कलरफुल सरबते!

मनाली पालकर
सोमवार, 25 मे 2020

कव्हर स्टोरी
उकाडा जाणवू लागला, की आपण चहा-कॉफीसारख्या गरम पेयांऐवजी शहाळ्याचे पाणी आणि निरनिराळ्या सरबतांना  प्राधान्य देतो. त्यामुळे सतत लागणारी तहानही भागते आणि  सरबत प्यायल्याने  थोडी एनर्जीही  मिळते.  घरच्याघरी  लिंबू, स्ट्रॉबेरी, किवी, अननस, टरबूज, कलिंगड या  फळांपासून  वेगवेगळ्या चवीची रंगीबेरंगी  सरबते  काही मिनिटांत  करता येतात. बाजारात मिळणाऱ्या  कृत्रिम सरबतांपेक्षा घरी तयार केलेली ही  नैसर्गिक चवीची सरबते  नक्कीच जास्त अयोग्यदायी आहेत; शिवाय करायलाही अगदी सोपी असतात. सरबताच्या अशाच काही रेसिपीज...

स्ट्रॉबेरी लेमोनेड
साहित्य : एक कप  स्ट्रॉबेरीचे  तुकडे, १५-२० पुदिन्याची  पाने,  अर्धा  कप लिंबाचा रस, 
१  कप थंड पाणी. 
शुगर  सिरपसाठी : पाऊण  कप साखर, पाऊण  कप पाणी.
सर्व्हिंगसाठी : बर्फाचे  तुकडे, सोडा किंवा थंड पाणी.
कृती : प्रथम एका पातेल्यात साखर आणि पाणी घेऊन ते मध्यम आचेवर ५  ते  १० मिनिटे ठेवून याचे सिरप  करून घ्यावे. आता एका जारमध्ये स्ट्रॉबेरीचे तुकडे आणि पुदिन्याची पाने घालून एका लाकडी दांड्याने हलकेच दाबून घ्यावे, जेणेकरून  त्यातून थोडासा रस निघेल. नंतर यात आधी केलेले शुगर सिरप, लिंबाचा रस आणि थंड पाणी घालून मिश्रण ढवळून घ्यावे. आता एका ग्लासमध्ये  बर्फाचे  तुकडे, वरील मिश्रण आणि थंड पाणी किंवा सोडा घालून हे सरबत सर्व्ह करावे.

मसाला लिंबू सरबत
साहित्य : एक लिंबाचा रस, चवीनुसार साखर, अर्धा चमचा साधे मीठ, अर्धा चमचा काळे मीठ, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा काळी मिरीपूड, १ ग्लास पाणी किंवा सोडा, बर्फाचे तुकडे. 
कृती : एका ग्लासमध्ये लिंबाचा रस व साखर विरघळवून घ्यावी. नंतर त्यामध्ये साधे मीठ, काळे मीठ, धनेपूड, जिरेपूड, मिरपूड घालून घ्यावी व चांगले ढवळून घ्यावे. आता त्यात पाणी व बर्फाचे तुकडे घालून तयार मसाला लिंबू सरबत सर्व्ह करावे.

मिंट  मेलन हेवन 
साहित्य : चार कप खरबुजाचे तुकडे, २  मोठे चमचे लिंबाचा रस, १  चमचा साखर, मूठभर पुदिन्याची पाने, १  कप थंड पाणी, बर्फाचे तुकडे. 
कृती : प्रथम खरबुजाचे तुकडे मिक्सरमधून फिरवून घ्यावेत. आता हा गर गाळण्यातून गाळून त्याचा ज्यूस काढून घ्यावा. नंतर  एका भांड्यात पुदिन्याची पाने क्रश करून त्यात साखर व लिंबाचा रस घालून नीट ढवळून घ्यावे. आता त्यामध्ये खरबुजाचा ज्यूस आणि थंड पाणी घालून मिश्रण ढवळून  घ्यावे. एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे आणि वरील मिश्रण घालून सरबत सर्व्ह करावे.

फनी किवी
साहित्य : दोन किवी, १  चमचा लिंबाचा रस, १  चमचा आल्याचा रस, अर्धा चमचा काळे  मीठ, चिमुटभर चाट मसाला, पाव चमचा रेड चिली फ्लेक्स,  ३  चमचे साखर (चवीनुसार), बर्फाचे तुकडे. 
कृती : किवीची साले काढून फोडी करून घ्याव्यात. नंतर  मिक्सरच्या भांड्यात या फोडी, साखर, काळे  मीठ, आल्याचा रस  व लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव वाटून  घ्यावे. आता हे मिश्रण गाळण्यातून दाबून गाळून ज्यूस काढून घ्यावा. नंतर  एका ग्लासमध्ये  बर्फाचे  मोठे खडे घालून त्यावर हा ज्यूस ओतावा व त्यावरून  चिली फ्लेक्स टाकून व चाट मसाला भुरभुरून सरबत सर्व्ह करावे.

