फुलपाखरांची मराठमोळी ओळख

इरावती बारसोडे
सोमवार, 9 डिसेंबर 2019

नोंद
 

ढवळ्या, पवळ्या, भटक्या, गोलू... बैलांची किंवा उनाड, टवाळ पोरांची नावं वाटतायत ना? पण नाही, ही मुलांची किंवा बैलांची नावं नाहीत. ही आहेत रंजक, चित्तवेधक अन् रंगीबेरंगी फुलपाखरांची नावं, अर्थात त्यांची नवी ओळख! हो, महाराष्ट्राच्या फुलपाखरांना आता आपल्या मायबोलीमध्ये म्हणजेच मराठीमध्ये ओळख मिळाली आहे. 

महाराष्ट्रात फुलपाखरांच्या ज्ञात २७७ प्रजाती आहेत. पण आत्तापर्यंत ही सर्व फुलपाखरं इंग्रजी नावांनीच ओळखली जायची. उदा. ब्ल्यू ओकलीफ, ब्ल्यू मॉरमॉन, कॉमन जिझाबेल, कॉमन सिल्व्हरलाइन अशी काहीशी नावं होती. इंग्रजांच्या काळात ज्या फुलपाखरांचा शोध लागला, त्यांना इंग्रजांनी कमांडर, सार्जंट, कार्पोरल अशीही नावं दिली होती; जणू काही ही फुलपाखरं युद्ध लढायला जाणार होती. नंतर सापडलेल्या फुलपाखरांनाही इंग्रजीतच नावं दिली गेली. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील फुलपाखरं याच परकीय नावांनी ओळखली जायची. उच्चार करायलाही कठीण आणि लक्षात राहायला तर त्याहून अवघड. एवढंच काय तर मराठी बोलीभाषेत किंवा मराठी साहित्यातही त्यांना मराठी नावं नव्हती. पण आता मात्र हे चित्र बदललं आहे, त्यांना मराठी नावं मिळाली आहेत. त्यांच्या मराठी नावांचं ‘महाराष्ट्रातील फुलपाखरांची मराठमोळी नावे’ हे सचित्र पुस्तकही प्रकाशित करण्यात आलं आहे. ‘महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळा’च्या पुढाकारानं हे पुस्तक तयार झालं आहे. याआधी डॉ. राजू कसंबे यांनी ८५ प्रजातींच्या मराठी नावांचं ई-पुस्तक प्रदर्शित केलं आहे. सगळ्याच फुलपाखरांना मराठी नावं असावीत, ही कल्पना जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांची. ते सांगतात, ‘जैवविविधता मंडळाकडे जैवविविधता नोंदवही असते. त्यामध्ये नोंदी करताना गावरान भाषेचा, स्थानिक भाषेचाही उपयोग केला जातो. आपल्याकडं वनस्पती, प्राणी, पक्षी आणि अगदी छोट्या किड्यांनाही मराठी नावं आहेत आणि ती मराठी नावांनीच ओळखली जातात. फुलपाखरं मात्र याला अपवाद होती. फुलपाखरांना स्थानिक भाषेत नावं देणारं महाराष्ट्र दुसरं राज्य आहे. केरळ राज्यानंसुद्धा तिथल्या फुलपाखरांना स्थानिक भाषेमध्ये म्हणजेच मल्याळीमध्ये नावं दिली आहेत. त्यांनी दिलेली नावंही अतिशय सुंदर आहेत. मग मराठी भाषा एवढी समृद्ध आहे, तर आपल्या फुलपाखरांना मराठी नावं का असू नयेत? म्हणूनच आपणही फुलपाखरांना स्थानिक भाषेत नावं देऊ, असा विचार केला.’ 

