जोडीदारासाठी पायपीट

इरावती बारसोडे
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

नोंद
 

एका वाघाचा भारताच्या दोन राज्यांमधून हजारो किलोमीटर्सचा प्रदीर्घ प्रवास... योग्य अधिवास आणि जोडीदाराच्या शोधात केलेला... हा प्रवासच असा होता, की त्याने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. आजपर्यंत कुठल्याच वाघाने केली नाही, अशी कामगिरी एका तरुण वाघाने केली आहे. त्याचे नाव आहे सी-१!

अधिकृत ओळख TWLS-T1-C1 अशी असलेल्या या अडीच - पावणे तीन वर्षांच्या वाघाने जोडीदार आणि त्याला योग्य अशा अधिवासाच्या शोधात तब्बल १३०० किलोमीटरहून जास्त पायपीट केली आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील सहा जिल्हे त्याने पालथे घातले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्‍वर अभयारण्य हे त्याचे जन्मस्थान. तिथून निघालेला हा वाघ १५० दिवस प्रवास करत होता. आता सध्या तो बुलढाणा जिल्हातील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये स्थिरावला आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच एखाद्या वाघाने एवढा लांब प्रवास केला आहे.

सी-१ ला सॅटेलाईट रेडिओ कॉलर लावलेली असल्यामुळे त्याचा प्रवास ‘ट्रॅक’ करणे सोपे झाले. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या टीमने २७ मार्च २०१९ रोजी त्याच्या गळ्यात रेडिओ कॉलर बांधली होती. वाघांच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन देखरेख करता यावी, अभ्यास करता यावा यासाठी ही कॉलर बांधण्यात आली आहे. तरुण, ज्यांची पूर्ण वाढ झालेली नाही, असे वाघ सहसा नवनवीन भागांमध्ये फिरत जातात. स्वतःचा प्रदेश निश्‍चित करणे, हा त्यामागचा उद्देश असतो. सी-१ च्या कॉलरमधील बॅटरी संपल्यानंतर त्याचे ट्रॅकिंग थांबेल.

सी-१ चा जन्म २०१६ च्या शेवटच्या महिन्यांमध्ये झाला होता. त्याला दोन नर भावंडेही आहेत, ती सी-२ आणि सी-३ या नावांनी ओळखली जातात. हे तिघे टी-१ वाघिणीचे बछडे. २०१९ च्या सुरुवातीला हे तिन्ही भाऊ एकमेकांपासून वेगळे झाले आणि स्वतंत्र राहू लागले. सी-३ लासुद्धा कॉलर लावण्यात आली आहे. सुरुवातीला टिपेश्‍वरमध्ये एकत्र राहिल्यानंतर सी-१ आणि सी-३ दोघांनीही भटकायला सुरुवात केली. तेलंगणा राज्याच्या सीमेवर, पांढरकवडा क्षेत्रामध्ये त्यांच्या हालचाली वाढल्या. जुलै २०१९ च्या मध्यात सी-३ ने महाराष्ट्र सोडला आणि तो तेलंगणामध्ये गेला. तो अदिलाबाद शहराच्या अतिशय जवळ गेला होता. पण तिथे स्थायिक होण्याऐवजी तो १० दिवसांत पुन्हा टिपेश्‍वरमध्ये आला आणि आता तिथेच राहिला आहे. 

सी-१ ने जून २०१९ मध्ये टिपेश्‍वर अभयारण्य सोडले. त्याने पांढरकवडा क्षेत्र ओलांडून अंबाडी घाट आणि किनवट जंगलमार्गे अलिदाबाद क्षेत्रामध्ये प्रवेश केला. ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत तेलंगणामधील अलिदाबाद आणि महाराष्ट्रातील नांदेड येथील जंगलांमध्ये सी-१ चा वावर होता. नंतर त्याने पैनगंगा अभयारण्यात प्रवेश केला आणि तिथे तो थोडाच काळ राहिला. नंतर ऑक्टोबरमध्ये तो पुसदकडे रवाना झाला. तिथून तो इसापूर अभयारण्याकडे गेला. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तो मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये गेला. हिंगोलीहून वाशिम, वाशिमहून अकोला आणि बुलढाणा असा प्रवास त्याने केला. तो चिखली आणि खामगावच्या जवळही गेला होता. १ डिसेंबर रोजी त्याने ज्ञानगंगा अभयारण्यात प्रवेश केला. सध्या तरी तो तिथेच स्थिरावला आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात अन्न स्रोतही मुबलक आहेत. 

सी-१ ने हजारो किलोमीटर्सचा प्रवास करताना दोन राज्ये, त्यांतील सहा जिल्हे पार केले. अनेक गावे, शेतजमिनी, अधिवास ओलांडले. पण, त्याचा मानवाबरोबर किंवा पाळीव प्राण्यांबरोबर फारसा संघर्ष झालेला नाही. त्याने अगदी मोजक्याच पाळीव प्राण्यांची शिकार केली, पण तीही जगण्यासाठी आवश्‍यक तेवढीच! हिंगोलीमध्ये काही गावकरी दाट झाडीत विश्रांती घेत असताना त्याच्या खूप जवळ गेल्यामुळेच तो अंगावर गेला, पण त्यानंतर अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. अतिशय शांतपणे त्याने हा प्रवास पूर्ण केला. 

योग्य अधिवासाच्या शोधात निघालेला सी-१ एवढा प्रसिद्ध झाला, की आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही त्याच्या वाटचालीची दखल घेतली आहे. 

नर वाघ अन्न, पाण्याचे मुबलक स्रोत आणि मादींची संख्या यावरून स्वतःचे क्षेत्र ठरवतो, तिथे स्वतःचे वर्चस्व सिद्ध करतो. सी-१ च्या या प्रवासामुळे वाघांना आणखी आरक्षित क्षेत्राची गरज भासू लागली असल्याचे दिसते. भविष्यामध्ये इतर वाघांनाही कदाचित नवीन अधिवास आणि जोडीदाराच्या शोधात असेच दूर दूर भटकावे लागेल.

संबंधित बातम्या