पायनॅपल मोयीतो 
साहित्य : अननसाचे ३-४ छोटे तुकडे,  अर्धी वाटी अननसाचा  रस, पाव वाटी द्राक्षांचा रस, १  चमचा लिंबाचा रस, २  चमचे शुगर सिरप, अर्धा चमचा मीठ, बर्फ, ५-६  पुदिन्याची पाने आणि  सोडा. 
कृती : एका भांड्यात अननसाचे तुकडे आणि पुदिन्याची पाने घेऊन एका लाकडी दांड्याने क्रश करून  घ्यावे (त्यातून रस निघाला पाहिजे). आता यामध्ये अननसाचा रस, द्राक्षांचा रस, लिंबाचा रस, शुगर सिरप, मीठ घालून सर्व मिश्रण नीट ढवळून घ्यावे. आता एका ग्लासमध्ये  क्रश केलेला बर्फ घालून वरील ज्यूस त्यावर ओतावा.  त्यात गरजेनुसार सोडा घालावा आणि वर लिंबाची पातळ स्लाइस व पुदिन्याची पाने घालून हे सरबत सर्व्ह करावे.
टीप : द्राक्षांचा रस करण्यासाठी १  कप द्राक्षे आणि पाव कप पाणी व पाव चमचा काळे  मीठ मिक्सरवर फिरवून घ्यावे. नंतर गाळण्यातून हा रस दाबून गाळून घ्यावा.

पिना  कोलाडा 
साहित्य : एक कप अननसाचा रस, १  कप नारळाचे  घट्ट दूध,  अर्धा स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम (ऐच्छिक), १  चमचा लिंबाचा रस, चवीनुसार साखर, चिमूटभर  मीठ, बर्फाचे तुकडे. 
कृती : प्रथम अननसाचा रस, लिंबाचा रस, साखर व मीठ एकत्र करून चांगले  ढवळून घ्यावे. आता मिक्सरच्या जारमध्ये  वरील मिश्रण, नारळाचे दूध, व्हॅनिला  आइस्क्रीम, ३-४ बर्फाचे  तुकडे घालून चांगले एकजीव करून घ्यावे. आता  एका ग्लासमध्ये  बर्फाचे तुकडे घालून त्यावर हा रस ओतून तयार  पिना कोलाडा सर्व्ह करावा.

ऑरेंज पायनॅपल पंच
साहित्य : एक वाटी संत्र्याचा रस, १  वाटी अननसाचा रस, १ चमचा लिंबाचा रस, १  चमचा साखर, २  चमचे मध, अर्धा चमचा मीठ, चिमूटभर  चाट मसाला, अननस, संत्री व लिंबाच्या  फोडी, ४-५  पुदिन्याची पाने, बर्फाचे तुकडे. 
कृती : एका भांड्यात संत्र्याचा रस, अननसाचा रस, लिंबाचा रस, साखर, मध, मीठ घेऊन नीट ढवळून घ्यावे. आता एका ग्लासमध्ये  पुदिन्याची पाने, अननस व संत्र्याच्या प्रत्येकी  २  ते  ३ फोडी व लिंबाची  १ छोटी पातळ फोड घालून लाकडी दांड्याने २  ते  ३ वेळा हलकेच दाबून घ्यावे. आता त्यात बर्फाचे तुकडे टाकून आधी तयार केलेला ज्यूस घालून सर्व्ह करावे.

कुकुंबर कूलर 
साहित्य : एक काकडी, २  चमचे द्राक्षांचा रस, १  चमचा लिंबाचा रस, २  चमचे साखर, पाव चमचा काळे  मीठ, ७-८ पुदिन्याची पाने आणि  बर्फाचे तुकडे. 
कृती : काकडी सोलून तिच्या फोडी करून  घ्याव्यात. आता मिक्सरच्या भांड्यात  काकडीच्या फोडी, मीठ, साखर, पुदिन्याची पाने, द्राक्षाचा व लिंबाचा रस घालून वाटून घ्यावे.  वाटलेले हे मिश्रण आता  गाळण्यातून गाळून घ्यावे. आता पूर्ण ग्लासमध्ये  बर्फाचे  तुकडे भरून त्यावर हा ज्यूस ओतावा व सर्व्ह करावा.

इन्स्टंट पन्हे  
साहित्य : एक  पिकलेली कैरी (मऊ आणि आतून पिवळी झालेली असावी),  शुगर सिरप किंवा गुळाचे सिरप चवीनुसार,  अर्धा चमचा साधे मीठ,  पाव चमचा काळे  मीठ, अर्धा चमचा वेलचीपूड,  पाव चमचा काळी मिरीपूड,  गरजेनुसार थंड पाणी, बर्फाचे तुकडे आणि  तिखट मीठ लावलेली कैरीची फोड. 
कृती : पिकलेल्या कैरीची साले काढून फोडी करून  घ्याव्यात. नंतर  मिक्सरमधून फोडी किंचित पाणी घालून वाटून घ्याव्या. आता एका ग्लासमध्ये  बर्फाचे तुकडे टाकून त्यावर हे मिश्रण ओतावे. नंतर साधे  मीठ, काळे  मीठ, शुगर सिरप, मिरपूड, वेलचीपूड घालून चांगले  ढवळून घ्यावे आणि वर तिखट-मीठ लावलेली कैरीची फोड ठेवून पन्हे  सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या