भविष्यवेधी साहित्यिकः दामोदर मावजो

दत्ता दा. नायक
सोमवार, 20 डिसेंबर 2021

नोंद    

बहुतेकवेळा साहित्यिक भूतकाळाच्या स्मरणरंजनात मग्न असतात. काही साहित्यिक वर्तमानकाळाकडे एवढ्या मोठ्या बहिर्गोल भिंगातून पाहतात की त्यांना ना भूतकाळ दिसतो ना भविष्यकाळ. वर्ष २०२१साठीचा मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले कोकणी भाषेतून लिहिणारे भारतीय साहित्यिक दामोदर मावजो ह्या दोन्ही वर्गवारीत बसत नाहीत. दामोदर मावजो हे काळाच्या खूप पुढे, भविष्यकाळाच्याही भविष्यकाळात वावरणारे द्रष्टे साहित्यिक आहेत. 

माजोर्डा ह्या गोव्याच्या किनारपट्टीवरील छोट्या ख्रिश्चनबहुल खेड्यात दामोदर मावजो राहतात. ‘मी अर्धा हिंदू आणि अर्धा ख्रिश्चन आहे,’ असे मावजो मानतात. भारतीय संस्कृती एकवचनी नाही. ती बहुवचनी आहे. भारतीय संस्कृतीचे हृदय जेवढे हिंदूचे आहे, तेवढेच मुसलमानांचे आहे, तेवढेच ख्रिश्चनांचे आणि शिखांचे आहे, तेवढेच बौद्ध आणि जैनांचे आहे. ह्या बहुरंगी, बहुपदरी भारतीय संस्कृतीचा हा पुत्र आहे. हा पुत्र पराधीन नाही. बुद्धांचा ‘आत्मदिपो भव’ हा मंत्र पुकारणारा हा भरतभूमीचा शिलेदार आहे. भारतीय संस्कृतीत जे जे उज्ज्वल आहे, उदात्त आहे, सत्य, सुंदर, शिव आहे, त्याचा दामोदर मावजो हा दृश्यावतार आहे.

अस्मिता आणि सहिष्णुता ह्या बऱ्याचदा परस्परविरोधी संकल्पना म्हणून एकामेकांपुढे येतात. अस्मितेचा अतिरेक होतो तेव्हा सहिष्णुतेचा क्षय होतो आणि सहिष्णुता वरचढ झाली तर तिच्या वजनाखाली अस्मिता चेपून जाते. एकेकाळी मराठीची बोली म्हणून हेटाळणारी होणारी कोकणी ही स्वतंत्र भाषा आहे, गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण होऊ नये, गोव्याला स्वतंत्र राज्याचा अधिकार मिळाला पाहिजे, कोकणी भाषा गोवा राज्याची राजभाषा झाली पाहिजे, ह्याचा पुरस्कार करणाऱ्या व गोव्याची अस्मिता जपणाऱ्या कोकणी चळवळीत दामोदर मावजो अग्रणी होते, पण ह्या चळवळीने बिगर गोमंतकीय विरोधी रूप घेऊ नये  आणि गोव्याच्या परंपरागत, सर्वसमावेशक सहिष्णुतेला तडा जाऊ नये, हे भान दामोदर मावजोंसारख्या समतोल विचाराच्या विचारवंताकडे होते. त्यामुळेच अखिल भारतीय परिप्रेक्ष्याला छेद देणारे विचार गोव्याच्या मातीत रुजले नाहीत.

मावजोंच्या वैचारिक निष्ठा सुस्पष्ट आहेत. मावजो ‘कट्टर’ नास्तिक आहेत. धर्म ही संस्था केवळ वैयक्तिक जीवनात ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे मर्यादित असावी, धर्माने सामाजिक, राजकीय क्षेत्रात ढवळाढवळ करू नये, अशी निधर्मी संकल्पना ते आग्रहाने मांडतात. मावजो जातिव्यवस्थेवर अनेकदा तुटून पडले आहेत. धर्मांध, मूलतत्त्ववादी (फंडामेंटलिस्ट) विचारांबाबत आणि अशा विचारांचा व्हायरस पसरवणाऱ्या संस्थांबाबत ते आक्रमक झाले, तेव्हा त्यांना धमक्या येऊ लागल्या. गोव्याच्या गृहखात्याला मावजोंच्या जीविताला धोका आहे हा सुगावा लागला. त्यामुळे गेली तीन वर्षे मावजोंना पोलिस संरक्षण आहे. 