जवळपास वर्षभर या पुस्तकाचं काम सुरू होतं. मराठी नावांसाठी पर्यावरणप्रेमी संस्था आणि तज्ज्ञ, अभ्यासकांना आवाहन करण्यात आलं. राज्यभरातून अनेक संस्था आणि अभ्यासकांनी आपला सहभाग नोंदवला. फुलपाखरांची अंतिम मराठी नावं निश्‍चित करण्याच्या कामासाठी मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये डॉ. राजू कसंबे, डॉ. जयंत वडतकर, हेमंत ओगले, दिवाकर ठोंबरे आणि अभय उजागरे यांचा सहभाग होता. सूची तयार करताना फुलपाखराचं रूप, रंग, उडण्याचा वेग, अधिवास, खाण्याच्या सवयी, इतर वैशिष्ट्यं आणि एकंदरीत वर्तणूक असे सर्व निकष लावून त्यांची मराठी नावं ठरविण्यात आली. जिथं शक्य आहे तिथं फुलपाखरांच्या वैशिष्ट्यांवरून त्यांचं नाव ठरवण्यात आलं, जेणेकरून फुलपाखरू ओळखणं सोपं जावं. उदा. टायगर बटरफ्लाय नावाचं फुलपाखरू रुईच्या झाडावर आढळतं, म्हणून त्याला ‘रुईकर’ असं नाव देण्यात आलं; लक्षात ठेवायलाही सोपं, रुईवर राहणारा रुईकर. तर, काहींचं पंखांच्या आकारावरून नामकरण करण्यात आलं. उदा. एका फुलपाखराच्या पंखांचा आकार गोल आहे, म्हणून त्याचं ‘गोलू’ असं नामकरण झालं. कॉमन जिझाबेल या फुलपाखराच्या पंखांची रंगीबेरंगी रंगसंगती लांबूनही दिसते. फुलपाखरू कोणतं हे ओळखायला जवळ जाण्याचीही गरज नसते. पिवळ्या रेषा आणि लाल ठिपके असलेलं हे सुरेख फुलपाखरू आता ‘हळदीकुंकू’ म्हणून ओळखलं जाईल. तर, पानासारखा पंखांचा आकार असणाऱ्या, निळ्या रंगाच्या ब्ल्यू ओकलीफला आता ‘नीलपर्ण’ म्हणायचं आहे. हे नीलपर्ण पंख मिटल्यावर वेगळं दिसतं आणि पंख उघडल्यावर वेगळं दिसतं. केशरी उभ्या उभ्या रेषा असलेलं कॉमन सिल्व्हलाइन आता ओळखलं जाईल ‘रूपरेखा’ म्हणून. उदाहरणादाखल ही झाली काही चार-पाच नावं. पण, याच पद्धतीनं फुलपाखरांच्या २७७ प्रजातींचं मराठी नामकरण करण्यात आलं आहे. ‘पटकन ओळखता येतील, सहज लक्षात राहतील, सुटसुटीत असतील, छोटी असतील आणि मुख्य म्हणजे ‘कॅची’ असतील, अशीच नावं फुलपाखरांना देण्यात आली आहेत,’ अशी माहिती डॉ. विलास बर्डेकर यांनी दिली. सुरुवातीच्या बैठकांमध्ये नावांसाठीचे नियम, निकष ठरवण्यात आले. नावे सोपी असावीत यावर भर देण्यात आला. फुलपाखरांची पहिली सूची तयार झाल्यानंतर ही नावं नंतर सर्वांसाठी खुली करण्यात आली. त्यावर सूचना मागविण्यात आल्या. अनेकांचे ई-मेल्स आले. खूपजणांनी सुंदर सूचना केल्या होत्या. जी नावं चांगली होती, ती स्वीकारली गेली आणि त्यांचाही अंतिम सूचीमध्ये समावेश करण्यात आला, अशी माहिती डॉ. राजू कसंबे यांनी दिली.  

महाराष्ट्रात खूपच सुंदर फुलपाखरं पाहायला मिळतात. अति पाऊस आणि अति थंडी सोडली तर इतर सर्व काळात फुलपाखरं बागडत असतात. शक्यतो पाऊस थांबल्यानंतर आणि उन्हाळ्यामध्ये जास्त फुलपाखरं दिसतात. अंडी - अळी - कोश - फुलपाखरू असं फुलपाखरांचं जीवनचक्र असतं. अंड्यामधून अळी कधी बाहेर येणार, ती कोशात कधी जाणार आणि कोशातून फुलपाखरू कधी बाहेर येणार याचा कार्यकाल सामान्यतः ठरलेला असतो. पण, बाहेरील तापमान, आर्द्रता आणि अन्नाची उपलब्धता यावरही अंड्याचं रूपांतर फुलपाखरात कधी होणार हे अवलंबून असतं. बाहेरील हवामान पोषक नसेल तर अळ्या अंड्यातून लवकर बाहेर येत नाहीत. तसंच अळी जास्त काळ निद्रितावस्थेत जाऊ शकते. अंड्यापासून फुलपाखरापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पोषक हवामानाबरोबरच योग्य खाद्यही उपलब्ध असावं लागतं. फुलपाखरांच्या खाद्य वनस्पतीही ठरलेल्या असतात, म्हणजे कोणत्या झाडावर अंडी द्यायची हे ठरलेलं असतं. काही फुलपाखरं एका ठराविक झाडावरच अंडी देतात. तर, काही फुलपाखरं दोन-तीन झाडांवर अंडी देतात, ज्यामुळं त्यांची जगण्याच्या शक्यतेत वाढ होते. कधीकधी असंही पाहायला मिळतं, की एकाच झाडावर वेगवेगळ्या प्रजातीच्या फुलपाखरांनी अंडी दिली आहेत. औषधी वनस्पतींवर फुलपाखरांची अंडी जास्त प्रमाणात आढळतात, अशी माहिती हेमंत ओगले यांनी दिली. 

