
कुठे भिंतीच्या चढे कडेवर 
ती म्हातारी थरथर कापे 
सुखासवे होउनी अनावर

(लेखक आघारकर संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञ आहेत.)

संबंधित बातम्या