दामोदर मावजो कधीच साहित्याची मखमली शाल पांघरून उंच, हस्तिदंती मनोऱ्यात बसले नाहीत. गोव्याच्या जमिनीकडचे आपले ‘अर्थिंग’ त्यांनी तोडले नाही. निळ्या नभात उडत उडत क्षितिजाला गवसणी घालणारे पंख जसे दामोदर मावजोंना आहेत तशीच धरतीच्या मातीतले जीवनसत्व शोषणारी मुळे आहेत. दामोदर मावजो हे पंख आणि मुळे असलेले झाड आहे. वसंतात गच्च फुलणारी पुष्पखचिता, पुष्पमंडिता त्यात आहे. पानगळीत पानांचा हिरवाकंच वेष उतरवणारी निष्पर्ण, निष्फुल नम्रता त्यात आहे. 

दामोदर मावजोंचे साहित्य हा गोमंतकीय लोकजीवनाचा आरसा आहे. अरबी समुद्रात रांपण टाकून ताज्या, फडफडीत माशांनी भरलेली जड रांपण किनाऱ्यावर ओढणारे राकट देहयष्टीचे खारवी त्यांच्या साहित्यात आहेत, तसेच पहाटे, पहाटे सूर काढण्यासाठी माडावर चढता चढता कांतार म्हणणारे रेंदेर त्यात आहेत. मध्यरात्री उठून खोर्न पेटवून गरमागरम, कुरकुरीत उंडे भाजणारे पोदेर जसे त्यांच्या साहित्यात येतात, तशाच नोकरीसाठी अरबी देशात जाणाऱ्या आणि अरबांनी केलेले लैंगिक अत्याचार असहाय्यतेने सोसणाऱ्या स्त्रिया मावजोंच्या साहित्यात आहेत. ख्रिस्ताचा प्रेम आणि करुणेचा संदेश रविवारच्या मिसांतून सांगणारे पाद्री जसे मावजोंच्या कथांत भेटतात तशाच गोड, रसाळ कलिंगडाची लागवड करणाऱ्या शेतकरणीही त्यात भेटतात. 

दामोदर मावजोंच्या कथांत माणूस आणि सैम (निसर्ग) यांतले द्वैत नाहीत. सभोवतालचे माड, अंगांग फुलणारा चाफा, पिवळ्या, पक्व केळींनी अलंकृत झालेली केळ, जाय, जूय, मोगरा, रतनआबोली, शेवंती, जास्वंद ही फुले, चिमण्या, पोपट, साळोऱ्या हे पक्षी, अंगणात खेळणारी चानी (खार), गोठ्यात हंबरणारी गाय, तळ्यात डुंबणारी म्हैस ही सगळी निसर्गाची मुले मानवी रूप धारण करून त्यांच्या कथांत येतात. मानवाचे निसर्गीकरण आणि निसर्गाचे मानवीकरण करण्यात मावजो पटाईत आहेत. 

दामोदर मावजोंनी आपल्या कथा व कादंबरीतून केलेले ख्रिश्चन समाजाचे चित्रण एवढे अस्सल आहे की खुद्द ख्रिश्चन लेखकांना आपल्या समाजाचे असे प्रत्ययकारी चित्रण करणे जमलेले नाही. सिद्धहस्त साहित्यिकाला परकायाप्रवेशाची कला अवगत असली पाहिजे. दामोदर मावजोंना ही कला अवगत आहे. म्हणून ढगांवर लिहिताना ते स्वतःच ढग होतात. दर्यावर लिहिताना आपणच दर्या (समुद्र) होतात. गरीब मुंडकाराच्या (कूळ) नजरेतून श्रीमंत भाटकाराकडे (जमीनदार) पाहतात आणि गरीब मुंडकाराकडे पाहताना आपणच श्रीमंत भाटकार होतात. 

दामोदर मावजोंच्या कथातील पात्रे कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे लेखकाच्या आज्ञेनुसार वागत नाहीत. ती स्वतंत्र असतात, स्वयंभू असतात, सेंद्रिय असतात. लेखक दामोदर मावजोही आपल्या पात्रांना कसल्याच बंधनात अडकवत नाहीत. लेखक कथा सांगत नाही. कथेतील पात्रेच कथा सांगतात असा अनुभव येतो. 