अशा या रंजक, चित्तवेधक फुलपाखरांच्या संवर्धनाकरिता त्यांना बोलीभाषेत समजून घेणं महत्त्वाचं आहे. कोणतीही गोष्ट नीट शिकायची असेल, तर मातृभाषेतून समजून घ्यावी. लवकर समजते. हेच तत्त्व फुलपाखरांच्या नावांसाठी लागू होणार आहे. मराठी नावांमुळं विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच फुलपाखरं ओळखणं अधिक सोपं होणार आहे, कारण त्यांची नावं आता सहज लक्षात ठेवता येणार आहेत. याचाच त्यांच्या संवर्धनासाठी खूप मोठा उपयोग होणार आहे. फुलपाखरूप्रेमी तरुण संशोधक, विद्यार्थी अशा सर्वांनाच हे पुस्तक उपयोगी पडेल हे नक्की.  

महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ‘नीलवंत’
काळ्या, निळ्या-आकाशी रंगाचं सुंदर आणि मोठं फुलपाखरू म्हणजे ब्ल्यू मॉरमॉन. पण, आता त्याला म्हणायचं नीलवंत! हे नीलवंत जरा विशेषच आहे, कारण ते आपल्या महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे. २०१५ मध्ये त्याला राज्य फुलपाखराचा किताब देण्यात आला. राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं होतं. महाराष्ट्रानं नीलवंतला राज्य फुलपाखरू घोषित केल्यानंतर उत्तराखंड, कर्नाटक आणि गोवा या राज्यांनीही महाराष्ट्राचं अनुकरण करत राज्य फुलपाखरू निवडलं. 

कसं असेल पुस्तक?

  • महाराष्ट्रातील सर्व ज्ञात म्हणजेच २७७ प्रजातींचा या पुस्तकात समावेश आहे.
  • फुलपाखराचं शास्त्रीय नाव, इंग्रजी नाव, मराठी नाव, आकार आणि थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. फुलपाखराचं रंगीत छायाचित्रही देण्यात आलं आहे. ज्या फुलपाखरांच्या नर आणि मादी पूर्णतः वेगळ्या आहेत, त्यांची दोन्ही छायाचित्रे दिलेली आहे. 
  • काही मराठी नावं - ढवळ्या, पवळ्या, गोलू, भिरभिरी, रुईकर, नीलायम, रूपमाला, झिंगोरी, झुडपी, हबळी, हळदीकुंकू, भटक्या, नीलवंत, रूपरेखा, बहुरूपी, पिंगोरी, लालकवडा
  • फुलपाखरांच्या सहा कुळांचंही मराठीकरण करण्यात आलं आहे. पुच्छ (Papiliondae), पितश्‍वेत (Pieridae), निल (Lycaenidae), चपळ (Hesperildae), कुंचलपाद (Nymphaliadae), मुग्धपंखी (Riodinidae) असं सहा कुळांचे नामकरण करण्यात आलं आहे. या सहा कुळांमध्ये फुलपाखरांचं वर्गीकरण करण्यात आलं आहे.  
  • हे पुस्तक छापील स्वरूपात तसंच ई-बुक स्वरूपातही उपलब्ध होणार आहे. ई-बुक जैवविविधता मंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड केलं जाईल. मुख्य म्हणजे हे पुस्तक सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध होणार आहे.

संबंधित बातम्या