यंगेस्ट ‘पर्सन ऑफ द इयर’

इरावती बारसोडे
सोमवार, 23 डिसेंबर 2019

दखल
 

‘टाइम’ नियतकालिकाने ग्रेटा थनबर्गला ‘पर्सन ऑफ द इयर २०१९’ चा किताब दिला आहे आणि तिचे छायाचित्र टाइमच्या मुखपृष्ठावर झळकले आहे. टाइमतर्फे ‘पर्सन ऑफ द इयर’ निवडण्याची प्रथा १९२७ पासून सुरू आहे आणि एवढ्या वर्षांमध्ये ग्रेटा हा मान मिळवणारी आत्तापर्यंतची वयाने सर्वांत लहान व्यक्ती आहे.

ग्रेटाची २०१९ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठीही शिफारस करण्यात आली होती. पण ही ग्रेटा आहे तरी कोण? आणि अगदी लहान वयात ती टाइमसारख्या अग्रगण्य नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचे कारण तरी काय? तर, ग्रेटा थनबर्ग ही फक्त १६ वर्षांची युवा पर्यावरणवादी कार्यकर्ती आहे. ती मूळची स्वीडनची आहे. अगदी लहान असताना तिला पर्यावरण, हवामान बदल, तापमान वाढ यांसारख्या प्रश्‍नांनी भंडावून सोडले. त्यातूनच ती कृती करण्यास उद्युक्त झाली. 

वयाच्या आठव्या वर्षी शाळेमधून तिला हवामान बदलाविषयी पहिल्यांदा माहिती मिळाली. तिने त्या विषयाच्या खोलात जायचे ठरवले आणि ती यासंबंधी जी माहिती मिळेल ती आत्मसात करू लागली. जसजशी तिच्या ज्ञानात भर पडत गेली, तसतशी ती दुःखी होऊ लागली. ती अबोल झाली. अकराव्या वर्षी ती कमी जेवायला लागली. यातून तिला ॲसपर्जर सिंड्रोम, ऑबसेसिव्ह कंपलसिव्ह डिसऑर्डर आणि सिलेक्टिव्ह म्युटिझम यांसारखे आजार जडले. मराठीत सांगायचे, तर विषण्णतेमुळे स्वमग्नता! पण शांत बसून फायदा होणार नाही हे उमजून तिने बोलायला सुरुवात केली आणि कृती करायलाही. कार्बन फूटफ्रिंट वाढू नये म्हणून तिने शाकाहारी होण्याचे ठरवले. तिने विमानाने प्रवास करणे सोडून दिले. एवढ्यावरच ती थांबली नाही, तिने आपल्या आईवडिलांनाही हेच करण्यास भाग पाडले. तिचे वडील स्वांते थनबर्ग हे अभिनेते आहेत आणि आई मलेना एर्नमन या ओपेरा गायिका आहेत. त्यांना आपल्या कामासाठी वारंवार विमान प्रवास करावा लागत होता, पण मुलीच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला. 

नुसते एवढे करून भागणार नाही. इतरांनाही सामील करून घ्यावे लागेल हे जेव्हा तिच्या लक्षात आले, तेव्हा २० ऑगस्ट २०१८ रोजी तिने शाळेला बुट्टी मारली आणि ‘हवामानासाठी शाळा बंद’ असा फलक घेऊन एकटीच संसदभवनासमोर जाऊन बसली. त्यावेळी स्वीडनचे संसदीय अधिवेशन सुरू होते. तिने आपल्या मित्रमंडळींनाही आपल्याबरोबर येण्याचा आग्रह केला होता. पण, कोणीच तयार होत नाही म्हटल्यावर ती एकटीच तिथे जाऊन बसली. अर्थातच घरच्यांनीही तिला यापासून परावृत्त करण्याचा कसोशीने प्रयत्न केले, पण ग्रेटा आपल्या निर्णयावरून ढळली नाही. संसदसदस्यांचे लक्ष वेधण्यासाठी ती सकाळी ८.३० ते दुपारी तीन तिथे बसून राहिली. तिची मागणी एवढीच होती, ‘नुसते बोलू नका, कृती करा!’ पहिल्या दिवशी तिच्याकडे कोणी लक्षही दिले नाही, मात्र दुसऱ्या दिवसापासून लोक तिच्याभोवती जमा होऊ लागले, तिला प्रश्‍न विचारू लागले. नंतर तिने ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ ही मोहीम सुरू केली आणि दर शुक्रवारी शाळेला दांडी मारून स्वीडिश संसदभवनासमोर आंदोलन करू लागली. लवकरच ही एक जागतिक मोहीम झाली आणि #FridaysForFuture या हॅशटॅगसह लोकप्रिय झाली. तेव्हापासून ग्रेटा हवामान बदलाविरोधात बोलणारा एक खणखणीत आवाज ठरली आणि लोकही तिचे ऐकू लागले. लाखो लोक या मोहिमेत सहभागी झाले. जगातल्या अनेक देशांमध्ये हे आंदोलन पोचले. टाइम नियतकालिकानुसार, गेल्या १६ महिन्यांत ग्रेटा संयुक्त राष्ट्रसंघांच्या बैठकांना उपस्थित राहिली आहे, पोपला भेटली आहे, अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबर भांडली आहे आणि २० सप्टेंबर रोजी झालेल्या जागतिक हवामान आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी ४० लाख लोकांना तिने प्रेरणा दिली आहे. कुठेही गेली, तरी जागतिक नेत्यांनी हवामान बदलाविरोधात आणि पर्यावरण संवर्धनासाठी ‘कृती’ करण्याची गरज आहे. आमच्या पिढीचे भविष्य धोक्यात आहे, हेच ती वारंवार ठासून सांगते. 

काहीजणांचा तिला विरोधही आहे. ती करते आहे ते योग्य नाही, असे म्हणणाऱ्यांमध्ये ब्राझिलचे अध्यक्ष जेअर बोलसनॅरो, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्हाल्दिमिर पुतिन यांसारख्यांचाही समावेश आहे. 

तिने दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येही भाषण केले. माद्रिदमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सीओपी२५ हवामान बदल शिखर परिषदेलाही ती उपस्थित होती. जागतिक नेते पळवाटा शोधण्यासाठी वाटाघाटी करीत असल्याचा आरोप तिने यावेळी केला होता. सप्टेंबर महिन्यामध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेल्या हवामान परिषदेमध्ये केलेले भाषणही गाजले. ती म्हणाली होती, ‘तुमच्या नुसत्या पोकळ शब्दांनी तुम्ही माझी स्वप्ने आणि माझे बालपण हिरावून घेतले. आमचे तुमच्याकडे लक्ष आहे.’ विशेष म्हणजे या परिषदेला जाण्यासाठी तिने बोटीने प्रवास केला होता. 

संबंधित बातम्या