सुखी आणि सुखासीन माणूस साहित्यनिर्मिती करू शकत नाही. साहित्य हा मानवी जीवनातील दुःखाचा उत्सव असतो. म्हणून साहित्याची समीक्षा करताना चिकित्सक साहित्यिक ‘व्हेअर आर द वुण्डस्?’ असा प्रश्न विचारतात. अनेक वर्षापूर्वी दामोदर मावजोंचे आजोबा अचानक घरातून निघून गेले. ते कुठे गेले, का गेले हे कुणालाच कळले नाही. ते कधीच परत आले नाहीत. दामोदर मावजोंच्या बालमनावर ह्या घटनेचा ओरखडा उठला असेल. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. जीवनाची गाडी सुरळीतपणे हमरस्त्यावर येते, तेवढ्यात दामोदर मावजोंना कॅन्सर झाला. केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर मावजो ह्या दुखण्यातून बाहेर पडले. आपल्या गावातल्या गरिबांची हतबलता त्यांनी पाहिली. असहाय्यता पाहिली. कधी स्वेच्छेने तर कधी परिस्थितीवशात जोगीण होणाऱ्या ऐन तारुण्यातील मुलीची तडफड त्यांनी आपल्या ‘तिसऱ्या डोळ्या’ने पाहिली. फेणीने तर्र होऊन स्वतःशीच बोलणाऱ्या दारूड्याचे मन हेलावणारे स्वगत त्यांनी ऐकले. मानवी जीवनाचा अर्थ काय? मानवी जीवनात दुःख का असते? हे प्रश्न गौतम बुद्धांनाच पडले नाहीत, तर कोणत्याही संवेदनशील, सहृदय साहित्यिकालाही हे न सोडवता येणारे प्रश्न पडतात. दामोदर मावजो वाचकाला सनातन मानवी दुःखाच्या तळाशी नेतात. ते उत्तरे सांगत नाहीत. मुळात ही उत्तरे कोणालाच माहीत नाहीत. दामोदर मावजो वाचकाला प्रश्नाचे आकलन करून देतात. जीवनातील दुःखाच्या जखमा आणि ह्या जखमांचे व्रण त्यांच्या साहित्यात पावलोपावली दिसतात. 

सकारात्मक पातळीवर दामोदर मावजोंच्या साहित्यात उच्च, उच्चतर, उच्चतम मानवी मूल्यांचा उद्घोष आहे. स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मानवी मूल्य आहे असे ते मानतात. स्वातंत्र्यापाठोपाठ विज्ञाननिष्ठा, समता आणि निधर्मी विचार आणि आचार ह्याचा ते पुरस्कार करतात. अजंठाची लेणी, खजुराहोची मंदिरे, ताजमहाल, गोलघुमट, सांचीचा स्तूप, चारमिनार उभारणाऱ्या आपल्या देशातील सौंदर्यदृष्टी कमी होत चालली आहे असे त्यांना वाटते. आपल्या सांस्कृतिक अभिरुचीला ओहोटी येत चालली आहे. आपली कला कारागिरीकडे वळते आहे. साहित्य मनोरंजनाकडे झुकत आहे. तत्त्वज्ञान अध्यात्माकडे वळले आहे. धर्माने नैतिकतेचा आग्रह सोडला आहे. आपले सर्वांगिण जीवन दिवसेंदिवस कुरूप होत चालले आहे. विद्रूप होत चालले आहे. बुटके होत चालले आहे. समाजात बोन्सायीकरणाची फसवी प्रक्रिया चालू आहे. 

अशा परिस्थितीत बोथट झालेले समाजमन अधिक संवेदनशील व्हावे, समाजातली सौंदर्यदृष्टी जोपासावी, सामूहिक जीवनातला विवेक बळकट व्हावा यासाठी दामोदर मावजोंसारखे भारतीय लेखक झटत आहेत. 

दामोदर मावजो हा गाभाऱ्यातल्या बंदिस्त काळोखात मंदपणे तेवणारा लामणदिवा आहे!

(लेखक साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक आहेत.)

 

संबंधित बातम्या